सोमवार, ३० जानेवारी, २०१७

हिंदू धर्म रसातळास जाण्याची कारणे, प्रबोधनकार ठाकरे

बुकबाजी हे प्रबोधनकारांचं मोठं व्यसन आणि इतिहास हा आवडता विषय. त्यामुळे या विषयातली सगळी महत्त्वाची पुस्तकं त्यांच्याकडे असत. उत्पन्न बेताचं असतानाही त्यांनी कधी त्यात पुढेमागे पाहिलं नाही. अशाच प्रसंगी त्यांना `डिक्लाईन अँड फॉल ऑफ धी हिंदूज’ हा एस. सी. मुकर्जी यांचा ग्रंथ सापडला. त्यांच्या भारतीय इतिहासाच्या लाईनवर हा ग्रंथ फिट बसत होता म्हणूनच त्यांनी याचा अनुवाद मराठीत मोठ्या आवडीने केला आणि छापला.

-------------------------------------

हिंदुजनांचा –हास आणि अधःपात बॅरिस्टर एस. सी. मुकर्जी कृत THE DECLINE & FALL OF THE HINDOOS नामक इंग्रेजी ग्रंथाचा मराठी अनुवाद अनुवादक, मुद्रक व प्रकाशक – केशव सीताराम ठाकरे प्रबोधन मुद्रणालय, ३४५ सदाशिव पेठ, पुणे शहर किंमत एक रुपया हे पुस्तक श्रीयुत केशव सीताराम ठाकरे यांनी प्रबोधन मुद्रणालय, ३४५ सदाशिव पेठ, पुणे शहर येथे छापून प्रसिद्ध केले. या मराठी अनुवादाचे व त्यावरून इतरदेशी भाषात भाषांतरे करण्याचे सर्व हक्क श्री. ठाकरे यांच्या स्वाधीन आहेत पुस्तके मागविण्याचा पत्ता व्यवस्थापक, प्रबोधन कचेरी, ३४५ सदाशिव पेठ, पुणे शहर.

-------------------------------------

ग्रंथ परिचय मराठी पेहरावात म-हाठ्यांच्या हाती पडणारा हा निबंध प्रथम इंग्रजी भाषेत कलकत्त्याच्या इंडियन रॅशनॅलिस्टिक सोसायटीच्या सभेत तारीख ७ सप्टेंबर १९१९ रोज लेखक श्रीयुत एस. सी. मूकरजी, बार-अट-लॉ यांनी वाचला. सोसायटीच्या मासिक बुलेटीनच्या नोव्हेंबर १९१९च्या अंकात तो छापून प्रसिद्ध झाला. यातील विचारांचा विद्वज्जनात एवढा गौरव झाला की,कलकत्त्याच्या इंडियन डेली न्यूज पत्राच्या संपादकांनी हा निबंध ५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत आपल्या दैनिकाच्या अंकांत हप्त्याहप्त्याने छापून पुनर्प्रकाशित केला. त्यामुळे या निबंधाला इतकी विलक्षण मागणी आली की अखेर इ. रॅ. सोसायटीला तो पुस्तक रूपाने प्रसिद्ध करावा लागला. भारतमहर्षि डॉ. सर पी. सी. रॉय यांनी या निबंधाला प्रस्तावनेचा आशीर्वाद देऊन, ``भरतखंडाच्या पुनरुज्जीवनाचा खास संदेश’’ अशी त्याची सूत्रबद्ध स्तुती केल्यानंतर, प्रस्तावनेदाखल अधिक कोणी काही लिहिण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ``रंगविण्या लिलि धजला’’ या शेक्सपियरोक्ती प्रमाणे स्वतःस उपहासास्पद करून घेणेच होईल. प्रस्तुत निबंधाचे इंग्रजी पुस्तक `डिकलाईन अँड फॉल ऑफ धी हिंदूज’ सन १९२० साली माझ्या वाचनात आले आणि त्याचा मराठी अनुवाद करण्याची प्रेरणाही त्याचवेळी माझ्या मनात आली. माझे परममित्र बॅरिस्टर मुखर्जी (पाटणा, बिहार) यांना हा मनोदय कळविताच, त्यांनी कसल्याही प्रकारच्या अटी न घालता मराठी अनुवादाची शुद्ध दार भावनेने आणि राष्ट्राभिमानाने परवानगी दिली. भाषांतरास सुरुवात केली आणि प्रबोधन पाक्षिकातून त्याच हप्ते छापण्यास १९२१ साली आरंभ केला.
हिंदुसमाजाच्या काळजाला झोंबलेल्या भिक्षुकशाही ब्राह्मणांच्या मुर्दाड स्वभाव-प्रवृत्तीची या ग्रंथात दिलेली इतिहासप्रसिद्ध चित्रे अत्यंत मननीय आहेत. हिंदुजनांच्या आत्मोद्धाराच्या प्रत्येक सुधारक चळवळीला जमीनदोस्त करण्याच्य कामी भिक्षुकशाही कधी नमते, कधी वाकते, तर कधी जुळते घेऊन, जरा थोडी संधी सापडताच, एकदम उचल खाऊन, एक दात पाडल्याचा सूड बत्तिशी ठेचून कसा उगविते, हेही अनेक उदाहरणांवरून स्पष्ट दिसून येते. भिक्षुकू वर्चस्वस्थापनेची कारस्थाने पार पाडण्यासाठी परक्यांना हाताशी धरून, वेळी त्यांचे पाय धरून, ब्राह्मणेतर स्वदेशबांधवांना चिरडून टाकण्याचे भिक्षुकशाहीने केलेल प्रयत्न, रजपूत विरुद्ध बौद्ध, शंकराचार्य विरुद्ध बौद्ध इत्यादी प्रकरणात निःसंदिग्ध पुराव्यानिशी आढळून येतात. बौद्धधर्माच्या पाडावाची भिक्षुकी कारस्थाने चालू मन्वंतरात विचारी वाचकांना नानाविध विचारांचे ब्रह्मांड खुले करून दाखवतील, यात मुला मुळीच शंका वाटत नाही. विशेषतः पृ. १५८वर बौद्धांच्या ससेहोलपटीतूनच आद्यशंकराचार्यांनी हिंदू समाजात अस्पृश्यता प्रथमच निर्माण केली, हा इतिहास विचार करण्यासारखा आहे. कितीही आणि कसाही विचार केला तरी ``जातीभेदाचा पुरस्कार करणारी सामाजिक क्षेत्रांतली भिक्षुकशाही म्हणजे हिंदुस्थानाला जडलेली व्याधी होय.’’ हा भारतमहर्षि प्रफुल्लचंद्र रॉय याचा रोखठोक अभिप्रायच सर्वत्र प्रत्ययास येत आहे. असा स्थितीत या हिंदुभारताच्या आत्मोद्धाराचा मार्ग कसा चोखाळावा, हे प्रस्तुत ग्रंथाच्या वाचन मनन निदिध्यासाने अखिल हिंदू भगिनी बांधवांना नीट कळेल, असा मला भरवसा आहे.प्रबोधन कचेरी ३४५ सदाशिव पेठ, पुणे शहर. ता. १ डिसेंबर १९२६ देशबांधवांचा नम्र सेवक केशव सीताराम ठाकरे
सारांश, भिक्षुकशाही म्हणजे आमच्यावर्तमान दुर्दैवी अधःपाताची खाणचम्हटली पाहिजे. ज्या तोंडाने राजकीय हक्क आणि ब्रिटिश नागरिकत्वाचे अविछिन्न अधिकार मागण्यासाठी आम्ही मोठमोठ्याने वल्गना करतो, त्याच तोंडाने अवनत देशबांधवांच्या बुचाडून घेतलेल्या हक्कांना परत देण्याविशयी अथवा त्यांच्यावरील आपल्या सत्तेचा चाप लवमात्र ढिला करण्याविषयी, आम्ही कधी क ब्र तरी काढला आहे काय? वातावरणात आता लोकशाहीचे मेघ जमू लागले आहेत. सारे वातावरण लोकशाहीने दुमदुमू लागले आहे. अशा वेळी आमच्या अवनत देशबांधवांना जर आम्ही हात देऊन वर उचलणार नाही, उदार मनाने सामाजिक क्षेत्रांत योग्य ठिकाणी त्यांची स्थापना करणार नाही, तर राजकीय हक्कांसाठी नित्य चालणारा आमचा हलकल्लोळ म्हणजे पोकळ वल्गनांचा शुद्ध तमाशा होय, असे मानण्यास काही हरकत नाही.श्रीयुत मुकर्जी हे उच्चजातीय ब्राह्मण आहेत. तथापि हिंदू जनांचा –हास व अधःपात यांच्या कारणांची तात्विकदृष्ट्या मीमांसा करताना त्यांनी आपली सहृदयता आणि राष्ट्राभिमानाची तडफ अत्यंत उत्कटतेने व्यक्त केलेली आहे. माझ्या सर्व देशबांधवांनी प्रस्तुत प्रबंध अवश्य विचारात घ्यावा, असी माझी शिफारस आहे. पी. सी. रॉय धी युनिवर्सिटी सायन्स कॉलेज २१ डिसेंबर १९१९

हिंदुस्थानाला इतिहासच नाही, किंवा इतिहासविषयक बुद्धी कधी आमच्यात परिणतच झाली नाही. पण ही गोष्ट अजिबात खोटी आहे. उठल्यासुटल्या आमच्यावर असला आरोप करणा-या शहाण्यांना आमचा इतिहास अभ्यासण्याइतकी प्रवृत्ती नसते किंवा संशोधनाची अक्कलही नसते. पुराणांची गोष्ट सोडून द्या. रामायण महाभारत ही आमची राष्ट्रीय महाकाव्ये मुळातून वाचण्याची कितीकांनी तसदी घेतलेली असते बरे? आमच्या देशाचा इतिहास व भूगोल, त्याचप्रमाणे प्रसिद्ध प्रसिद्ध राजघराणी व ऋषीकुळे यांच्या वंशांची माहिती पुराणात चांगल्याप्रकारे आढळते. अर्थात प्राचीन भारताचा संपूर्ण इतिहास व भूगोल पुराणग्रंथांत आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त होणार नाही. तथापि अजून बराच इतिहासाचा भाग उकरून काढावयाचा आहे. त्याचे बरेचसे तुकडे आमच्या धर्मग्रंथांतून व स्मृत्यांतून त्याप्रमाणे चिनी, तिबेटी, ब्रह्मी, सयामी आणि सिंगाली असा अनेक भाषांच्या ग्रंथात इतस्ततः पसरलेले आहेत. त्यांचे एकीकरण केले पाहिजे. शोधा म्हणजे मिळेल, या सूत्रानुसार आपले प्रयत्न झाले पाहिजेत. परंतु या निंदकांच्या निष्कारण निंदेमुळे तुमचे मायदेशावरील प्रेम विश्वास व शोधक वृत्ती यांचे पाय लटपटू देण्याचे काहीही प्रयोजन नाही. आमचे आक्षेपक आणखी असे सांगतात की या देशांत अनेक मानववंशांचे समूह राहत असल्यामुळे हिंदुस्थान ही नुसती भौगोलिक संज्ञा आहे. यावर माझा त्यांना जबाब असा आहे की, अहो! तुम्ही आंधळे आहात; तुमचे डोळेच फुटल्यामुळे भैदांतच अभेदाचे वैभव तुम्हाला कसचे दिसणार? काश्मीरपासून कामोरीनपर्यंत, जलालाबादपासून चितागांगपर्यंत आणि पलीकडे कुणीकडेही पाहा सर्वत्र हिंदू संस्कृतीचाच अंमल पसरलेला आहे. ही संस्कृती सध्या जरी अवनत स्थिती आहे तरीदेखील आमच्या अभिमानापुरतदीही काही लहानसहान गोष्ट नव्हे आजला हिंदुस्थान आणि हिदुत्व ही दोन्ही संक्रमणावस्थेत आहेत. मध्ययुगात त्यांच्या अंगावर वाढलेलेपापुद्रे आज खळखळ कोसळून पडण्यास सुरुवात झाली आहे; आणि आपण स्वतःशी किंवा आपल्या मायदेशाशी जर प्रतारणेचे पातक करणार नाही तर आत्मशुद्धीचा व आत्मोद्धाराचा उषःकाल व्हायला काही वेळ लागणार नाही. अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा सर्वत्र अंधार पसरल्यामुळे निरनिराळ्या भेदांची पिशाच्चे आज आपणांस भेवडावीत आहेत. परंतु आपण सर्व भारतवासियांनी प्रेमाने व निःस्वार्थ बुद्धीने खांद्याला खांदा भिडवून राष्ट्रकार्याची लगबग केली, तर ज्या शास्त्रीय ज्ञानाची व व्यापक दृष्टीची आपण मार्गप्रतीक्षा करीत आहोत, त्यांना बरोबरच घेऊन उगवणा-या प्रबोधनाच्या सूर्यप्रकाशामुळे त्या भुतांच्या भूतचेष्टा आपोआपच नष्ट होतील. `जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि’ हा उज्वल ध्येयमंत्र आमच्या अंतःकरणावर ठसठशीत कोरलेला
सताही मातृभूमीच्या प्रेमाच्या बाबतीत इतर राष्ट्रांनी आमच्यावर वरचढ करावी काय? हे जर खरे असेल, तो मंत्र आमच्या हृदयातून साफ पुसून गेला असेल आणि आमच्या मातृभूमिप्रेमात खरोखरच जर विरजण पडले असेल तर मग - तर मग काय? – झाला, संपूर्ण अधःपातच झाला! या लोकी मोक्ष तर नाहीच, पण परलोकी सुद्धा नाहीच नाही! मला एक दिवस असे स्वप्न पडले की मला कोणी उचलून हिंदमातेच्या मांडीवर ठेवले. मी तिच्याकडे पाहतो तो तिला मूर्छना येत असलेली दिसली. मी चटकन उठून प्रेमाच्या झटक्याने तिला पाठुंगळी मारली आणि चिंताक्रांत स्थितीत दवाखान्याकडे धावत सुटलो. तेथे बरेच डॉक्टर लोक होते. माझ्या आईला त्यांना काही उपचार करावा म्हणून मी तिला त्यांच्यासमोर टेबलावर हळूच निजविले. ते काही उपचार करणार तोच तिने एक दीर्घ श्वास सोडला आणि मी जागा झालो. आज आपल्यापुढे मी ठेवीत असलेल्या ह्या निबंधाचे लेखन मी जागा होताच तात्काळ हाती घेतले. आपल्या अधःपातासंबंधाने विचार करताना काही आध्यात्मिक बिनमुर्वत तत्त्वांचा आपणांस अवश्य विचार करणे प्राप्त आहे. या तत्त्वांचे मी दहा विभाग पाडले आहेत. ते असे – (1) `जमका अजब तडाखा’ जसा कोणास टालता येणे शक्य नाही. तसे कर्मन्यायाच्या चरकातून कोणास निसटचा येणे शक्य नाही. तुमचा दोष कितीही क्षुल्लक असो, त्याबद्दल यथातथ्य प्रायश्चित्त द्यायला कर्मन्याय तुम्हाला वाटेल तेथून हुडकून काढील. (2) जेस पेरावे तसे उगवते. (3) जसे करावे तसे भरावे (4) राष्ट्राचे जीवित असो किंवा व्यक्तीचे जीवित असो, त्याला अचेतन अशी स्थिरावस्था प्राप्त झाली की त्याच सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. (5) सत्य नीति आणि न्याय मिळून धर्म होतो. या धर्मावरच मानवी समाजाचे धारण होत असते. (6) ढोंगीपणाच्या दंभोक्तीची सूत्रे अनीतिमत्तेची फार वेळ तरफदारी करू शकत नाहीत. किंवा नीतिमत्तेचे पांघरलेले सोंग या सूत्रांना फार वेळ झेपतही नाही. (धर्माच्या नावावर रचलेली दांभिक सूत्रे नीतिमत्तेचे समर्थन करू शकत नाहीत.) (7) धर्मपालनाच्या भरती ओहोटीप्रमाणे राष्ट्रांचे व साम्राज्याचे अस्तोदय होत असतात. (8) या जगात केलेल्या पातकाच्या प्रायश्चित्तापासून सवलतीची सूट मिळविलेले एकही राज्य, राष्ट्र, जात अथवा व्यक्ती सापडणे मुष्कीलीचे आहे. (9) काळाचे चक्र हळूहळू फिरते; कोठच्या दिशेने वारा येऊन त्याला केव्हा कशी गति मिळेल त्याची कोणाला दाद नसते, परंतु त्याची घरटी एकदा फिरू लागली की त्यात सापडेल त्याचे मात्र वस्त्रगाळ पीठ पडते. (10) घराचे वासे एकमेकांशी आडवे तिडवे वागू लागले की त्या घराचा डोलारा जमीनदोस्त झालाच समजावे.
हिंदुजन प्रामाणिक, सत्यप्रिय आणि कायदा मानणारे असून, ते हत्या करीत नाहीत किंवा मादक दारूही पीत नाहीत. हर्षानंतर झालेले मगध देशाचे सेन राजे आणि गौड देशाचे (बंगालचे) शशांक राजे हे सर्वस्वी आपल्या ब्राह्मण मंत्र्यांच्या ओंजळीने पाणी पिणारे निपजले. अर्थात ते आपल्या बौद्ध प्रजेला तलवारीच्या धारेवर धरू लागले. सरकारी देणग्या बंद करण्यात आल्या, तेव्हा नालंदाची जगप्रसिद्ध बौद्ध युनिव्हर्सिटी रसातळाला गेली. मोठमोठे मठ, भिक्षुणींची वसतीगृहे, संघ मोडून टाकण्यात आले तेथली सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली. बौद्ध जात मानीत नसत, म्हणून त्या `नि-जात्या’ची सर्वजण टर उडवून छळ करीत. ब्राह्मणी धर्माच्या पुस्तककर्त्यांना तर इतका चेव आला की त्यांनी बौद्ध संस्कृतीच्या सर्व कलांची, वाङ्मयाची, असेल नसेल त्याची राखरांगोळी करण्याचा धूमधडाका चालविला. फार काय, पण बौद्धजनांना पूज्य व वंदनीय असलेल्या पवित्र वस्तू व चिन्हे त्यांनी भ्रष्ट केली; कोठे त्याची अवहेलना व अपमान केला आणि काही तर नाश करून टाकल्या. ८व्या व ९व्या इसवी शतकात सा-या हिंदुस्थानभर शेकडो लहान लहान राज्ये पसरली होती. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. मध्यवर्ती राजकीय नियंत्रणाखाली सत्ता अजिबात नष्ट झालेली. अशा अवस्थेत परकीय सिथियन लोकांच्या टोळ्यांवर टोळ्या येऊन रजपुतान्यावर कोसळल्या आणि तेथल्या आर्य राज्यांना उखडून टाकून, त्यांच्या जागी कायमच्या वस्ती करून बसल्या. या परक्या पाहुण्यांशी मिळते घेणे भागच होते.*१६ हे रजपुतानी सिथियन जेते ब्राह्मणी धर्माशी मित्रत्वाच्या नात्याने वागत आहेत, असे आढळून येताच, भटाब्राह्मणांनी त्यांच्याशी लगट करून, त्या सर्वांना हिदू धर्माची दीक्षा दिली आणि त्यांच्या गळ्यात यज्ञोपवितही अडकविले. हे सिथियन लोक जात्या बलाढ्य लढवय्ये असल्यामुळे, प्राचीन क्षत्रियांची जागा भरून काढण्यास हे सर्वतोपरी लायक आहेत, असे भिक्षुकशाहीने ठरवून टाकले. हिंदुधर्म हा कधीच मिशनरी धर्म नव्हता, असे म्हणणारे लोक खोटे बोलतात, हे यावरून स्पष्ट सिद्ध होत नाही काय? राजपुतान्यातले हे सिथियन वसाहतवाले म्हणजे हिंदुस्थानच्या इतिहासात गाजलेले सुप्रसिद्ध रजपूत होत. इ.स. ७१२त सिंधी मुसलमानांच्या स्वारीला या रजपुतांनी सामना देऊन पिटाळून लावले. या त्यांच्या हिंदसेवेच्या पहिल्याच यशस्वी धडाडीमुळे रजपुतांचा सर्व देशात मोठा गौरव झाला आणि तेव्हापासून राजसदृश असे उच्च वैभव प्राप्त झाले. दिल्ली आणि कनोज ही इतिहासप्रसिद्ध शहरेही त्यांच्या लवकरच ताब्यात गेली. त्यावेळचे रजपूत राजे व्यक्तीशः जरी रणशूर आणि बलाढ्य असत, तरी आतून ते सर्व अहंपणाने आणि परस्पर मत्सराने सडून गेलेले असत. त्यांची राज्ये लहान लहान व इतस्ततः पांगलेली असत. दळणवळणाची साधने व प्रवासायोग्य सडका यांचा पूर्ण अभाव सल्यामुळे, त्यांना परस्पर सहायकारी अशा संयुक्त सत्तेची घटना करता आली नाही. किंवा एखाद्या शत्रूवर संघटनेने चाल करून जाण्याइतक्या परिणामकारक शिस्तीची लष्करी व्यवस्थाही त्यांना लावता आली नाही. त्यामुळे त्या वेळी मुसलमानी स्वा-यांनी हिंदुस्थानात पोखरण घालण्याचा जो उपक्रम केला, त्याला सामना देण्याच्या कामी हे रजपूत पराक्रमी असूनही निरुपयोगी ठरले. फाजील स्तुतीपाठ आणि भरमसाट लाळघोटेपणा यात भिक्षुकशाहीचा ब्राह्मण फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. पराक्रमी रजपुतांची मर्जी संपादन करण्यासाठी भटाब्राह्मणांनी लवकरच एक नवीन युक्ती शोधून काढली. हिंदुत्व आणि यज्ञोपवित यांचा प्रसाद त्यांना आधीच मिळालेला होता. आता, रामायण आणि महाभारतादि काव्येतिहास ग्रंथातल्या आणि पुराणांतल्या ख-याखोट्या प्राचीन क्षत्रिय राजघराण्याशी व देवदेवतांशी या अनेक रजपूत राजांचे संबंध जोडणा-या बनावट वंशावळींची भेंडोळी* १७ ब्राह्मणांनी तयार करून, त्या सर्वांना अगदी खूष करून सोडले. या फाजील प्रतिष्ठेने रजपूत राजे मनस्वी फुगून गेले. त्यांच्याभोवती पसरलेल्या सर्वसंपन्नतेमुळे ते चैनबाजी व ख्यालीखुशालीत दंग झाले. अशा स्थितीत आपल्या दारिद्र्यग्रस्त प्रजेची हालहवाल काय आहे, हे या खुशालचेंडू राजांना कसे दिसावे? आणि दिसले तरी त्यांना का पाहावे? नाना प्रकारच्या विकार विकल्पात मग्न असणा-या या रजपूत राजांची मने ब्राह्मणांनी बौद्धजनांच्या विरुद्ध हवी तशी कलुषित करून खवळून सोडली. या चिथावणीखोर ब्राह्मणांत, रजपुतांना अत्यंत पूज्य असलेल्या, आद्यशंकराचार्यांसारखा जाडी प्रस्थानेच पुढाकार घेतल्यावर काय होणार नाही? इ.स.७५०त दक्षिण हिंदुस्थानात कुमारील भट्ट नामक ब्राह्मण धर्ममार्तंडाने बौद्धांचा नायनाट करण्याचा पायंडा घालून ठेवलेला होताच. इ.स.८३०मध्ये श्रीशंकराचार्यांनी त्याच पायंड्यावर पाऊल ठेवून, रजपूत राजांची मने बौद्धांविरुद्ध खवळून सोडण्याची कामगिरी हाती घेताच, काश्मीर, नेपाळ, पंजाब, रजपुताना आणि गंगा-यमुना नद्यांमधल्या बिहारादी उत्तर-पश्चिम व मध्य हिंदुस्थानच्या सर्व प्रदेशांतून सर्रास बौद्धजनांच्या छळांचा आणि ससेहोलपटीचा भयंक्र उपक्रम, रजपूत राजांनी आणि त्यांच्या ब्राह्मणी – हिंदू सहाय्यकांनी सुरू केला. बिचा-या बौद्धांची स्थिती, या वेळी मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी होती. त्यांची खेडी उद्ध्वस्त करण्यात आली. घरेदारे जाळली लुटली गेली. बायकांची अब्रू घेण्यात आली. पुरुष आणि मुलांना कोठे हद्दपार केले, तर कोठे त्यांची सर्रास कत्तल करण्यात आली. अशा या हलकल्लोळातून जे बौद्धजन कसे तरी लपूनछपून वाचले, त्यांना समाज व व्यवहार-बहिष्कृत करून, लोकवस्तीपासून पार दूर पिटाळून लावले. अर्थात त्याना कमालीतली कमाल नीच अवस्था प्राप्त झाली. उदरनिर्वाहासाठीसुद्धा त्यांना साध्या माणुसकीला साजेशोभेशा सामान्य शिष्ठतेचीही बदी करण्यात आली. आज आमच्या डोळ्यांपुढे वावरणारे हारी, डोम, मच्छी, चांभार, केवरा, बागडी, नामशूद्र, महार, धेड, मांग इत्यादी अस्पृश्य जनांचे संघ या छळवाद होऊन बहिष्कृत पडलेल्या बौद्धजनांचेच अवशिष्ठ भाग आहेत. कुमान नेपाळ इकडे हल्ली ज्या दंतकथा, गोष्टी व इतिहास ऐकण्या वाचण्यात येतो, त्यावरून बौद्धांच्या छळात खुद्द शंकराचार्य आणि त्यांचे अनुयायी यांचा प्रत्यक्ष संबंध किती होता, हे स्पष्ट दिसून येते. खुद्द शंकराचार्यांच्या आज्ञेवरून कथूरिया राजांनी गरवाल कुमान आणि नेपाळांतून बौद्धांना पार पिटाळून लावले. त्यांचे मोठमोठे मठ वगैरे होते. ते सारे शंकराचार्यांना दान दिले व त्यावर त्यांच्या अनुयायांची स्थापना केली. त्यांचे वंशज आजही त्या मठांचा उपभोग घेत आहेत. शंकाराचार्यांनी बौद्ध भिक्षूंना मुद्दाम पशुयज्ञ करावयाला लावले आणि ब्रह्मचर्य व्रताच्या संकल्पाने राहणा-या भिक्षु, भिक्षुणींवर विवाहाची बळजबरी केली. महात्मा गौतम बुद्ध हा महान योगी पुरुषोत्तम होता, हे सर्वश्रुतच आहे. तो निर्वाणपदाला गेल्यानंतर अनेक शतकांनी, त्याच्या अनुयायांना त्या दिव्य महात्म्याचे काही सद्गुण आणि त्याच्या मूर्तीची प्रतिमा चिंतनासाठी, योगधारणेसाठी किंवा एखाद्या साधनेसाठी, दृष्टीपुढे ठेवणे, सोयीचे व अगत्याचे वाटू लागले. तक्षशिला येथील बौद्ध महापाठशाळा म्हणजे त्या वेळी महायान पंथाचे आद्यपीठ समजली जात असे. त्या पाठशाळेने महात्मा बुद्धाच्या मूर्तीच्या प्रतिमेशिवाय आणखी कमळ व सहा योगचक्रे चिंतनात आणण्याची शिफारस केली. तक्षशिला महापाठशाळेचा मुख्य अध्यापक सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ता नागार्जुन, त्याचप्रमाणे इतर प्रोफेसर, शिक्षक, ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट वगैरे मंडळी ज्या या चिन्हांच्या केवळ कल्पनाचित्रांवर चिंतन करीत, त्याच चिन्हांची प्रत्यक्ष दगड, माती व धातूंची चित्रे चिंतनार्थ उपयोगात आणण्याचा उपक्रम गांधार येथील महापाठशाळेत सुरू झाला. याचा परिणाम असा झाला की बुद्धाचे पुतळे आणि योगचिन्हांची कोरीव दगडी चित्रे यांचा सर्व बौद्ध मंदिरात, मठात आणि संघात सर्वत्र सपाटून प्रसार झाला. जेथे जेथे म्हणून बौद्धांची वसती असे, अशा सर्व ठिकाणी बुद्धाचे पुतळे आजही आपल्याला दिसतात, याचे कारण हेच. शंकराचार्य हे शंकराचे कट्टे भक्त, चिंतनमग्न बुद्धाची पांढरी मूर्ती थोड्याशा फेरबदलाने शंकराची मूर्ती बनविणे. हे काम फारसे कठीण नव्हते. शंकराचार्यांच्या आज्ञेने जेथे जेथे अशा बुद्धाच्या मूर्ती आढळल्या, त्यांच्या गळ्यांभोवती सर्पांची वेटोळी खोदून बसवून, त्यांना शंकराच्या मूर्ती बनविल्या.*१८ बौद्ध धर्माचे हिंदुस्थानातून उच्चाटन व हकालपट्टी करण्याच्या कामी क्रूरतेचे, राक्षसीपणाचे, देवदेवतांच्या लुटालुटीचे आणि प्रतिष्ठाभंगाचे या पेक्षा अधिक काय काय भयंकर अत्याचार घडले असतील, त्यांची आज आपण नुसती कल्पनाच केलेली बरी. त्या काळी सहिष्णुता फार महाग झाली होती. खुद्द शंकराचार्यांना सुद्धा तिचे महत्त्व भासले नाही. आपल्या रुद्र दैवताप्रमाणे रुद्रावतार धारण करून त्यांना बौद्धशाहीची पाळेमुळे उखडून काढायची होती. बौद्धधर्माचा सत्यानाश केल्याशिवाय ब्राह्मणी धर्माची पुनर्घटना होणेच शक्य नाही, अशा कल्पनेचे वारे त्यांच्या अंगात संचारले होते. अशा रीतीने शंकराचार्य आणि भिक्षुकशाही यांचा जयजयकार झाला. अखेर त्यांनी जिंकली. पण या विजयाने साधले काय? छोट्यामोठ्या हिंदू राजांच्या असंख्य शिपुर्ड्यांना भाडोत्री मदतीला घेऊन, हिंदुजनतेचा केवळ पाठकणा असणा-या बौद्धांचे निर्मूलन करण्यात मिळालेल्या यशाचे परिणाम काय झाले, हे `आज तुमच्यावर फिरत असलेल्या परिस्थितीच्या वरवंट्याकडे पाहा’ असे काळच बोट दाखवून सिद्ध करीत आहे. कुमारील भट्ट आणि शंकराचार्यांसारखे धर्मक्रांतिकारक लोक आपल्या ध्येय-साधनाच्या आवेशाच्या भरात एक गोष्ट अज्जिबात विसरले की माणसे येथून तेथून सारी मर्त्य, त्यांनी हाती मिळालेल्या सत्तेच्या जोरावर शारीरिक बळजबरीने आणि जुलूम जबरदस्तीने कोणाची कितीही हानी केली, तरी दुधारी तलवारीप्रमाणे ती केव्हा ना केव्हा तरी उलट फिरून प्रत्याघाताचा सूड उगविल्याशिवाय राहणारी नाही. परंतु शंकराचार्य हे जसे ऊर्ध्व महत्त्वाकांक्षी होते, तसेच बुद्धिमत्तेत ते सवाई बृहस्पती होते. विध्वंसक शंकराप्रमाणे रुद्राचे संहारकार्य करूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी ब्रह्मदेवाचीही भूमिका घेऊन विधायक कार्य केले. ब्राह्मणी धर्माचे पुनरूज्जीवन करतानाच, त्यांनी अभिनव भारत (New India) निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हिंदुत्वाला नवजीवन दिले, असे म्हणतात. वेदान्ताची फोड करून त्यांनी हिंदुधर्माला नितांत रमणीय अशा एकतान तत्त्वज्ञानाचे स्वरूप दिले. परंतु हे तत्त्वज्ञान अतिसूक्ष्म व दुर्बोध असल्यामुळे, सामान्य जनतेच्या मनावर त्याची काहीच छाप बसली नाही. विशेषतः जनतेच्याच हाडारक्तामसाचे जे बौद्धजन त्यांच्या शंकराचार्यांनी ज्या कत्तली करविल्या व अखेर त्यांचा नायनाट केला, ते शल्य जनतेच्या हृदयात इतक्या तीव्रतेने सलत होते की शंकराचार्यांच्या कोणत्याही चळवळीत लोकांनी कसलाही भाग घेतला नाही. ते सर्व उदासीनच राहिले. तक्षशिला येथील महापीठाने जाहीर केलेल्या अभिनव बौद्धधर्माच्या तत्त्वांचा हिंदू जनतेच्या मनावर इतका परिणाम झालेला होता की. शंकराचार्यांचा वेदान्त सर्वत्र गर्जत असताही, लोकांत मूर्तीपूजनाचा जुना प्रघात धूमधडाक्याने चालूच राहिला. इतकेच नव्हे तर तंत्रमंत्रांचे सर्व भेसूर प्रकार ते पाळीत होते. यावरून हे स्पष्टच होते की अभिनव भारत निर्माण करण्याची शंकाराचार्यांची जी महत्त्वाकांक्षा होती ती सपशेल फसली. आचार्य समाधिस्थ झाल्यानंत त्यांच्या अनुयायांत जी अधःपाताची कीड पडली, ती पुढे दिवसेंदिवस भयंकर प्रमाणात वाढत गेली. विशेषतः आचार्यांनी मायावादाची जी कल्पना प्रचलित केली, तिचा हिंदू समाजावर इतका घाणेरडा परिणाम झाला की जिकडेतिकडे आढ्याला तंगड्या टेकणारे ऐदी आणि नशिबाला हात लावणारे निराशावादी यांचा सुळसुळाट झाला.*१९ राष्ट्रांतले लोकच जर दारिद्र्याने आणि बेबंदशाहीने चिरडलेले असतील; हव्या त्या जबरदस्ताच्या लुटारूपणाला बळी पडण्याइतकी हतबल बनले असतील; शिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्या बुद्धीची वाढ खुंटलेली असेल; आणि अन्नाच्या दुष्काळामुळे त्यांचा शारीरिक जोम व सोशिकपणा नष्ट झाला असेल; तर कोणी कितीही मोठा बुद्धीवान व पराक्रमी पुरुष असला, तरी तो असल्या राष्ट्राला कसा आणि किती वाचवणार? हवी तशी उधळपट्टी, अधाशीपणा, बेफाम विषयासक्ती आणि मनसोक्त सुरापान या व्यसनांनी जर वाटेल त्या मनुष्याच्या अधःपात होतो, तर ज्या राष्ट्रांत अशी व्यसनाधीन माणसे बोकाळतात त्या राष्ट्रांचा का होणार नाही? १०व्या व १२व्या शतकांच्या दरम्यान रजपूत राजांमध्ये अगम्यगमनाचे व्यसन व आपापसातील द्वेष भयंकर भडकलेले होते. पुरुषांना स्त्रीजातीचा आदर मुळीच राहिलेला नव्हता. त्यांची कामासक्ती इतकी विलक्षण बेफाम झाली होती की स्त्रिया म्हणजे कामशांतीची यंत्र, यापलीकडे ते काही अधिक समजतच नसत. या पाशवी विषयलोलुपतेच्या अतिरेकाबरोबरच संपत्तीची हाव आणि स्वतःसाठी एखाद्या लहानशा राज्याचा स्वतंत्र प्रदेश मिळविण्यासाठी प्रत्येक रजपूत तरुण राजपुत्रांची सारखी धडपड सुरू असे. या तरुण राजपुत्रांच्या बापांच्या – रजपूत राजांच्या – जनानखान्यात राण्या आणि रखेल्या यांच्या टोळ्याच टोळ्या ठेवलेल्या असत. त्यामुळे कोणतीही एखादी राणी अथवा रखेली आपल्या त्या दण्डधारी पतिराजाची फारशी कसलीही किंमत बाळगीत नसे. हिंदुस्थानातल्या हिंदू राजांच्या दरबारात (राजवाड्यात) सरदारांच्या आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या बायका-मुलींना आमंत्रणे येत असत. हुजूरस्वारीची जिच्यावर नजर जाईल, तिची राजशय्यामंदिरात रवानगी झालीच पाहिजे. त्यासाठी हव्या त्या खटपटी लटपटी करण्यात येत असत. प्रसंगी, त्या स्त्रीची मनधरणी करण्यासाठी खुद्द पट्टराणीलाही, कसल्या तरी शिक्षेच्या अथवा मृत्यूच्या भयाने, कुंटणपणा पत्करावा लागे. स्त्रीजातीची इतकी बेइज्जत व अवहेलना होऊ लागल्यावर त्यांनी बंडाचा थैमान का करू नये? खुद्द हुजूर स्वारीच प्रेमपात्रांच्या शिकारीत सदैव बहकलेली, तर जनानखान्यातील राण्यांनीच पातिव्रत्याची कनिष्ठ जोपासना काय म्हणून करावी? त्यांचीही प्रेमपात्रे (लव्हर्स) असत. राजवाडेच जेव्हा या महापातकांनी आरपार सडून गेले. तेव्हा साहजिकच त्यांचा घाणेरडा सांसर्ग थेट सरदार दरकदार नागरिकांच्या घरांपर्यंत पसरत गेला. सरदार व दरकदरादि लोकांना राजाकडून जसे वागविण्यात येई. तसेच हे लोक आपल्या हाताखालच्या लोकांना व मित्रांना वागवीत. (म्हणजे राजाने जर सरदाराची बायको, मुलगी अथवा सून पळवून नेली, तर तो सरदार आपल्या समान दर्जाच्या, किंवा हाताखालच्या लोकांवर अथवा मित्रांवर तोच प्रयोग करीत असे. - अनुवादक) इतकेच नव्हे, तर राजाच्या कुकर्माचा यथातथ्य सूड उगविण्यासाठी हे सरदार लोक आपल्या कारस्थानाची सूत्रे थेट राणीवशात आणि जनानखान्यात वाटेल त्या राजपत्नी किंवा रखेलीपर्यंत नेऊन भिडवीत असत. छिनाल कंपूत एक म्हणच सुरू झाली होती – आणि त्या काळी छिनाल नव्हता कोण? – की हवी ती विवाहित अथवा अविवाहित तरुणी, तोंडाने नुसती शीळ घालताच गळ्यात येऊन पडते. आणि आमचे ब्राह्मण भटजी? समाजाच्या या भ्रष्ट अधःपतनाला त्यांनी काहीच का हातभार लावला नसेल? कदाचित ही वस्तुस्थिती सुधारण्याच्या अथवा तिला आळा घालण्याच्या कामी ते मतिमंद तर नव्हते बनले? 000 अखेर मजल येथवर आली. तरुण राजपुत्रांना स्वतंत्र प्रदेश आणि स्वतंत्र राज्ये यांच्या प्राप्तीची एवढी भयंकर लालसा उत्पन्न झाली की, त्यासाठी आपला राज्यकर्ता बाप शयनमंदिराकडे जात असता, किंवा अनेकांपैकी आपल्या एखाद्या आईसह निद्रावश असता, त्याचा खून करण्यालाही ते मागेपुढे पाहत नसत. विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या घाणेरड्या दुष्कृत्यात या आयांचे खुनशी राजपुत्रांना सहाय्य मिळत असे. शेकडो राण्या. आपल्या प्रौढ मुलाला राजपद मिळावे, अशी प्रत्येकीच इच्छा. पातिव्रत्य पातळ झालेले. निष्ठेचे शून. मग नीतिमत्ता तर कोणाच्या गावी नाहीच. त्यात राजकीय सत्तेची आसुरी लालसा! मग काय होणार नाही? अखेर, राजपुत्राने राजाचा खून करावा, राजपद बळकवावे, सावत्र आया, सावत्र भावांना ठार मारून टाकावे. ही सर्व राज्यांत एक राजमान्य रूढीच होऊन बसली. खुनशी राणीच्या दृष्टीने या रूढीत वावगे काहीच नसे. राजवधाचा प्रयोग पहिल्या प्रथम आपवेळल्या पुत्रानेच करावा, अशी तिची महत्त्वाकांक्षा असे. कारण, आपला पुत्र राजपदाधिकारी झाला की राजमातेचे थोर पद आयतेच आपल्या पायांशी चालून येते. बिनबोभाट खून पाडण्याचा आणखी एक प्रकार असे. आपल्या राजपतीची कामतृष्णा शांत करण्यासाठी राजपत्न्या कुंटिणीचे काम तर करीतच असत. पण आपल्या नव-याचा बिनबोभाट खून करण्याच्या वेळी, चांगल्या निरोगी स्त्रिया शयनमंदिरात पाठविण्याऐवजी, ब्राह्मण भिक्षुकांच्या आणि जडीबुट्टीवाल्यांच्या सहाय्याने एखादी गावभवानी वेश्या हुडकून काढीत. हे सहाय्यक त्या वेश्येच्या शरीरात जालीम विषाची योजना करून ठेवीत. त्यामुळे संभोगस्पर्श होताच राजा चटकन मरत असे, किंवा हातपाय झाडून राम म्हणीत. वाचकहो! मुसलमानाच्या स्वा-या बिनधोक या देशावर का झाल्या, आणि हिंदुस्थानच्या काळजाला त्यांना सफाईत हात का घालता आला, याची आणखी कारण-मीमांसा आपणापुढे केलीच पाहिजे काय? मुसलमानांच्या स्वा-या होण्यापूर्वीच अनेक वर्षे हिंदुसमाजपद्धती सपशेल सडकी कुजकी होऊन बसली होती. प्रतिकार करण्याची काहीही शक्ती तिच्यात उरलेली नव्हती. अंगावर शत्रू चालून आला असता, त्याला संघटित तोंड देण्यासाठी चटकन एकवटण्याची आमची शक्ती आणि बुद्धी ठार मेलेली होती. अर्थात असल्या निर्जीव सांगाड्याला जमीनदोस्त व्हायला काय पाहिजे? एक धक्का बसताच पत्त्याच्या किल्ल्याप्रमाणे धडाड सारा बाजार कोसळला! महाभारताच्या काळापासून आमच्या ब्राह्मणी संस्कृतीचा प्रवाह प्रगतीच्या मार्गाने एकसारखा वाहत होता, त्यामुळे सारी जनता दुधामधाच्या समृद्धीत सुखसंपन्न होती, पण अवचित हे म्लेंच्छ मुसलमान आले आणि त्यांनी आमच्या हिंदुराष्ट्राची धूळधाण केली; असा एक मूर्खपणाचा आणि चुकीचा समज अजून आमच्या लोकांत आहे. त्या बिचा-यांना वाटते की रामाचा आणि युधिष्ठिराचा काळ संपताच एकदम मुसलमानी टोळधाड या देशावर कोसळली आणि त्यांच्या रियासतीला सुरुवात झाली. मुसलमानांच्या या देशात प्रवेश होण्यापूर्वी शेकडो शतकांचा काळ गेला. हे त्यांच्या लक्षात येत नाही. परंतु मुसलमान येथे येण्यापूर्वी बराच काळ सारा हिंदू समाज भयंकर चिळसवाण्या स्थितीत भ्रष्ट होऊन नासला सडला होता, म्हणूनच मुसलमानांना हादेश काबीज करून येथे राज्यकर्ते म्हणून वसती करता आली. वाचक मित्र! हिंदू जनांचा –हास आणि अधःपात कसकसा होत गेला हे मी आतापर्यंतच दाखविले. यासाठी हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासाची रूपरेषा मला जशी दिसली तशी ती आपल्यापुढे मांडली आहे. विषय पडला मोठा आणि माझा निबंध पडला छोटा. तेव्हा गतेतिहासाचे हे सिंहावलोकन मला धावत्या दृष्टीने करावे लागले आहे, याची मला जाणीव हे. गेल्या अनेक शतकांच्या कटू अनुभवाने शहाणे होऊन, आपल्या समाजाची विशेष सौख्यकारक सुधारणा करण्यासाठी आज तरी हिंदुजन काही खटपट करीत आहेत काय? प्रगतीसाठी उत्क्रांतीचे त्यांचे काही प्रयत्न सुरू आहेत काय? मला तर कोठे काही दिसत नाही. आले घर ठाकठीक व्यवस्थेत बसविणारी एकही समाजोद्धारक चळवळ सध्या हिंदु समाजात चालू असल्याचे मला दिसत नाही आणि माझ्या ऐकिवातही नाही. 000 राष्ट्र दृष्टीने हिंदुस्थानचा पूर्वी जो अधःपात झाला, आणि आजही जो चालूच आहे त्यावर या निबंधासाठी मी आणखी विचार करण्यात मग्न असता, मला गाढ झोप लागली. भारतमाता माझ्यासमोर उभी आहे आणि ती मला एक निर्वाणीचा संदेश देत आहे, असे मला स्वप्न पडले, हा भारतमातेचा संदेश येथे नमूद करून, मी आपल्या निबंधाचे भारतवाक्य करतो. ``ज्या गोष्टी तुझ्या मनाला आज त्रस्त करीत आहेत, त्याच हिंदुस्थानच्या दुर्दैवाला मूळ कारण आहेत. पण त्यांचा निरास करण्याचे आजपर्यंत कोणाला सुचले नाही व साधलेही नाही. तुमच्या समाजाच्या एका भागाने दुस-या भागावर हवा तो जुलूम, हवा तो अन्याय करावा, आणि त्या अन्यायपीडित संघाने तोंडातून प्रतिकाराचा एक ब्रसुद्धा काढू नये, मिटल्या तोंडी सर्व आघात सहन करावे, या शेळपटपणातच तुमच्या राष्ट्रीय दुर्दैवाची खरी मख्खी आहे, हे तुला अजूनही उमगू नये ना? जुलूम जबरदस्तीखाली जेर झालेल्या कष्टी लोकांनीच टरारलेल्या मनगटाचा ठोसा ठणकावून आपल्या कष्टांचे परिमार्जन का करून घेऊ नये? ``तुमची ती काशी आणि तर यात्रा करण्याची क्षेत्रे नीट पाहा. अनन्वित पापाचरणांची घाणेरडी गटारे, मो-या, नरककुंडे होऊन बसली आहेत! असल्या या भिकार स्थळांच्या महात्म्याची कुंटणगिरी करणे, हेच का तुम्हा हिंदुजनांचे आजचे ध्येय? एकमेकांविषयी तुसडेपणा, आणि कोणाची कोणाला कधी कळ यायची नाही असला बेददर्दीपणा तुमच्यात बेफाम बोकाळल्यामुळे, आज असा कोणता सद्गुण आहे, कोणते पुण्यकर्म आहे, की ज्याचा या हिंदुस्थानात हरघडी चेंदामेंदा होत नाही? लोकांत मुळी जिव्हाळ्याची कळकळच उरली नाही. न्याय-अन्याय, खरे खोटे, योग्य अयोग्य पारखण्याची तुमच्या आत्म्याची मुळी संवेदनाच मेलेली. मग बाबांनो, सत्याकरिता आणि न्यायाकरिता प्राणार्पण करण्याची गोष्ट कशाला? `माझा मी मुखत्यार, तुला काय करायचे?’ ही ज्याची त्याची मगरूरी. या व्यसनापुढे सद्भिरुची, तडजोडीची उदार वृत्ती आणि परमतसहिष्णुतेचा दिलदारपणा यांची पार माती होऊन गेली आहे. ``तुमच्या स्वतःच्याच दुष्कर्माने निर्माण केलेल्या पापाचरणांचा उकिरड्यांच्या राशी प्रथम या देशांतून निपटून काढा. हे काम तुमचेच आहे. ते तुम्हालाच केले पाहिजे. धर्म, कला, वाङ्मय, राजकारण, व्यापार, धंदा, व्यवसाय, बाजार, इत्यादी सर्व क्षेत्रांत, फार काय पण लोकव्यवहाराच्या प्रत्येक बारीकसारीक बाबींत, जेवढे म्हणून लफंगे, लुच्चे, भोंदू, दांभिक टगे आढळतील, त्यांना ठिकच्या ठिकाणी ठेचल्याशिवाय सोडू नका. ``बुद्धिमान, संपत्तीमान, वजनदार, प्रतिष्ठित आणि लोकनेतृत्वाला लायक असे लोक हे प्रत्येक देशाचे जिम्मेदार (ट्रस्टी) होत. देशाचा त्यांच्यावरच सारा भार व भरवसा असतो. तुमच्या हिंदुस्थान देशात असले लोक काही स्वतःच पक्के लाळघोट्ये आहेत, तर काही लोकांच्या  लाळघोटेपणाच्या पचनी पडणारे आहेत. सत्य तत्त्वांऐवजी असल्या झब्बूंचे देव्हारे या देशात पुजले जात आहेत. पूजा करणारे आणि पूजा करून घेणारे, दोघेही वाममार्गी. ज्यांच्यापाशी काहीतरी हे त्यांनी त्यांच्यापाशी काहीच नाही त्यांच्यासाठी सर्वस्वाचा होम केला पाहिजे. बाबारे, आज या भारतमातेला स्वार्थत्यागी लोकांची गरज आहे. आत्मयज्ञ करणारे वीर मला पाहिजेत. लोकशिक्षणाचे आणि लोकनेतृत्वाचे काम ज्यांनी हाती घेतले आहे, त्यांनीच आत्मयज्ञाची शिकस्त केली पाहिजे. ``तुमचे धार्मिक विधी, आचारविचार आणि तुमच्या जातिविषयक रीतीभाती आज अगदी हलकट बनलेल्या आहेत. कारण त्यात सत्याचा लवलेशही उरलेला नाही. अरे, ब्राह्मणधर्माचे खरे स्वरूप म्हणजे काय समजता? निर्भेळ सत्याचा आणि स्वार्थत्यागाचा अर्क पाहिजे अर्क. तरच त्याला सनातन धर्म हे नाव शोभेल. असलाच धर्म तुमची भटे भिक्षुके तुम्हाला शिकवितात काय? मुळीच नाही. त्रिवार नाही. जेथे धर्म कशाशी खातात हेच त्यांना माहीत नाही, तेथे ते शिकवणार तरी काय आणि अध्यात्माची त्यांना दृष्टी आल्याशिवाय `वर्णाश्रम धर्मा’चा खरा अर्थ त्यांना उमजणार तरी काय! ``शक्तीपूजा म्हणजे काळ्या फत्तराचा एका अक्राळविक्राळ देवीची, भरमसाट भेसूर प्रकाराने आज तुम्ही करीत असलेली पूजा नव्हे. तुमच्या सामाजिक घाशीरामीखाली दडपून पडलेल्या देशातील स्त्रीजातीच्या पवित्र हृदयांत तुमच्या राष्ट्राची शक्ती धमधमत आहे. जुन्या चित्रकाराने शक्तीचे – काली देवीचे – जे चित्र रंगविलेले आहे, त्यातील तपशिलाच्या चिन्हांचा वास्तविक अर्थ कोणालाच समजत नाही. प्राचीन चित्रकार आपल्या गूढ भावनांना चिन्हांद्वारे व्यक्त करीत असत. कालीचे चित्र कसे आहे. एक नग्न, उग्र स्त्री. हातात नागवी तलवार. गर्द निळा रंग. गळ्याच माणसांच्या मुंडक्यांच्या माळा बेफाम थैमान घालीत आहे. ही तुमच्या कालीदेवीची मूर्ती. तिच्या पायाशी तुडवून लाथाडून पडला आहे तो कोण? हे चिन्ह काय दर्शविते? कालीदेवीने लाथाडून लोळविलेला तो भिक्षुकशाहीचा दांभिक व लुच्चा भट आहे. सत्याची नागवी तलवार परजीत, आपल्या वाजवी हक्कांसाठी, कालीदेवीला या भटाला चिरडून जमीनदोस्त करणेच प्राप्त आहे. विचार करा. सावध व्हा. नाहीतर, आज तुमच्या गुलामगिरीखाली दाबून गेलेली स्त्रीजात – हिंदुस्थानची शक्ती – कालीदेवी संतापाने भडकून जाऊन, भरतभूमीवरून या दांभिक लबाड भिक्षुकशाहीचे तळपट उडविण्यासाठी खरोखरच नागवी तलवार प्रत्यक्ष परजीत, भयंकर थैमान घालायला सोडणार नाही. असा दिवस उगवू देणे वा न देणे तुमच्या हाती आहे. ``स्त्रिया माणसे आहेत, त्यांना काही हक्क आहेत. याची जाणीव करून घ्या. लबाड भिक्षुकशाहीच्या घाणेरड्या भिकार शिकवणीच्या पचनी पडल्यामुळे, तुमचा एकजात स्त्रीवर्ग भटभिक्षुकांच्या गुलाम बनला. त्यामुळेच तुम्हा हिंदुजनांचा सत्यानाश झाला, तुमचा मर्दानीपणा छाटला गेला आणि बरेवाईट निवडण्याची तुमची विवेकशक्ती ठार मेली. एखादी योग्य गोष्ट करण्याचा तुम्हाला उमाळा येतो; पण तुमच्या सामाजिक (जातिविषयक) बंधनांचा बागुलबोवा पाहताच, तुमचा तो उमाळा, विद्युल्लतेच्या क्षणिक चमकीप्रमाणे, ठिकच्या ठिकाणी पार विरघळून जातो. उमाळ्याच्या या क्षणिक चमकीमुळे तरी तुम्ही किती गडद अंधःकारात पडलेले आहात, किती नैतिक नामर्द बनला आहात आणि तुमची आत्मिक अधोगति किती झाली आहे, हे स्पष्ट दिसून येते. ``तुमचे पौरुष पराक्रमी होण्यासाठी स्त्रियांच्या आत्मतेजाची शक्ती तुमच्या पाठिंब्याला धावून आली पाहिजे. स्त्रियांची शक्ती जागृत आणि तेजस्वी बनण्यासाठी त्यांचे कौमार्य बलशाली राखले पाहिजे. कुमारिकांचे कौमार्य म्हणजे प्रत्येक मानववंशाच्या उपवनातील सुंदर, सात्विकस पवित्र पुष्पचहोय. परंतु, अरेरे! तुमच्या हिंदुसमाजात कामातुर धटिंगणांच्या उतावळ्या स्पर्शाने या पुष्पांना हिसडा मारून अकाली खुडण्यात येते, त्यांचा अपमनकाकरक भंग करण्यात येतो. त्य पवित्र कौमार्य-पुष्पाचा तुम्ही हवा तसा चोळामोळा करून टाकता! ``तुमच्या मुलींना लख्ख सूर्यप्रकाशात वाढू द्या. त्यांच्याभोवती कसल्याही खोट्या नकली, कृत्रिम किंवा परिस्थितीचे आवरण आणि भिक्षुकशाही च्या लुच्च्या, दांभिक भटांची सावलीसुद्धा पडू देऊ नका, मग पाहा, त्या ख-याखु-या मर्दांना जन्म देण्याच्या लायकीच्या प्रभावशाली युवती बनतील. त्यांच्या शक्तीच्या प्रभावाने तुम्हालासुद्धा त्या मर्द बनवतील. सध्या तुमच्या पोटी माणसे जन्मत नसून, होते आहे ही कृमिकीटकांची पैदास आहे. याचे कारण हेच आहे की ज्या कुमारिकांना प्रेमशून्य कामवासनेने कोणी स्पर्शही करता कामा नये, त्या कुमारिकांचे कौमार्य बळजबरीने भ्रष्ट करण्यास तुमच्या भटभिक्षुक गुरूंची शिकवणी आजवर उत्तेजन देत आलेली आहे. ``विवाहविधीच्या गोंडस सबबीखाली माणुसकीला लाज आणणारे असले अत्याचार करण्यापेक्षा, तुम्ही विवाहाचा पोकळ प्रतिष्ठितपणा कायमचा बंद पाडाल तर फार बरे होईल! या तुमच्या भ्रष्ट विवाह-पद्धतीने, अर्ध्याकच्च्या कमकुवत पोराबाळांची पैदास करून, तुम्ही आपल्या हिंदुजातीची आत्महत्या मात्र करीत आहात. ``या तुमच्या कर्मांमुळे अखिल मानवतेपुढे तुमची जाती किती तिरस्करणीय अवस्थेत उभी आहे, हे न दिसण्याइतके तुम्ही कितीही आंधळे झाला असला, तरी देवाला हे सर्व दिसत आहे. हिंदू म्हणजे देवाचे असे कोण, मोठे लाडके लेक लागून गेले आहेत की, त्यांनी जननकार्याच्या त्याच्या पवित्र आणि गुप्त नियमांचा हवा तो उच्छेद करावा, हवी तशी पायमल्ली करावी, आणि त्याबद्दल निसर्गप्राप्त कोणत्याही शिक्षेचा फटका त्यांना कधी बसू नये? ``तुमच्या अस्तित्वाला दडपीत चिरडीत नेणा-या न्यायनिष्ठुर कर्मन्यायाची याद राखा. कर्मन्यायाचा कचकाच असा आहे की त्याला व्यक्तिची पर्वा नाही की जातीची किंमत नाही. आडवा आला की काप, एवढेच त्याला माहीत. या पुराणप्राचीन जगतात आजपर्यंत शेकडो मानववंश नामशेष झाले. सफाई अस्तित्वातून उठले. कालीदेवीच्या गळ्यात ती नररूंडमाळा घातलेली आहे, ती विचारपूर्वक पाहा. प्रत्येक मुंडके म्हणजे पृथ्वीतलावरून कर्मन्यायाने नष्ट झालेल्या एकेका मानववंशाची निशाणी आहे. कालीदेवीचे हे अर्थपूर्ण चित्र काढणा-या प्राचीन चित्रकाराला निसर्गन्यायाची बरीच माहिती होती, असे नाही का तुम्हाला वाटत? पण तुमच्या भिक्षुकशाही गुरुवर्यांना? ``कर्मन्यायाचा असा कडक शिस्तीचा दण्डक आहे की हिंदुस्थानात न्याय, समता आणि योग्य तत्त्वे यांचा अंमल सुरू होऊन, त्याबरहुकूम प्रगतिचक्राची गती पुढे गेलीच पाहिजे. या चक्राला विरोध करणा-यांच्या अर्थात चिंधड्याच उडणार! ज्या धार्मिक-सामाजिक पातकांनी लोखंडी शृंखलापेक्षाही तुमचे हातपाय अधिक बळकट जखडून आवळून टाकले आहेत, त्या पातकांना जितक्या लवकर नष्ट कराल, तितक्या लवकर तुमची प्रगती होईल. ``जे अधिक बलवान व पुढारलेले असतील त्यांनी खाली पडलेल्या लाथाडलेल्या हतबलांना हात देऊन वर घेतले पाहिजे. ज्या घाणेरड्या धार्मिक, सामाजिक नियमांमुळे वर चढलेले वरवरच तरंगत आहेत आणि खाली पडलेले खोलखोल बुडत आहेत, त्या सर्व नियमांचा चेंदामेंदा केला पाहिजे. याचा परिणाम काहीही हवो, त्यापायी वाटेल ते नुकसान होवो, व्यक्तींना दुःख भोगावे लागो, वा समाजाला असल्या अन्यायी नियमांची राखरांगोळी केलीच पाहिजे. ``कोणा एखाद्या विवक्षित राष्ट्राकरिता अगर जातीकरिता नव्हे तर अखिल मानवतेचा उद्धार करणार एक साधन म्हणून, निसर्गाच्या मुशीत हिंदुस्थानची पुनर्घटना होत आहे. राष्ट्रीयत्वाच्या संकुचित कल्पनेचा यापुढे अंत होऊन, अखिल मानवतेच्या हितवादाची महत्त्वाकांक्षा बळावून ती विजयी झाली पाहिजे. आम्ही सर्व हिंदुस्थानवासी जन भाऊ भाऊ आहोत, या उच्च मनोवृत्तीच्या भावनेची प्रभात होण्यापूर्वी कल्पनातीत क्लेशांच्या दिव्यातून गेले पाहिजे. वर्णभेद, जातिभेद, मतभेद काहीही असले, तरी आम्ही सर्व हिंदवासी भाऊभाऊ आहोत, या भावनेच्या आणि माणुसकीच्या प्रकाशाने आपापली घरे प्रकाशित करा.’’ ।।वंदे मातरम्।। 000 टीप *१ – रोमन लोकांनी कार्थेज येथल्या प्राचीन फिनीशियन संस्कृतीचा नाश केला. ग्रीक लोकांनी ट्रोजन संस्कृती धुळीला मिळवली; तद्वतच वैदिक आर्यांनी रसातळाला नेलेल्या एका जबरदस्त प्रतिस्पर्धी संस्कृतीचा रावण हा नायक प्रतिनिधी होता. - ग्रंथकार टीप **२ – `पॉलिटिक्स’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ केवळ `राजकारण’ असा होत नाही. त्यात मानवी जीवनचर्येच्या सर्व व्यवहारांचा समावेश होतो. म्हणून तोच शब्द येथे कायम ठेवला आहे. - अनुवादक + या शब्दालाही तेज, तडफ वगैरे अनेक मराठी प्रतिशब्द असले, तरी स्पिरीट शब्दातल्या सर्व भावना त्यात उतरत नाहीत. सबब याचीही शुद्धी करून मराठी संघटनात त्याला घेतले आहे. - अनुवादक टीप *३ – उत्तर हिंदुस्थानातल्या काही जातीतील स्त्रिया इतरांना खुशाल तोंड दाखवितात, पण नवरोबा येताच पटकन बुरख्यांचे घुंगट मारतात. मारवाडणीच्या घुंगटाची रीत तर काही विचारूच नये. तात्पर्य, बुरख्याचा विनय आणि विनयाचा बुरखा या गोष्टी सध्या लज्जास्पद व हास्यास्पद स्थितीत आहेत. - अनुवादक टीप *४ – या मुद्याची माहिती `जर्नल ऑफ धी बिहार अँड ओरीसा रिसर्च सोसायटी’ मार्च १९१९ पृष्ठ २ मध्ये मिळेल. - ग्रंथकार टीप *५ – यज्ञातील तुपाप्रमाणे किंवा पशुंच्या चरबीप्रमाणे या द्रव्यराशी यज्ञात जळून खाक न होता, या भटाभिक्षुकांच्या बटव्यात सुरक्षित जाऊन पडत असत, हे स्पष्ट करून सांगायला नकोच. - अनुवादक टीप *६ – England expects every man to do his duty या ब्रिटीश राष्ट्रसूत्राप्रमाणेच India expects every Indian to do his duty इतकाच अर्थ त्यात स्पष्ट होतो. विशेष काही नाही - अनुवादक टीप *७ – नवरा मरो नवरी मरो, भटाला दक्षिणा मिळाली म्हणजे झाले! या पीलकडे सुहेरसुतकाचे सव्यापसव्य ब्रह्मदेवाने भटांना शिकविलेच नाही, त्यांनी तरी काय करावे? - अनुवादक + संघाची म्हणजे जातींची कोंडाळी निर्माण होण्याच्या पूर्वी हिंदू समाजातील हव्या त्या मनपसंत तरुणाला पाणीदान करण्याचा स्त्रियांना अधिकार असे. परंतु संघाची कुंपणे पडल्यावर, पतिशोधन तर बुडालेच, पण पतिपसंतीचाही मामला बाप, भाऊ, काका, मामाच्या इच्छेवर राहून जातिपुरता आकुंचित बनला. - अनुवादक * कारण `बांधून देईन तेथे गेले पाहिजे’ हा प्रत्येक मुलीच्या बापाचा वेदोक्त अधिकार पडला ना! - अनुवादक टीप *८ – `अष्टवर्षा भवेत् कन्या’ असली पागलपणाची सूत्रे भटी टाळक्यांतून याच वेळी निपजली. असल्या सूत्रांच्या प्रसववेदना ब्रह्मदेवाला खास भोगाव्या लागल्या नसाव्या. - अनुवादक टीप *९ – या शब्दाचा खरा अर्थ व ख-या भावना नीट पटण्यासाठी वाचकांनी चारूदत्ताच्या वसंतसेनेचे चारित्र्य दृष्टीपुढे ठेवावे. कलावंतीण म्हणजे वेश्या (Prostitute) नव्हे. प्राचीनकाळी हिंदुस्थानात कलावंतिणीचा दर्जा क्षुद्र मानण्यात येत नसे. त्या चांगल्या सुविद्य, उदार, रसिक, आणि प्रामाणिक असत. - अनुवादक टीप **१० – कारण त्या सर्व या कलावंतिणींनी उचलल्या! टीप *११ – भिक्षुकशाहीला ब्रह्मदेवाने एवढाच एक गुण शिकवलेला दिसतो. ज्या ज्या चळवळींविरुद्ध भटाब्राह्मणांची आदळआपट व कारस्थानी डावपेच सुरू होतात, तीच चळवळ खरी लोकहितवादी, असे डोळे मिटून सांगावे. - अनुवादक टीप *१२ – भिक्षुकी खुनशीपणा फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. प्रसंग पडेल तसे वळते, वाकते, नमते घेऊन, पायाला किंचित सत्तेचा तणावा मिळताच एका दाताचा सूड बत्तिशी पाडून घ्यायला, भटीवृत्ती सर्पाप्रमाणे डोक धरून बसण्यात कधीही कमी करणारी नव्हे. - अनुवादक टीप **१३ – बौद्ध धर्मात महायान आणि हीनयान असे पुढे दोन पंथ निर्माण झाले होते. - अनुवादक टीप *१४ – हे नाणे काय असावे? टीप **१५ – भटांच्या नुसत्या जानव्याची ब्रह्मगाठ जर एवढी पराक्रमी, तर त्यांच्या प्रत्यक्ष कारस्थांनाची खूणगाठ किती? श्रावणीचे शेण खाऊन भटी जानव्यांची दावी गळ्यात अडकवून घेणा-या मानवी बैलांनी सावध असावे. धर्म करता कर्म पाठीस लागायचे! लागलेच आहे म्हणा सध्या - - अनुवादक टीप *१६ – भिक्षुकशाही परक्यांशी मिळते घेण्यात मनाची फार कोवळी आणि उदार. स्वदेशबांधवांशी शतकानुशतके वैराचा वणवा फुलवीत बसेल, पण जबरदस्त परक्यांशी मनधरणी करण्यासाठी पळाचाही विलंब तिला सोसवत नाही. आजही हेच चालले आहे. - अनुवादक + सिथियनांना हिंदु करून चतुवर्णापैकी क्षत्रियांची जागा त्यांना देण्यात आली. पण त्यांची जात कोणती? जातीशिवाय हिंदू जगेल तरी कसा? मोठी अडचण पडली. अखेर तुम्ही राजपुत्रच आहात, तेव्हा तीच तुमची जात असे ठरविले. राजपुत्राचे झाले राजपूत आणि राजपुताचे बनले रजपूत. टीप *१७ – हिंदुंची अशी एकही जात सापडणार नाही की जिच्या उत्पत्तीचे मूळ थेट ब्रह्मदेवाच्या पोटात घुसलेले नाही! मैल मैल लांब वंशावळीच्या अभिमानात गर्क असणा-या हिंदू जनांच्या जातिवंशात कसकशी काल्पनिक कलमे लावली गेलेली असावी, याचा या गोष्टीवरून फार छान खुलासा होतो. - अनुवादक टीप. १८ – कित्येक बौद्ध लेण्यांत तर बुद्धाच्या मूर्ती उखडून टाकून तेथे शंकराच्या पिंड्यांही स्थापन केलेल्या आहेत. पुण्यानजीक भांबुर्ड्याच्या लेण्यांत हाच प्रकार दृष्टीस पडतो. - अनुवादक टीप *१९ – आजही हा मायावाद हिंदुंच्या संसारात निराशेची भरपूर फोडणी देतच आहे. - अनुवादक 000

prabodhankar.org/node/252/page/0/57

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा