सोमवार, ३० जानेवारी, २०१७

एका रात्री भगवान विष्णु RSS च्या सरसंघचालकांना झोपेतून उठवतात व सांगतात की, 'मी भारताला हिंदू राष्ट्र बनवत आहे आणि भारतातल्या सर्व मुस्लिमांना, बौद्धांना नि ख्रिश्चनांना जादुने एका रात्रीत देशाबाहेर पाठवत आहे.'

(ही रूपक कथा आहे. कुणाला कथेत आणि नावातही आजच्या वास्तवाशी साधर्म्य सापडले तर तो योगायोग समजावा.)

एका रात्री भगवान विष्णु RSS च्या  सरसंघचालकांना झोपेतून उठवतात व सांगतात की, 'मी भारताला हिंदू राष्ट्र बनवत आहे आणि भारतातल्या सर्व मुस्लिमांना, बौद्धांना नि ख्रिश्चनांना जादुने एका रात्रीत देशाबाहेर पाठवत आहे.'

सरसंघचालक घामाघूम.

ते विष्णुचे पाय पकडून गयावया करतात— 'नको, भगवान, नको; त्यांना इथेच राहू देत. बाकी कुणी नाही तरी मुस्लिम तर नक्कीच इथे राहायला पाहिजे.'

विष्णु— 'अरे, छान. तू तर आता बसवेश्वर, नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी महाराज, शाहू महाराज, गाडगेबाबा यांच्या सहिष्णु विचारांचा झाला आहेस.'

सरसंघचालक चूप.

विष्णु दरडावून— 'तू जर खरे कारण सांगितले नाही तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होतील.'

सरसंघचालक— 'भगवान, मुस्लिम आहेत तोवर आम्ही त्यांच्याबद्दल कांगावा करत रहातो. ते गेले तर जनता इतर प्रश्नांकडे वळेल, आणि आमची पंचाईत होईल.'

विष्णु— 'विस्ताराने बोल.'

सरसंघचालक— 'जसे सर्व राजकीय, आर्थिक, प्रसिद्धी माध्यमे, नोकरशाही, उद्योग, आयटी, व्यावसायिक संस्था, न्यायसंस्था, संपूर्ण प्रायव्हेट सेक्टर अगदी सैन्यातसुद्धा संपूर्ण वर्चस्व दहा टक्क्याहून कमी लोकसंख्या असलेल्या जातींचेच आहे, ही चर्चा होऊ लागेल. इतर सर्व क्षेत्रात आम्ही अनेक दशके टिकून राहूच. पण राजकीय सत्ताही लगेच सोडावी लागेल. तसेच या महाराष्ट्रात आमचा मुख्यमंत्री व आमचा केंद्रीय मंत्री हे दोघे आज दिमाखाने, सर्व मध्यम व कनिष्ठ जातींच्या नाकावर टिच्चून संघ गणवेषात कसे येतील.'
सरसंघचालक पुढे म्हणाले, 'भगवान, मुस्लिमांचा बागुलबोवा उभा केला नाहीतर  ह्या  बहुसंख्य जातींच्या लक्षात येईल की हिंदुत्वाच्या नावावर ते आमची सेवा चाकरी व शिपाईगिरी करत आहेत. मग ते आमच्यावरच उलटतील.'

विष्णु— 'खरे बोलण्याची तुझ्याकडून अपेक्षा नव्हती.भीतीपोटी का होईना आज खरे बोललास.तेव्हा घाबरू नकोस. भारत हे धर्मनिरपेक्षच राष्ट्र राहील! मुस्लिम येथेच राहतील.'

एवढे म्हणून विष्णु अंतर्धान पावतात. सरसंघचालक घाम पुसत सुटकेचा निःश्वास टाकतात. - रामचंद्र विष्णू भागवत.

https://www.facebook.com/groups/814241122039716/permalink/872908032839691/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा