सोमवार, ३० जानेवारी, २०१७

पुरीच्या शंकराचार्यांबरोबर झालेल्या वादाची कहाण , कुमार सप्तर्षी



पुरीच्या शंकराचार्यांबरोबर झालेल्या वादाची कहाणी!

तब्बल ३१ वर्षांनंतर या लेखाचे प्रयोजन काय, असा प्रश्न कुणाला पडेल. पण धर्माच्या नावाखाली खोटारडेपणा, दांभिकपणा सध्या मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर ब्राह्मण्य, हिंदुत्ववाद व फॅसिझम ही मूळ एकाच प्रवृत्तीची अलग अलग रूपे आहेत याची खात्री वाटू लागली आहे. तरुणांना या प्रवृत्तीच्या अंतरंगाची ओळख करून द्यावी असा या लेखामागचा हेतू आहे. शंकराचार्यांशी झालेल्या वादाची कहाणी कधी शिळी होत नाही.
ही कहाणी आहे ३१ वर्षांपूर्वीची! आजही रोचक वाटावी अशी. २१ मार्च १९७३! पुण्याच्या दैनिक ‘केसरी‘मध्ये एक मजेशीर बातमी प्रसिद्ध झाली होती. ‘पुरीच्या शंकराचार्यांचे जाहीर आव्हान‘ असे त्या बातमीचे शीर्षक होते. पहेलवान, मुष्टियोद्धे आपले नाव झळकावे म्हणून जाहीर आव्हाने देतात हे ठाऊक होते. आपल्याला कुणी हरवू शकत नाही, असा त्यांचा समज असतो. आपले अजिंक्यत्व सिद्ध करण्यासाठी अन आपल्या कीर्तीचे नाणे खणखण वाजवून दाखवण्यासाठी अशी आव्हाने त्यांना द्यावी लागतात. नाणे बाजारात चालले तर त्याची किंमत!
पुरीचे शंकराचार्य निरंजनदेव तीर्थ यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते की, ‘‘महाराष्ट्रात जो भयंकर दुष्काळ पडला आहे, त्याचे एकमेव कारण आहे अस्पृश्यतेचे पालन करणे सोडून दिल्यामुळे हा दुष्काळ पडला. याला परिवर्तनवादी कारणीभूत आहेत. ते समता वगैरे मूल्यांचा प्रचार करतात आणि लोकांना अस्पृश्यता पाळू नका म्हणून सांगतात. समतेचा विचार ईश्वराला व निसर्गाला मंजूर नाही. विषमता ईश्वरनिर्मित व निसर्गनिर्मित आहे. समता लादणे ही निसर्गावर बळजोरी आहे. त्यामुळे दुष्काळासारख्या घटनांद्वारे तो आपली नापसंती दाखवतो. मानव जातीला फटका देतो. माझ्या या भूमिकेशी कुणाचा मतभेद असेल तर त्याच्याबरोबर मी आठ दिवस जाहीरपणे अखंड वादविवाद करण्यास तयार आहे. जाहीर वादासाठी माझे समतावाद्यांना आव्हान आहे. हे आव्हान कुणी स्वीकारले, तर मी पुरीचे प्रयाण रद्द करून पुण्यात राहीन. हे आव्हान कुणी स्वीकारले नाही तर मी असे मानीन की, समस्त पुणेकरांना माझा विचार मान्य आहे.‘‘
ती बातमी वाचून माझ्या मनात भावनांचे अनेक तरंग उमटले. सनातनी मंडळी प्रत्येक काळात जन्माला येतात. त्यांची रूपे काळानुरूप अलग असतात. ज्ञानेश्वरांचा, आगरकरांचा, म. फुलेंचा, आंबेडकरांचा म्हणजे परिवर्तन करू पाहणार्‍यांचा छळ सार्वकालीन व सातत्याने चालू होता. आजही तोच प्रकार नव्या रूपात चालू आहे, असा विचार मनात आला. इतर पुरोगामी मंडळींशी संपर्क साधला. बहुतेकांचे म्हणणे पडले की, त्यांची विधाने हास्यास्पद आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य होईल. अशा विधानांचा समाजावर काही परिणाम होत नसतो. हजारो वर्षे याच भाषेत बोलणारे हजारो प्रवचनकार, कीर्तनकार, महाराज आहेत. त्यांचा परिणाम फक्त त्यांच्या भक्तांवर होतो. पायाचे तीर्थ पिणार्‍यांसमोर डोके फोडूनही उपयोग नसतो. मला ही प्रतिक्रिया पटत नव्हती. काहीतरी खटकत होते.
मानवी अधिकारांविरुद्ध हा वैचारिक अश्वमेध यज्ञ आहे असे मला वाटत होते. शंकराचार्यांचा वारू आपण अडवलाच पाहिजे, असे मन आतून सांगत होते. माझा निर्णय झाल्यानंतर मंडईतल्या माझ्या दवाखान्यात युक्रांदच्या सहकार्‍यांना बोलावून घेतले. त्यांच्यासमोर माझा विचार मांडला. सर्वांनी एकमताने तो उचलून धरला. नंतर अनेक लोकांशी संपर्क साधला. धार्मिक ग्रंथ गोळा गेले. कोणत्या धर्मग्रंथामध्ये वा मान्यवर ऋषिमुनींच्या वचनांमध्ये शंकराचार्यांच्या विधानाला पुष्टी देणारे श्लोक आहेत काय याची चौकशी केली, तसा आधार कुठेही नसल्याचे अभ्यासू लोकांकडून समजले. समाजाने अस्पृश्यतेची प्रथा पाळली तरच पाऊसपाणी व्यवस्थित होते किंवा एका हिंदूने दुसर्‍या हिंदू भावाशी समतेचा व्यवहार केला तर निसर्गाचा कोप होऊन दुष्काळ पडतो, भूकंप होतो अशा अर्थाची विधाने कोणत्याही हिंदू धर्मग्रंथात आढळली नाहीत.
पुरीचे शंकराचार्य हे पूर्वीचे नागपूरचे खरे आडनावाचे गृहस्थ आहेत हे कळले. त्यांचे बंधू प्रसिद्ध हिंदुत्ववादी ना. भा. खरे. ते हिंदू महासभेचे नेते व स्वा. सावरकरांचे अनुयायी होते. उद्यान प्रसाद कार्यालयात फोन करून शंकराचार्यांच्या भेटीसाठी वेळ मागितली. पं. वसंत गाडगीळांकडून महाराज अत्यंत व्यस्त असल्याचे कळले. ‘हो- ना‘ करता करता सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांचे प्रवचन सुरू होण्याआधी भेटावे असे सांगण्यात आले. बरोबर पाच- सहा कार्यकर्ते घेऊन ठीक पावणेसहा वाजता उद्यान प्रसाद कार्यालयात गेलो. भेट मिळाली. नमस्कार करून त्यांच्या हातात पत्र दिले. ‘आपल्याबरोबर जाहीर वादविवाद करू इच्छितो, तुमचे हे आव्हान मी स्वीकारले आहे‘ हे सांगितले. आपले आव्हान स्वीकारण्यास पुण्यात कुणी धजावणार नाही असा त्यांचा समज असावा. त्यांचा चेहरा त्रासिक झाला. माझे वय त्यावेळी ३१ वर्षे होते. ‘हा पोरगा मला आव्हान देतोय. त्याचा खुर्दा करणे ही अत्यंत किरकोळ बाब आहे, आपल्या डाव्या हाताचा मळ आहे. पण हा पोरगा एवढा अगोचरपणा का करतोय? असा प्रश्न त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. ते हिंदी भाषेत संभाषण करत होते. मी म्हणालो, ‘आप जिस दिन, जो भी समय तय करेंगे, उस दिन, उस वक्त हम आएंगे. आप जो भी पंच तय करेंगे उन्हें हम मंजूर करेंगे. आपका निर्णय हमें मंजूर होगा. आप बताइए, विवाद का आधार धर्मग्रंथ या तर्क होगा? आप जो तय करेंगे उसके बारे में हमें कोई ऐतराजी नहीं. अगर धर्मग्रंथ का आधार लेना होगा, तो कृपया उनकी सूची बताइएगा. वह ग्रंथ हम साथ लायेंगे.‘
जरा वेळ थांबून शंकराचार्य म्हणाले, ‘पंचों की क्या जरूरत है? अलग समय निश्चित करने की भी कोई जरूरत नहीं. वादविवाद अभी शुरू होगा, इसी जगह. प्रवचन की व्यवस्था तैयार है. ध्वनिक्षेपक लगाया है. भक्तगण मौजूद हैं. वे निर्णय करेंगे. निर्णय के लिए पंचगणों की आवश्यकता नहीं.‘
‘महाराज, भक्तगण तो आपकी मधुरवाणी सुनने के लिए आये हैं. शायद मेरी बात सुनना वे पसंद नहीं करेंगे. विवाद के लिए उनका मन तयार नहीं होने के कारण विवाद को वे लोग विकल्प या बाधा मानेंगे. आपका प्रवचन मेरे कारण कॅन्सल हुआ इसलिए वे मुझपर क्रोधित भी हो सकते हैं.‘ मी म्हणालो. माझ्या वक्तव्यावर शंकराचार्य आक्रमक झाले. ते अचानक उसळून म्हणाले,
‘तुम उनकी चिंता मत करो. वे मेरे भक्तगण है, तुम्हारे नहीं. मैं उनको अच्छी तरह जानता हूं और तुम्हारे साथ निपटने के लिए मेरा बहुत कम समय नष्ट होगा. उसके बाद धर्म का विजय होगा. मेरे भक्तगण मोदित होंगे और बाद में ब.डी प्रसन्नतासे मेरा प्रवचन सुनेंगे. मैं उनको अच्छी तरहसे जानता हूं.‘ एवढे बोलून ते उठले. प्रवचनासाठी तयार केलेल्या आसनाकडे चालू लागले.
आम्ही प्रवचनाच्या हॉलमध्ये आलो. मला व्यासपीठाकडे पाचारण करण्यात आले. जमिनीवर उभे राहण्यास सांगितले. महाराज उंच जागेवर मखरात बसलेले, मी श्रोत्यांच्या पातळीवर उभा. त्याचा नकळत एक लाभ झाला. कळतनकळत श्रोत्यांबरोबर जवळीक निर्माण झाली.
वादाला प्रारंभ
वादाला सुरुवात करायची जबाबदारी माझ्यावर होती. मी हात जोडून बोलायला सुरुवात केली. म्हणालो, ‘‘आदरणीय महाराज! आप जैसे इतने बडे और बुजुर्ग महान व्यक्ती के सामने मेरे जैसा छोटा आदमी बहुत दबा हुआ महसूस कर रहा है. आपको मेरा नमस्कार, पैर लागू और प्रणाम! लेकिन यह कम होगा. मैं आपको प्रणिपात करता हूँ.‘‘
माझी प्रस्तावना पुढे सुरू झाली, ‘‘आज आपल्याला दोन-तीन प्रश्नांवर चर्चा करायची आहे. तात्त्विक मंथनातून शुद्ध तत्त्वामृताचा शोध घ्यायचा आहे. निसर्गाचा मूळ स्वभाव विषमतेवर आधारलेला आहे, हे आदरणीय शंकराचार्यांचे विधान आहे. माझे मत याविरुद्ध आहे. माझा दावा आहे की, निसर्गाचा स्वभाव शुद्ध समतावादी आहे. निसर्गाचा प्रत्येक व्यवहार सर्वांशी समान असतो. विषमतेच्या कल्पनेचा फक्त माणसाच्या मनात उगम होतो. ईश्वराला विषमता मंजूर आहे हे महाराजांचे दुसरे विधान आहे; पण त्या विषयावर मी बोलणार नाही. त्या विधानाची मी दखल घेऊ इच्छित नाही. कारण ईश्वर मानवनिर्मित आहे आणि मानवप्राणी मात्र निसर्गनिर्मित आहे. आपण ईश्वराला आपल्या वादात अकारण कशाला ओढायचे?आपल्याला दुसरा विचार असा करायचाय की, मानवी जीवनात नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ मूल्य कोणते? समता हे मूल्य की विषमता हे मूल्य! आणखी एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो. जाहीर वादाचे आव्हान महाराजांनी दिले. म्हणून आम्ही येथे आलो. अन्यथा आम्ही इथे येऊन तुमच्यापुढे बोलण्याचे काही प्रयोजन नव्हते. तुमच्या श्रद्धा, तुमच्या मनातली आदराची स्थाने यांना धक्का लावण्याची अजिबात इच्छा नाही. सत्य स्वयंसिद्ध व अत्यंत स्पष्ट असते. आपण शांतपणे माझे विचार ऐकून घ्याल अशी आशा आहे.‘‘
माझी भूमिका उपस्थित श्रोत्यांपुढे स्पष्ट करून प्रत्यक्ष वादविवादाला प्रारंभ करण्यासाठी शंकराचार्यांच्या आसनाकडे नजर वळवून म्हणालो, ‘‘महाराज, लोक अस्पृश्यतेच्या प्रथेचे पालन करत नसल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळ पडला हे आपले कथन तर्कविसंगत व बुद्धीला न पटणारे आहे. किंबहुना त्यातील विसंगती झाकण्यासाठी आपण डावपेच म्हणून ईश्वर व निसर्ग यांना मध्ये घेत आहात. ईश्वर बाजूला ठेवूया. निसर्गाचा विचार करूया. निसर्गाचा दाखला देऊन आपण अस्पृश्यता या मानवनिर्मित क्रूर व अमानुष प्रथेचे जाहीर समर्थन करीत आहात. मला नम्रपणे सांगायला पाहिजे की, निसर्ग तुमच्या भूमिकेच्या विरोधात आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्येही या प्रथेचे समर्थन आढळत नाही. अर्थात, धर्मग्रंथ निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहेत. ज्या वर्गाने हे ग्रंथ कधीतरी लिहिले आहेत, त्यांचे वारसदार आजही त्यांचा आश्रय घेतात. अस्पृश्यतेचे स्पष्ट समर्थन धर्मग्रंथांनी केलेले नाही; पण त्यांच्या पानापानात विषमतेचा प्रचार आहे. धर्मग्रंथात ग्रथित केलेला विचार तर्काशी, मानवी हक्कांशी आणि मानवतेशी विसंगत असेल, तर त्यांचा आपण सर्वांनी त्याग केला पाहिजे. धर्मग्रंथांचा आधार घेऊन कुणीही चुकीच्या गोष्टींचा प्रचार करू नये.
‘‘उरला प्रश्न निसर्गाचा. त्याचे श्रेष्ठत्व आपण सर्वांनी मानायलाच हवे. निसर्गाचे ज्ञान केवळ कल्पनेने होत नाही. विज्ञान हे निसर्गाची गुपिते उलगडवून दाखवणारे शास्त्र आहे. सत्याचा शोध घेताना विज्ञानाने तीन कसोट्या सांगितल्या आहेत. निसर्गाचे नियम कळले आहेत असा दावा कुणाला करायचा असेल तर प्रथम वैश्विकता, कालसातत्य अन्‌ मानवी इच्छेपासून मुक्त असे ते स्वायत्त सत्य आहे हे पटवून द्यावे लागते.‘‘
‘‘आदरणीय महाराज, आपण म्हणता की, अस्पृश्यता विज्ञानाला मंजूर आहे आणि अस्पृश्यतेचे लोकांनी पालन केले नाही म्हणून निसर्गाचा कोप झाला. निसर्गाचा कोप झाल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळ पडला. कोप ही मानवी भावना आहे. निसर्गाला भावना नसतात. अस्पृश्यता निसर्गनिर्मित आहे हे वैज्ञानिक सत्य नाही. सत्य असेल तर ते तीन कसोट्यांवर उतरायला हवे. वैश्विकता ही पहिली कसोटी. अस्पृश्यता वैश्विक नाही. भारताबाहेर अस्पृश्यता कुठेही सापडत नाही. दुसरा निकष कालसातत्याचा. पृथ्वी निर्माण झाल्यापासून ही प्रथा अस्तित्वात नाही. जगाच्या अंतकाळापर्यंत ती टिकून राहणार नाही. याउलट ही प्रथा जगाच्या आदी काळापासून अस्तित्वात आहे आणि ती जगाच्या अंतापर्यंत चालू राहणार आहे असे आपण सप्रमाण सिद्ध करू शकाल काय? कालसातत्याच्या निकषावर आपले म्हणणे टिकत नाही. तिसर्‍या निकषावरही आपले विधान टिकत नाही. पाणी १०० अंश तापमानाला उकळते हे निसर्गनिर्मित सत्य आहे. कारण विश्वात कुठेही ते त्याच तापमानाला उकळते. जगाच्या प्रारंभापासून त्याच्या अंतापर्यंत ते १०० डिग्री तापमानालाच उकळत आहे व उकळणार आहे. तसेच माणसाच्या इच्छेने ते सत्य बदलता येत नाही. अस्पृश्यता मानवी इच्छेपासून मुक्त, निरपेक्ष किंवा स्वायत्त नाही. भारतात काही माणसांनी काही माणसांवर ती प्रथा लादली आहे. म्हणूनच या प्रथेला अस्तित्व निर्माण झाले. भविष्यकाळात या प्रथेविरुद्ध बंड झाले अथवा समाजाची इच्छा झाली की ही प्रथा नष्ट करावी; तर या प्रथेचा अंत होईल. समाजाच्या बदललेल्या या इच्छेच्या आड निसर्ग येणार नाही.‘‘
‘‘आपणास पुन्हा प्रणिपात करून मी इथं थांबतो. यावर आपले प्रतिपादन ऐकण्यास मी उत्सुक आहे. आपल्या मनुस्मृतीवरील रसाळ प्रवचनापासून श्रोतृवर्गाला वंचित राहावे लागत आहे, त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागतो.‘‘ माझे प्रतिपादन संपले. श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांनी हा वादविवाद खिलाडूवृत्तीने घेतला होता.
शंकराचार्यांचे प्रत्युत्तर
शंकराचार्य माझ्या प्रतिपादनानंतर चिडले असावेत. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहातील वातावरण माझ्या बाजूने झुकलेले पाहून त्यांनी वातावरण गरम करायचे ठरवले. त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. घोषणा होत्या, ‘बोलो, श्रीराम जय राम, जय जय राम!‘, ‘हिंदू धर्म की जय हो!‘, ‘अधर्मका नाश हो!‘ वगैरे.
धार्मिक अस्मितेचा पुरेसा डोस पाजल्यानंतर महाराज म्हणाले, ‘‘निसर्ग याने विषमता! विषमता कुदरत का धर्म है. कण कण में विषमता भरी है. विषमतासे निसर्ग परिपूर्ण है. किसी दो मनुष्य की आंखें, नाक, कान एक जैसे नहीं होते. उनका कद एक जैसा नहीं होता. कोई नकटा, तो कोई बुटका. समता कहीं दिखायी नहीं देती. समता सप्तर्षी जैसे समाजवादियों की केवल कल्पनामात्र है. यह कल्पना निसर्ग और ईश्वर का घोर अपमान करती है.‘‘
यावर मी उत्तर दिले, ‘‘आप मनुष्यों में जिन उपरी भेदों का वर्णन कर रहे है, उसको विषमता नहीं माना जा सकता. वह सिर्फ विविधता है. किसी की नाक लंबी हो, छोटी हो, चपटी या नकटी हो; लेकिन बगैर नाक का मनुष्य होही नहीं सकता. मैं डॉक्टर हूं. निसर्ग समतानिष्ठ है. मेरा प्रशिक्षण सिर्फ एक मानवी शरीर पर होता है. अगर हर मनुष्य का शरीर अलग या भिन्न होता, तो यह शिक्षण बेमतलब हो जाता. ‘‘
... अधर्म का नाश हो
ते म्हणाले, ‘‘मनुष्य मनुष्य में भेद हैं. तुम्हें वह दिखायी नहीं देता. ठीक है. मैं दुसरा उदाहरण देता हूँ. गाय प्राणी की मिसाल लो. कुछ गाय का रंग काला, तो किसी का सफेद या किसी का लाल होता है. इसका कारण विषमता का नियम सब जगह चलता है. है क्या नहीं? अब तो मान जाओगे ना?‘‘ त्यांना हा वाद त्वरित निकालात काढायचा होता. घाई झाली होती. अपेक्षित असलेले घडत नव्हते. म्हणून त्यांचे प्रतिपादन झाल्याबरोबर त्यांनी एकतर्फी जाहीर केले, ‘‘हम जीत गये, सप्तर्षी हार गया! बोलो, श्रीराम जय राम... अधर्म का नाश हो.‘‘ यातील अखेरची घोषणा देते वेळी ‘नाश हो‘ हे शब्द उच्चारताना त्यांनी माझ्याकडे अंगुलिनिर्देश केला.
घोषणांचा गदारोळ संपल्यानंतर मी म्हणालो, ‘‘महाराज, प्रत्येक गाईचा रंग वेगळा असू शकतो. पण जर तो प्राणी गाय असेल तर ती दूध देते. प्रत्येक प्राणी विशिष्ट गुणधर्माचाच असतो. विश्वातले एका वंशाचे सर्व प्राणी समान गुणधर्माचे असतात, हा निसर्गाचा नियम आहे. गायीचा रंग वेगवेगळा असणे ही विविधता आहे. विविधतेला विषमता समजणे चूक आहे.‘‘
त्यांनी माझ्या प्रश्नाचे सरळ उत्तर देण्याचे टाळले. मोर्चा दुसर्‍याच दिशेकडे वळवला. ते म्हणाले, ‘‘तुम्हारे डाक्टरी शिक्षा का कोई अर्थ नहीं. डाक्टर लोग कहते हैं की, फलाना आदमी टाइफाइड की बीमारी से मरा. टाइफाइड की साथ होती है, ऐसा भी इन लोगों का कहना है. अरे, टाइफाइड जंतू सब जगह मौजूद होते हैं. मैं पूछता हूँ, फिर सभी लोग क्यूं नहीं मरते? कारण एकमात्र है, निसर्ग सबके साथ समान व्यवहार नहीं करता. जिसे मारना है, उसे मृत्युदंड देता है. जिसको नहीं मारना है, उसे भले टाइफाइडने घेर लिया हो फिर भी वह मरता नहीं. बीमारी और मृत्यु का कोई अनोन्य संबंध नहीं. जब आदमी का पुण्य खत्म होता है, तो उसे मृत्यू आता है.‘‘
मी म्हणालो, ‘‘महाराज, साथीच्या काळात टायफॉइडचे जंतू सर्वांमध्ये प्रवेश करतात. परंतु प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य व त्याची प्रतिकारशक्ती यात फरक असतो. पथ्य पाळले का, कुपथ्य झाले का वगैरे अनेक प्रश्न असतात.‘‘
ते ऐकून घेत नसत. मध्येच माझे म्हणणे तोडून ते पुढच्या उदाहरणाकडे वळत. जी उदाहरणे देत ती एकाच धर्तीची असत. हा प्रकार बराच वेळ चालू राहिला. वाद निष्कर्षाप्रत पोहोचेना. साडेसात वाजता त्यांनी जाहीर केले की, ही चर्चा आठ वाजेपर्यंत चालेल. रात्री दहा वाजता त्यांना अन्य ठिकाणी प्रवचन द्यायला जायचे आहे.
शेवटचे प्रतिपादन म्हणून महाराज म्हणाले, ‘‘देखो, चार ल.डकों को एक कतार में ख.डा करो और उन्हें पत्थर फेंकने के लिए कहो. हरेक का फेंका हुआ पत्थर अलग दूरी पर जायेगा. कुदरतने सभी बच्चे समान शक्ती के पैदा किये होते, तो सबके पत्थर समान दूरी पर पहुँचते. इसका निष्कर्ष एक ही है, हर आदमी की शक्ती अलग अलग होती है. समाजवादी सबकी शक्ती समान मानते हैं. उनका सिद्धांत गलत साबित होता है.‘‘
पुन्हा ‘हम जीत गये... बोलो... अधर्म का नाश हो‘ वगैरे जोरदार झाले. माझे उत्तर होते, ‘‘महाराज, सभी ल.डकों के पत्थर एक दूरी पर नहीं पहुँचेंगे. ठीक है. इसमें गुरुत्वाकर्षण, व्हेलॉसिटी वगैरा वैज्ञानिक सिद्धांत झूठे साबित नहीं होते. हर पत्थर समान शक्ती से फेंका गया, वातावरण में वायु का वेग समान रहा, तो एक ही नियम के अनुसार पत्थर समान दूरी पर ही पहुँचेंगे. छो.ड दो इन बातों को. तर्क के अनुसार अगर बहस नहीं होगी तो नतीजे पर हम पहुँच नहीं पायेंगे.‘‘ तोपावेतो माझ्या लक्षात आले होते की, ते तर्काने सुसंगत चर्चा करू शकणार नाहीत. मी म्हणालो, ‘‘महाराज, आपने कहा मृत्यू पूर्वसंचित और पुण्य के अनुसार होता है. दूसरी बात आपने कही की गुरुत्वाकर्षण वगैरा नियम सब के लिए समान नहीं होते. चलो, अनुभव के कसोटी पर इन सिद्धांतों का परीक्षण करते हैं. एक वेगळी कल्पना आपल्यापुढे मांडतो. आपण क्षणभर एक कल्पना करू या. उद्यान प्रसाद कार्यालयाच्या माडीवर आपण दोघे उभे राहिलो आहोत. फक्त कल्पनाच बरं का! तिथून रस्त्यावर उडी मारली तर काय होईल या विषयावर आपण दोघे चर्चा करीत आहोत अशी कल्पना करा. माझ्या मते गुरुत्वाकर्षणामुळे आपण दोघेही रस्त्यावर आदळू, दोघांचेही डोके फुटेल, डोके फुटल्यावर आपण दोघेही जिवंत राहणार नाही. हा घटनाक्रम निसर्गनियमानुसार अटळ आहे अशी माझी धारणा आहे. आपण पुण्यवान व्यक्ती अन्‌ मी पापी, पाखंडी माणूस म्हणून दोघांच्या भविष्यात काडीमात्र फरक होणार नाही. आपण पुण्यशील, धर्माचार्य असल्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या नियमामध्ये निसर्ग आपल्यासाठी अपवाद करणार नाही. आपण हवेत तरंगणार व फक्त मीच रस्त्यावर आदळणार असे घडणार नाही हे मला निश्चितपणे माहीत असल्याने मी तर उडी मारणार नाहीच; पण आपल्यालाही मी उडी मारू देणार नाही. मी म्हणेन की हा शुद्ध अविचार होईल.
‘‘या काल्पनिक परिस्थितीमध्ये आपण काय भूमिका घ्याल? आपल्या उत्तरावर या वादाचा निकाल लागू शकतो. आपण स्वतः उडी मारणार नसाल आणि मलाही मारू देणार नसाल तर माझा मुद्दा आपण छुपेपणाने का होईना कबूल केला असे मानू या. कारण निसर्गाची भेदरहित अटळता आपण मान्य केल्यामुळेच पुढील भविष्य आपण जाणले व अनर्थ टाळण्यासाठी दोघांपैकी कुणी उडी मारावी हा प्रस्ताव आपण नाकारला असे म्हणता येईल. याउलट, मृत्यू पूर्वसंचितानुसारच व पूर्वनिश्चित वेळेलाच होतो हा सिद्धांत आपण खरोखरीच मानत असाल, तशी आपली धारणा दृढ असेल, तर आपण म्हणाल की, ‘‘अरे कुमार, तू मरशील रे बाबा! तू उडी मारू नकोस. मी उडी मारतो. मला काही होणार नाही. माझी काळजी करू नकोस. माझे पुण्य अधिक आहे.‘‘ या काल्पनिक प्रसंगात आपण नेमके काय म्हणाल हे आपण सांगितल्यास आताच वादाचा निकाल लागेल.‘‘
माझे प्रतिपादन झाले. युक्तिवादात मी बिनतोड तोडगा मांडला आहे असा भाव श्रोत्यांच्या चेहर्‍यावर झळकला. काहींनी तर टाळ्या वाजवल्या. शंकराचार्य क्रोधित झाले. मी मांडलेल्या कल्पनेवर ते फारच भडकले. अद्वातद्वा बोलू लागले. त्वेषाने ओरडू लागले. ते श्रोत्यांना म्हणाले, ‘‘ये देखो! सुना आपने ? इसने खुदका नाम कुमार सप्तर्षी रखा है. नाम में एक नही सात ऋषी हैं. अपने नाम में सात ऋषी होने के बावजूद ये वेद, मनुस्मृती, ब्राह्मण्य और मेरा उपहास करता है. मैं हिंदू धर्म का आचार्य हूँ ना ? इसलिए इसकी ये हिम्मत है.‘‘ ते आपल्या भक्तगणांची सारासार विवेकबुद्धी बंद पाडण्यासाठी त्यांच्या श्रद्धांना चिथावणी देऊन वैरभाव जागृत करत होते, उत्तेजन देत होते.
‘‘अरे, खुद का नाम डेव्हिड या महंमद क्यू नही रखते ? रखो, रखो. सप्तर्षी नाम निकालो. अगर तुम्हारी हिंमत है और सच्चे हिंदू हो तो कुराण, बायबल पर बोलो. उन ग्रंथों पर टीका करो. अपनी मर्दानगी उसमें दिखाव.‘‘
यावर मी म्हणालो, ‘‘महाराज आपण विनाकारण क्रोधित होत आहात. मी एका शब्दानेही आपला वा हिंदू धर्माचा किंवा धर्मग्रंथांचा उपहास वा अनादर केलेला नाही. बायबल व कुराण या धर्मग्रंथांवर टीका केली तरच तो ‘मर्द हिंदू‘ ठरतो ही आपली अजब व्याख्या आहे. सच्चा हिंदू कुणाच्याही पवित्र मानलेल्या स्थानांचा मनापासून परम आदरच करतो, अशी माझी धारणा आहे. आपण कृपया क्रोध आवरा. शांत व्हा. सभ्य व सज्जन श्रोत्यांच्या श्रद्धांना चुकीच्या मार्गाने आव्हाने देऊ नका. आपणास माझी ही नम्र विनंती आहे.‘‘ एवढे बोलून मी त्यांना हात जोडले.
आज तो कुमार सप्तर्षी हार गया
महाराज शांत झाले. त्यांनी पवित्रा बदलला. त्यांना भक्तांच्या मनावर हे ठसवायचे होते की दोन तास चाललेल्या या वादात ते जिंकले आहेत आणि कुमार सप्तर्षी हरला आहे. म्हणून ते म्हणाले, ‘‘पूर्वार्ध इधर समाप्त होता है. कल शामको विवाद का उत्तरार्ध होगा. कल देखते हैं क्या होता है ? लेकीन आज तो कुमार सप्तर्षी हार गया यह मैं जाहीर करता हूँ. हम जीत गये और हिंदू धर्म की जय हुई हैं.‘‘ मी त्यांचे बोलणे अडवत म्हणालो, ‘‘महाराज, मेरी लडाई हिंदू धर्म से नहीं. आप हिंदू धर्म को बीच में बेमतलब क्यूँ लाते है ? और जितम मया, जितम मया ऐसा आक्रोश क्यूँ करते हो ? मैं ना आपको हराना चाहता हूँ, ना मुझे जीत की तमन्ना हैं. विवाद सिर्फ आपके विचारा सें, आपकी भूमिका से है. आपसे मेरी कोई व्यक्तिगत दुश्मनी नही, कोई लडाई नही. फिर हार-जीत का सवाल कहाँसे आया ? विवाद से सिर्फ तात्त्विक भूमिका स्पष्ट होगी. इस पूर्वार्ध में अबतक हम किसी भी नतीजे पर नहीं पहुँचे हैं. केवल अपनी अपनी भूमिकाऐ स्पष्ट होती जा रही हैं. स्पष्टता की दिशा में विवाद एक प्रक्रिया है. बस्स, इतनाही.‘‘
त्यावर ते म्हणाले, ‘‘सप्तर्षीच्या भूमिकेचा मूळ पायाच मी उखडून टाकलेला आहे. म्हणून मी जाहीर करतो की, जीत माझी झालेली आहे. सप्तर्षीचे म्हणणे होते की, गायींचा रंग वेगवेगळा असला तरी त्यांचे दूध पांढर्‍या रंगाचे असते. गाईंचे दूध पांढरे नसतेच. ते पिवळे असते. (एवढे म्हणून खलनायकाप्रमाणे ते गडगडाटी हास्य करू लागले.) इथंच सप्तर्षी हरले आहेत, हरले आहेत. बोलो श्रीराम... अधर्म का नाश हो!‘‘
हे म्हणत असताना शंकराचार्यांच्या डोळ्यात क्रौर्याची विलक्षण चमक दिसत होती. त्यांच्या बोलण्यापुढे मी हतबल झालो होतो. मी कपाळावर हात लावला. त्या दिवसाची वाद-सभा तेथेच संपली. दुसर्‍या दिवशी सायंकाळी ७ वा. पुन्हा वाद-सभा सुरू करण्याचे ठरले व तसे त्यांनी जाहीर केले. दुसर्‍या दिवशी वादसभेचा निर्णय लागेपर्यंत बसायचे ठरले.
वादसभेला वार्ताहर उपस्थित नव्हते. वृत्तपत्रांमध्ये बातम्या येण्याची शक्यता नव्हती. दुसर्‍या दिवशीची वृत्तपत्रे पाहिली. आश्चर्याचा धक्का बसला. सर्व वृत्तपत्रांनी आदल्या दिवशीच्या वादाची दखल घेतली होती. पुणे शहरातील अखिल ब्राह्मण हादरले होते. ढवळून निघाले होते. शिवसेनेचा मोर्चा निघणार होता. माझ्या निषेधाच्या मुर्दाबाद वगैरेच्या घोषणा देत ते वादसभेच्या स्थानी पोहोचणार होते. माझे मित्र काका वडके व उल्हास काळोखे मोर्चाचे नेतृत्व करणार होते. या मोर्चाला विरोध करणारा दलितांचा प्रति मोर्चाही निघणार होता. या बातम्यांमुळे पोलिसांचा बंदोबस्त कडक होता. सभास्थानी दंगा, गोंधळ होणार अन्‌ ही चर्चा उधळून लावली जाणार अशी गुप्तचर यंत्रणेची माहिती होती. आणखी एक घटना घडली.
‘चातुर्वर्ण्य पद्धतीचा स्वीकार केल्याखेरीज भारताची प्रगती कधीही होणार नाही हे शंकराचार्यांचे विचार म्हणजे दलिताला भळभळणार्‍या जखमेवर तिखटाची पूड टाकल्यासारखे वाटत होते. २१ मार्च १९७३ रोजी उद्यान प्रसाद कार्यालयात वादाचा पूर्वार्ध संपल्यानंतर त्याच रात्री रास्ता पेठेतील गणेश मंदिरात शंकराचार्यांचे प्रवचन होते. तिथे ‘दलित पँथर‘ या संघटनेतर्फे निदर्शने झाली. पँथरचे नेते नामदेव ढसाळ यांनी शंकराचार्यांच्या प्रवचनाच्या वेळी गर्दीत चप्पल फेकली. ती बातमी २२ मार्चच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली.
२२ मार्च रोजी सायंकाळी आम्ही वेळेच्या आधी उद्यान प्रसाद कार्यालयाच्या दारात पोहोचलो. दारापुढे प्रचंड गर्दी होती. सभागृहातील वातावरण शत्रुत्वाचे व वैरभावनेचे आहे हे जाणवत होते. काल सभागृहात हिंदू होते, आज त्यांच्या जागी हिंदुत्ववादी आले होते, बहुतांश चेहरे उग्र दिसत होते. चर्चेचे काय होणार ते कळत नव्हते.
दुसरा दिवस
शंकराचार्य आले. आसनस्थ झाले. पत्रकार, छायाचित्रकर हजर होते. सर्व गोष्टींमागे नियोजन झाल्याचे दिसत होते. त्यांना हा वाद अंगलट येईल असा अंदाज आल्याने तो उधळून लावायचा होता. शंकरचार्यांचे एकतर्फी बोलणे मात्र पार पाडायचे होते. प्रारंभी घोषणा वगैरे झाल्या, मग महाराजांनी एकतर्फी जाहीर केले की प्रथम ते बोलतील, नंतर मी बोलायचे, मी म्हणालो, ‘‘महाराज, आपण कालचे नियम बदलता आहात, एकेक मुद्दा घेऊन काल चर्चा होत होती. आज मला न विचारता हा बदल कसा ?‘‘ त्याबरोबरच सभागृहात गोंधळ सुरू झाला. ‘ए चूप बैस, हाणा रे हाणा त्याला. आम्ही महाराजांचे प्रवचन ऐकायला आलोय, मध्ये मध्ये बोलू नकोस ए, त्याला बाहेर काढ रे!‘ असे आवाज. मी सभात्याग करावा अशी त्यांची इच्छा होती. तसे त्यांचे नियोजन दिसले. मी म्हणालो, ‘ठीक आहे. तुमचे निवेदन झाल्यानंतर मला प्रत्येक मुद्द्याला प्रत्युत्तर द्यायला वेळ मिळाला पाहिजे. मी तुमचे पोकळ प्रवचन ऐकायला आलेलो नाही.
महाराज रेटून बोलू लागले. मनुस्मृतीचे श्रेष्ठत्व सांगताना शंकरचार्य म्हणाले, ‘यहा तो शास्त्रोका शास्त्र और ग्रंथोंका ग्रंथराज है. इसमें सारे शास्त्रोंका समावेश है. वास्तुशास्त्र, वैद्यकशास्त्र, परिवहनशास्त्र, आहारशास्त्र सब इसमें है. विश्वमें ऐसा एक भी विषय नही की जिसे मनुस्मृतीने स्पर्श नही किया हो.‘ परिवहन म्हणजे ट्रॅफिकचे शास्त्र त्या ग्रंथात अत्यंत उच्चतम विचाराचे आहे हे ऐकल्यावर तर माझे डोके गरगरले, हा माणूस काहीबाही बरळतोय असे वाटू लागले. माझ्या तोंडून ‘कुछ भी बक रहे है‘ असे शब्द नकळत उमटले. ते इतरांना फारसे ऐकू गेले नाहीत. पण महाराजांनी ऐकले, त्यांनी मला दटावले, ‘चूप बैंठो, बीचमें मत बोलो. सभाशास्त्रके कुछ नियम होते हैं. मैं बोल रहा हूँ, समजते नही.‘ त्यांच्या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. खरोखर तिथून निघून जावे असे मला वाटत होते, पण प्रतिवाद करण्याची संधी मिळेल अशी आशा माझा पिच्छा सोडत नव्हती. आशा वेडी असते. ते गडबडले होते. सावरण्यासाठी त्यांनी घोषणा दिल्या.
प्रवचन झाल्यावर शेवटी तर त्यांनी धमालच केली. ते म्हणाले, ‘‘ये समाजवादी सबकी समानता मानते है. इनको स्त्री- पुरुष भेदभी मंजूर नही. मैं सब पुरुषोंको एक सवाल पूछना चाहता हूँ. आपमेंसे कौन महिला या तृतीयपंथी बनना चाहता है ? वे हाथ उपर उठाये.‘‘ नंतर त्यांनी असाच प्रश्न महिला वर्गाकडे पाहून केला, ‘‘तुमच्यापैकी समाजवाद आल्यानंतर कोण पुरुष वा तृतीयपंथी बनायला तयार आहे ? हात वर करा.‘‘ दोन्ही वेळा कुणीच हात वर केला नाही. महिला तर या प्रश्नावर लाजून लाजून थकल्या. लगेच महाराजांनी निर्णय जाहीर केला, ‘‘हम जीत गये, समता, समाजवाद किसीको पसंत नही. बोलो...‘‘
ते कंटाळवाणे प्रवचन एकदाचे संपले, मी ताडकन उठून आदल्या दिवशीच्या जागेवर महाराजांच्या शेजारी उभा राहिलो आणि ध्वनिक्षेपक मिळण्याची वाट पाहू लागलो.
त्याच क्षणाला गडबड सुरू झाली. काका वडके यांच्या नेतृत्वाखाली कसबा पेठेतील शिवसैनिक ओरडू लागले.
‘‘पहिल्यांदा माफी माग, मग बोल.‘‘ शिवसैनिकांचा कल्ला.
‘‘कशाची माफी ? कोणत्या चुकीबद्दल ?‘‘ मी.
‘‘काल तू हिंदू धर्माच्या प्रमुखांना, शंकराचार्यांना जोडा मारलास, त्याबद्दल. माफी मागितल्याशिवाय आम्ही तुला बोलू देणार नाही. आमच्या भावना दुखावल्या आहेत. सांगून ठेवतो.‘‘ कसबानिवासी शिवसैनिक.
‘‘मी जोडा मारलेला नाही. माझा हिंसेवर विश्वास नाही हे जगजाहीर आहे. दलित पँथरवाल्यांनी जोडा फेकला. तसे त्यांनी जाहीरपणे म्हटले आहे. त्यांचे पत्रक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. जोडा मारणे चूकच आहे.‘‘ मी.
मत मारो सप्तर्षीको. मैं उसको मारने नही दुँगा
तेवढ्याच शंकराचार्य म्हणाले, ‘‘तुम मुझे जूते मारनेके लिए जिम्मेदार हो. निश्चित रूपसे जिम्मेदार हो. तुम्हारे विचारोंसे दलित मेरे खिलाफ उत्तेजित होते हैं. उत्तेजनाके कारण वे जूते मारते हैं. तुमको माफी मांगनी पडेगी.‘‘
‘‘महाराज, यह मुझपर सरासर अन्याय है. बहस करनेका साहस नही है आपके पास. आपने लंबा प्रवचन दिया. अभी मेरी बारी है. तो आप विवादको लालनेके लिए बहाना बना रहे हो. यह तो चिटींग है.‘‘ अन्‌ अचानक महाराज आसनावरून उठले. माझ्या दिशेने आले. माझ्याभोवतीचे कार्यकर्त्यांचे संरक्षककडे तोडून ते जवळ आले. मला चिकटून, माझ्याकडे पाठ करून दोन्ही हात लांब फैलावून उभे राहिले. शांतपणे त्यांनी पोज घेतली. सर्व फोटोग्राफर जमल्याची खात्री करून घेतली. त्यांच्या तोंडाजवळ माइक धरण्यात आला. पण ते म्हणाले, मत मारो सप्तर्षीको. मत मारो मैं उसको मारने नही दुँगा. आपसे मैं सहमत हूँ. उसने मेरी माफी मांगनी चाहिए, तबतक उसे मोक्ष प्राप्त नही होगा. लेकिन वो माफी नही माँगेगा. उसको मार पडी, तोभी तो माफी नही मांगेगा. बहुत उर्मट है. ये समाजवादी मानवके हकतक समताको सीमित रखते हैं. अधिक समतावादी हैं. हिंदू धर्म, समाजवादसे महान है. मै हिंदुओंका पीठाधीश और प्रमुख आचार्य हूँ. सबको मुक्ती देनेकी- जिम्मेदारी मेरी है. सप्तर्षी जबतक माफी नही माँगेगा. तबतक उसकी आत्माको मुक्ती नही मिल सकती. लेकिन मुझे तो उसके मुक्ती की घोर चिंता है. मुझे मेरी जिम्मेदारी निभानी पडेगी. इसलिए भक्तों, सप्तर्षीकी ओरसे मैं मेरी माफी मांगता हूँ.‘‘
हा माझ्यावर सरळसरळ अत्याचार होता. या प्रकाराला माफीची दांडगाई असे म्हणता येईल. काही करून सप्तर्षी हारला. ‘त्याने माफी मागितली. ‘अखिल हिंदू चिडून त्याला मारायला उठले होते. पण शंकराचे अवतार असलेल्या क्षमाशील महान शंकराचार्यांनी हिंदूंच्या रोषापासून त्याला वाचवले. ‘एवढ्या गोष्टी त्यांना बातमीपुरत्या पाहिजे होत्या. त्यासाठी हा बनाव रचण्यात आला होता. धर्माच्या नावाखाली चाललेल्या ढोंगाची मला शिसारी आली. खोटारडेपणाचा हा बनाव पाहून त्यावेळी मला घृणा वाटू लागली. ही मंडळी शेकडो वर्षांचा हिंदू धर्म नष्ट करणार याबद्दल खात्री झाली. फोटो काढून झाल्यानंतर शंकराचार्य परत आसनस्थ झाले. त्यांचा डाव पूर्ण झाला होता. सभागृहात शांतता होती. फोटोचा कार्यक्रम पार पाडल्याबरोबर शिवसेनेच्या नेत्यांनी बॅडमास्टरप्रमाणे हाताने अनुयायांना शांत राहण्याबद्दल खुणावले. यंत्रे शांत झाली. काही क्षण ‘झिरो अवर‘ निर्माण झाला.
अचानक मी मोठ्याने आरोळी ठोकली. ‘मला माइक द्या. मला माइक द्या. मी माफी मागायला तयार आहे.‘‘ ‘तिळा दार उघड‘ हा अलीबाबांच्या गुहेचा दरवाजा उघडण्यासाठीचा मंत्र होता. तसेच हे होते. माझ्याकडे एकमेव शस्त्र उरले होते. ‘माफी मागतो‘ हा शब्द विजेसारखा परिणामकारक ठरला. काही तरुण धावले. त्यांनी माइक माझ्या पुढ्यात ठेवला. माफी हा जादूचा शब्द होता. कुणीतरी आवाज केला. ‘‘ए, फक्त माफी माग. जादा बोलू नकोस.‘‘ मी लगेच म्हणालो, ‘‘मला एकदम पिनड्रॉप शांतता हवी. कुणी आवाज करून अडथळा केला, तर मी माफी मागणार नाही.‘‘ माफी हे फार मोठे आमिष होते. ते लॉलीपॉप हिंदुत्ववाद्यांसमोर धरले होते. सगळे शांत झाले. नंतर मी धीरगंभीर आवाजात म्हणालो, ‘‘आज मला एक नवा व अद्‌भुत साक्षात्कार झाला. एखाद्याला प्रामाणिकपणे आपली चूक नाही असे वाटते. दुसर्‍याला मात्र त्याने न केलेल्या कृत्याची माफी मागावी असे वाटते. माफी म्हणजे अप्रत्यक्षरीत्या दिलेला कबुलीजबाब असतो. न केलेल्या कृत्याबद्दल कबुलीजबाब कोण देईल, असे मला आजवर वाटत होते. परंतु आताच माझ्या वतीने शंकराचार्यांनी त्यांची म्हणजे स्वतःची माफी मागितली. त्यामुळे एकजण दुसर्‍याच्या वतीने माफी मागू शकतो हे नवीनच ज्ञान मला झाले. या ज्ञानाचा वापर करून आणि त्याच न्यायाने खूप वर्षे राहून गेलेली एक माफी मी मागणार आहे. त्यात सर्वांचे भले सामावलेले आहे.‘‘ नंतर मी थोडा पॉज घेतला. ‘‘पंचवीस वर्षांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून नथुराम गोडसे नावाच्या ब्राह्मण कुळात जन्मलेल्या एका माथेफिरूने केला. मराठी जनतेने तेव्हापासून ब्राह्मण जातीचा द्वेष सुरू केला. ब्राह्मण म्हणाले की, नथुराम एक व्यक्ती होती, एका व्यक्तीच्या गैरकृत्याला अखिल जातीला जबाबदार धरणे चूक आहे. पण महाराष्ट्राचे वातावरण द्वेषमुक्त व्हावे या महान हेतूने मी अखिल मराठी ब्राह्मण समाजातर्फे महाराष्ट्राची जाहीर माफी मागत आहे.‘‘
माझ्या तोंडून माफीचे वरील वाक्य बाहेर पडल्याबरोबर लगेच प्रचंड गोंधळ माजला. सभा संपली होती. धक्काबुक्की सुरू झाली. पण बाहेरची गर्दी अधिक असल्याने फक्त बाचाबाची झाली.
२२ मार्च १९७३ रोजी रात्रीच्या गाडीने शंकराचार्य मुंबईस जाण्यास निघाले. ते कुठल्या गाडीने पुणे सोडणार, कधी सोडणार ही बातमी गुप्त ठेवण्यात आली होती. तरी पण पुण्यातल्या युवक काँग्रेसला ही बातमी कळलीच. त्या काळात ती संघटना सजग व सक्रिय होती. तासाभराच्या अवधीत युवक काँग्रेसचे सुमारे चारशे कार्यकर्ते पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर जमले. त्यांनी जोरदार निदर्शने केली.
या काळात म्हणजे तब्बल ३१ वर्षांनंतर हा लेख लिहिण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न कुणाला पडेल. पण धर्माच्या नावाखाली खोटारडेपणा, दांभिकपणा सध्या मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर ब्राह्मण्य, हिंदुत्ववाद व फॅसिझम ही मूळ एकाच प्रवृत्तीची अलग अलग रूपे आहेत याची खात्री वाटू लागली आहे. शंकराचार्य प्रवृत्ती पुनः पुन्हा सामोरी येणार आहे. तरुणांना या प्रवृत्तीच्या अंतरंगाची ओळख करून द्यावी असा या लेखामागचा हेतू आहे. शंकराचार्यांशी झालेल्या वादाची कहाणी कधी शिळी होत नाही.
सत्याग्रही विचारधारा, दिवाळी २००२ च्या अंकातून साभार
डॉ. कुमार सप्तर्षी
http://googleweblight.com/?lite_url=http://www.loksatta.com/daily/20041128/sun04.htm&ei=wbOTeEzO&lc=en-IN&s=1&m=322&host=www.google.co.in&ts=1471454305&sig=AKOVD67ohUHY_nJFfyQTi3c2xOM1j3ZdhA

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा