सोमवार, ३० जानेवारी, २०१७

जय महाराष्ट्र

छत्रपति शिवाजी महाराजकी जय

 या एकाच गर्जनेने जातिवंत म-हाठा अंतर्बाह्य फुरफुरतो. हिंदवी स्वराज्याच्या  उषःकालीच केवळ नव्हे, तर परवाच्या दोन जागतिक युरपियन महायुद्धाच्या समाप्तीपर्यंन्त, या एकाच गर्जनेने क्रांतीचे जेवढे कल्पनातीत स्फोट केलेले आहेत, तेवढे प्रत्यक्ष परमेश्वराच्या नामघोषणनेहि कधि झालेले नाहीत. शिवाजीपुढे



रामनामाचाहि महिमा फिका



पडलेला आहे. हे कवित्व नव्हे, सत्यकथन आहे. पहिल्या महायुद्धाचीच कथा सांगतो. सन १९१४ च्या आगष्टात अचानक युरपात महायुद्धाची ठिणगी पडली आणि बलाढ्य जर्मन राष्ट्राचा शह इंग्लंडच्या प्रत्यक्ष अस्तित्वाला  भेडसावू लागला. हा वेळ पावे तों ब्रिटिशांनी महाराष्ट्रात शिवाजीचे नुसते नाव घेईल तो राजद्रोही ठरवून रसातळाला नेण्याचा धूमधडाका चालवलेला होता. महाराष्ट्राचे म-हाठा स्पिरिट शक्य त्या उपायांनी दाबून दडपून टाकण्याचा सपाटा सारखा चालू होता. पण आता

 ब्रिटिशांनाच रसातळाला

 जाण्याचा प्रसंग आला. इंग्लंडने आपला राजकारणी दरारा पृथ्वीच्या गोलाइतका कितीहि फुगवलेला असला, तरी त्याची मायभूमि सबंध युरपखंडात मि-याएवढी ! त्याहि बेतास बात. तशात त्यांच्या वसाहतींचा संसार-पसारा दोनीहि गोलार्धांवर पसरलेला. जर्मनीने तर वामनाप्रमाणे तीन पावलांत ब्रिटिशांचा चकणाचूर करण्याचा घाट घातलेला. बर्लिन ते पारीस, पारीस ते कॅले, कॅले ते डोव्हर. तीन दणक्यांत ब्रिटीश बेटांचा खातमा !

       आता निर्वाणीचा त्राता कोण ? आजवर जेथे पांढरे पाऊल पडले, तिथेतिथे त्यांनी आपल्या अहंपणाच्या कैफाने जनतेला पाण्यापेक्षा पातळ करून टाकलेली. त्यांची मनेंच मारून टाकलेली. बनियेगिरी राजकारणाने इंग्रेजानी आस्तेआस्ते हिंन्दुस्थान घशात टाकला, पण महाराष्ट्राचा घास गिळताना,

 त्यांच्या घशाला कोरड पडली.

 लेखणीच्या फटका-याने त्यांनी दिल्लीची मोगल बादशाही चुटकीसरशी सत्ताक्रांत केली पण म-हाटशाही हस्तगत करताना, आंग्रेजी मुत्सद्याना आपले दोनहि हात खरपूस भाजून करपून घ्यावे लागलेले आहेत. या अनुभवामुळे, महाराष्ट्राकडे पहाण्याचा ब्रिटिशांचा दृष्टीकोण नेहमीच कडवा काणा असायचा. परक्या घरघुश्या आंग्रेजांना दक्खनपारचसे काय, पण भारतपार हुसकायला म-हाट्याना झेंड्यावर एकादा छत्रपति किंवा पेशवाच हवा असे नाही. आलतूफालतू कोणीहि म-हाठा गडी सहज लीलेने हजार बाराशे सवंगडी जमवून, त्यांची

 त्रेधातिरपीट उडवू शकतो.

 याचाहि आंग्रेजांचा अनुभव नित्याचाच होता. आणि या उठावाचे चैतन्य कशात ? तर केवळ एका छत्रपति शिवरायांच्या नावाच्या जयघोषात.

      जर्मनीची खेकडी पकड मानेला डसतांच, इंग्रेजांच्या अकलेला नवी कल्हई चढली. आता त्यांना एकदम महाराष्ट्राचा पान्हा फुटला. शिवाजी महाराज त्यांना आता अत्यंत पूजनीय, भजनीय नि वंदनीय वाटू लागले. शिवाजी उत्सवाची प्रथा चालवून महाराष्ट्राला सचेतन करू पहाणारे, ब्रिटिशांचे हाडवैरी लोकमान्य टिळक नुकतेच राजद्रोहाबाबत सहा वर्षाची हद्दपारी भोगून परतले होते. महायुद्धाच्या महायज्ञाची सांगता करून, जिवंत रहाण्यासाठी. हिंदुस्थानात रंगरूड-भरति केल्याशिवाय इंग्रेजाना गत्यंतरच नव्हते. उत्तरेला त्यांनी शीख गुरख्यांची भरती जोरदार चालवली होती. १८५७ च्या उठावात तमाम हिंदी जनतेविरुद्ध

 शिखांनीच ब्रिटिशांची पाठराखणी

 केल्यामुळे, त्यांच्यावर आंग्रेजांचा लोभ मोठा. साध्या गो-या सार्जंण्टाने शीळ घालायची थातंड का हज्जारो शीख सरदारजी ब्रिटिशांच्या युनियन जॅकसाठी पंचप्राणांचे पापड भाजायला दोन पायांवर खडे उभे. नेपाळ तर बोलूनचालून मेंढपाळ. तेथे जितकी मेंढरे तितके बेकार गुरखे. पैसा देखील त्यांच्यासाठी जगाच्या पाठीवर कोठेहि, -- कोणाच्याहि विरुद्ध लढायला पोटभरू गुरखा तयार. आजहि तोच प्रकार चालू आहे. पोटापुढे त्याला स्वकीय परकीय भेद काही नसतो. शीख, गुरख्यांची स्वभावरचनेची ही मक्खी चाणाक्ष आंग्रेज लोक जाणत नव्हते, असा प्रकार मुळीच नव्हता. परंतु करतात काय ? बखत आया बांका, तो

 गद्धेकू कहेना काका.

 लोकमान्य टिळकांना मध्यस्थी घालून महाराष्ट्रातल्या मराठ्या मावळ्यांत रंगरूट भरति करण्याची खटपट करावी, असा दिल्लीचा कानमंत्र मुंबईला आला. सरकारी यंत्ररचना हालचाल करू लागली. गोरे सैनिकी हापसर नरमायीची भाषा बोलू लागले. टिळकांकडे दिल्ली मुंबईची विचारणा येतांच, त्यांनी एकच जाहीर जबाब दिला. ''भारतीय राज्यतंत्र महाराष्ट्राचा पदोपदी मानभंग आणि अवहेलना करून, --- ऊठ सोट्या तुझे राज्य धाटणीने ब्रिटिशानी आजवर चालवले नसते, तर या आणीबाणीच्या प्रसंगी

 कलकत्ता ते बर्लिन म-हाठा शिपायांची भिंत उभारून दाखवली असती.

       पश्चात्तापेताला क्षमा, हा महाराष्ट्राचा बाणाच लो. टिळकानीच(???) पुढाकार घेतल्यामुळे, महाराष्ट्रात रंगरूट भरतीची लाट बेफाम फोफावली. जागोजाग मोठमोठे लष्करी हापसर शिवाजी महाराजकी जय गर्जना घसा खरवडून करू लागले. त्यांच्या  ----, पलटणी (स्कॉटिश हायलँडर्स) आमच्या लावण्यांच्या नि पवाड्यांच्या ताल ठेक्यावर खेड्यापाड्यांतून नाचत फिरू लागल्या. जिकडे कान द्यावा तिकडे

 शिवाजी महाराजकी जय,

 म-हाटेका जय,

 या जयघोषाच्या गर्जना अखंड साद पडसाद देत होत्या आणि या दोन मंत्रांच्या बळावरच हज्जारो शेतक-यांची जवान पोरे रंगरूट भरतीत सामील होत होती. सतत आठ दिवसांची कामचलाऊ कवायत शिकवून झकपक सैनिकी युनिफार्म पोषाख चढवलेल्या त्या जवानांच्या पलटणी, इतरांना उत्तेजन येण्यासाठी, पुणे, सातार, औंध, कोल्हापूर सारख्या ठिकाणी मिरवणुकीने मिरवत फिरवण्यात येऊ लागल्या. महाराष्ट्राला युद्धोन्मुख करण्यासाठी मुंबई सरकारने आपल्या पटाईत लेखकांकडून सर्व भाषेत (विशेषतः म-हाठीतच) एक मोठा लेख तयार केला आणि तो स्वतंत्र पुरवणीच्या रूपाने प्रत्येक वर्तमानपत्राने प्रसिद्ध करण्यासाठी भरभक्कम रकमांच्या देणग्यांची थैली सताड मोकळी केली. तेवढा एक छापला तरी बारीकसारीक चिंध्याधांटोन्यांना, ती सालभराची मेजवानीच होती. मुंबई, पुणे सारख्या मोठमोठ्या शहरातल्या दैनिक साप्ताहिकांनी तर मी मी म्हणत प्रसिद्धीची तातडी केलीच, पण जिल्हा तालुका पत्रांनीहि त्या पुरवणीचेच खास अंक काढून

 गडगंज दक्षणेच्या वहात्या गंगेत

 आपले हात धुवून घेतले. पण लो. टिळकांनी मात्र आपला कडवा म-हाठबाणा दाखवला. त्यानी मुंबई सरकारला स्पष्ट कळवले की केसरीमार्फत पुरवणी-प्रसाराला माझी काहीच हरकत नाही पण केसरीचा नेहमीचा मजकूर हिशोबात घेता, ती छापण्याइतका ----- नि साधने माझ्याकडे नाहीत. झाले, सरकारने तो केसरीच्या पुरवणीचा खास अंक, मथळ्याच्या चित्राच्या ब्लॉकसकट, स्वतःच्या खर्चाने, टाइम्स ऑफ इंडिया छापखान्यात छापून, प्रति पुण्याला रवाना केल्या आणि त्या नेहमीच्या मंगळवारच्या अंकासोबत वाटल्या गेल्या. त्या पुरवणी अंकावर मुद्रणस्थळ म्हणून टाइम्स छापखान्याचे नांव आहे.

 ही माझी जुनी आठवण

 केसरीच्या आजच्या कारभा-यांनी मुद्दाम १९१४च्या उत्तरार्धातल्या केसरीच्या फायल्या चाळून खरी का खोटी ते सांगावे आणि लो. टिळक यांच्या आठवणींच्या संग्रहात तिची बडदास्त ठेवावी.

       या शिवाय आणखीहि एक मोठा चमत्कार झाला. आजकाल इंग्रेजी वृत्तपत्रांत म-हाठी देवनागरी अक्षरांच्या जाहिराती कधिमधि दिसतात, पण पूर्वी तसे नसे. तशात टाईम्स ऑफ इंडिया म्हणजे ब्रिटिशांचे एकमेव खास राखून ठेवलेले इंग्रेजी मुखपत्र, त्यात म-हाठी देवनागरी शब्द वाक्य येणारच कसे नि कां ? पण रंगरूट भरतीच्या त्या हंगामात तोहि चमत्कार घडला. एके दिवशी प्रातःकाली टाइम्सच्या मुख्य पानाच्या माथ्यावरच

 म-हाटेकी जय

 सतत लोक एक करावे ।

 गलीम निवटूनि काढावे ।
 जैसे करतां कीर्ती धावे ।

 दिगंतरी ।।
 हे रामदासी वचन फोर लाइन आणि टू लाइन पायका टायपांत झळकलेले उभ्या हिंदुस्थानाने वाचताच, नवलायीची एकच लाट सगळीकडे खळखळत गेली. इंग्रेजी पत्रात म-हाठी देवनागरी वचन छापले गेल्याचा हा पहिलाच अविस्मरणीय प्रसंग होय. सारांश, ब्रिटिशांनी युरपातले आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अखेर श्री शिवरायाच्या नांवानेच हाका आरोळ्या मारून, म-हाट्याना पारीसच्या रणांगणावर नेऊन उभे केले. तेथे पुढे काय घडले, ते सावध चित्ताने पुढच्या अंकी वाचा.

  स्वयंभू छत्रपति.

 लेखांक २रा.

 सन १९१४ च्या पहिल्या युरपियन महायुद्धात प्रथमच म-हाठे शिपायी फ्रान्सच्या रणांगणावर जाऊन दाखल झाले. तेव्हा युद्ध साहित्यांत विमानांचा प्रसार नव्हता. कधिकाळी तशीच निकड पडली तर बलूनचा उपयोग करीत असत. पण तो खात्रीलायक नसे. हे महायुद्ध ट्रेंचीस (खंदक) खणून लढले जात होते. समर भूमीवर जिकडे पहाल तिकडे खंदकच खंदक. त्यांत पलटणी पहा-या पहा-याने उभ्या राहून गोळागोळी करायच्या. खंदकांत ढोपरढोपर पाणी सांचलेले. कित्येक ठिकाणी तर ते छातीइतकेहि असायचे. त्यांत ६-६ तास ताठ हुशारीने उभे रहायचे म्हणजे एक मोठे दिव्यच असे. म-हाठ्यादि हिंदवी शिपायांना तो एक नवाच पण प्राणांतिक अनुभव घ्यायचा होता. अखंड पाण्यात उभे रहाल्यामुळे, शिपायांचे पाय तळवे कुझू लागले. समोरासमोर

 छातीठोक हाणामारी

       करण्यातच पटाईत असणा-या हिंदी सैनिकाना ते खंदकी युद्ध मनस्वी कोंडमा-याचे झाले. खंदकांतच रहायचे, जेवायचे, आजारी पडायचे आणि पाळीव बिगूल वाजताच हत्यारबंद खडे उभे रहायचे. ‘फायर’ हुकूम येताच, धडधड रायफलमारा करायचा. कोठे कोणावर आपण गोळ्या झाडतो, याचा ठावठिकाणा लागायचा नाही. फायर म्हटले का फायर. शारिरीक सहनशीलतेची ती एक कमालीची कसोटीच होती.

 ब्रिटिशांच्या भरवश्याचे दाढीबहाद्दर शीख आणि बुटबैंगण गुरखे रडकुंडीला आले. ‘’उघड्या मैदानावरच्या एल्गारासाठी आम्हाला मोकळे सोडा, नाहीतर हिंदुस्थानात परत जाऊ द्या, ’’ असा त्यांचा एकच आरडोओरड चालू झाला. काही दिवस ब्रिटीश सेनापतीने त्यांना

 दादा बाबा करून थोपवण्याची

 शिकस्त करून पाहिली. विख्यात हिंदी रणझुंजारच माघार घेऊ लागलेले पहाताच, बिचा-या ब्रिटिशांचे धाबेच दणाणले. हिंदी सैनिकांवर प्रेम आणि विश्वास असलेले अतिवृद्ध नामांकित ब्रिटीश-हिंदी सेनापती लॉर्ड रॉबर्टस् त्यावेळी पेन्शन घेऊन एकांतवासात रहात होते. त्यांना पाचारण केले. रॉबर्टस् साहेब रणांगणावरील कडक थंडी वारा पावसाच्या झोडीला न जुमानतां, काठी टेकीत टेकीत आले. सगळे शीख, गुरखे आणि म-हाठे शिपायी खंदकांतून बाहेर येऊन कवायतीत त्यांच्या समोर उभे राहिले. ज्या हिंदी शिपायांच्या अखिल भारतीय सेनासागराचे आपण एका काळी सर्वोच्च नेते होतो, त्याचा एक मोठा भाग हुकमतीत समोर उभा थाटलेला पाहून, रॉबर्टस साहेबांना त्यांच्या जुन्या सगळ्या पराक्रमांची आठवण होऊन, डोळे पाणाळले. तोफखान्याच्या एका मोठ्या गाड्यावर उभे राहून त्यांनी शीख गुरखे मराठ्यादि शिपायांना उद्देशून एक उत्तेजक व्याख्यान दिले पण

 हमको हिंदुस्थान भेज दो

 हा शीख गुरख्यांचा हट्ट काही सुटे ना. त्यांनी किना-यावर नांगरलेल्या बोटीकडे धावा घेण्याला सुरुवात केली. राहता राहिले म-हाटे. बिकानेरच्या महाराजांनी त्यांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न केला. शिवरायाच्या इतिहासाची आठवण दिली. महाराजांचे भाषण चालू असतानाच मेजर ढफळे या मराठा तरुणाने तोफगाडीवर तलवार परजीत आवेशाने उडी मारली आणि म-हाठा पलटणीला एकच सवाल टाकला.

 रणांगणावर उभे ठाकल्यावर माघार

 घेऊन छत्रपति श्री शिवरायाच्या

 नावाला तुम्ही काळोखी फासणार काय ?

 एवढे शब्द रणभूमीवर रोरावत जाताच, एकजात शिपायांच्या कंठातून

 शिवाजी महाराजकी जय
 हा जयघोष बाहेर पडला आणि रायफलींच्या धडाक्याचा क़डकडाट उडाला. ‘’आम्हाला खंदकातून बाहेर उघड्या मैदानावर जर्मनीच्या टोळधाडीवर सोडा, म्हणजे पाहून घेऊ, ते पारीस घेतात का आम्ही म-हाठे बर्लिन पादाक्रांत करतो ते. ’’ असा त्यांचा आग्रह पाहून, मेजर फाळक्यांच्या नेतृत्वाखाली सारी म-हाठी सेना त्याच पावली बर्लिनच्या रोखानघे मार दे मार करीत

 निघाली आणि त्यांनी अवघ्या २४ तासांत जर्मन गब्रूंना बर्लिनकडे ९० मैल रेटीत नेले. पावलो पावली शिवाजी महाराजकी जय हा जयघोष घुमवीत, हे कोण प्रलयंकारी रुद्रावतार आपल्याला ठेचीत चिरडीत येताहेत, याची युद्धमदाने शेफारलेल्या जर्मनांना बराच वेळ कल्पनाहि होईना.

 जर्मनाची झाप मागे रेटली गेली. पारिसचा बचाव झाला. इंग्लंडचा जीव भांड्यात पडला. मग पारीसकरांचा आनंद आणि उत्साह काय वर्णावा ?  एवढा विजय संपादून म-हाठे परतल्यावर, अवघ्या पारीसकर फ्रेंचांनी त्यांचे मुक्तकंठांनी स्वागत केले. त्यांच्या मनमुराद सरबरायीसाठी पारीस शहर मोकळे टाकले. फ्रेंच महिलांनी त्यांना

 परमेश्वरवत् भजले पूजले

 या एकाच म-हाठी मुकाबल्याने महायुद्धाचे सारे पारडेच पालटले. ते पहिले युरपियन महायुद्ध लौकिकी दृष्टीने जर इंग्लंड आणि दोस्तानी जिंकल्याचे इतिहासात नमूद झालेले असले, तरी त्या महाविजयाचे सारे श्रेय श्री शिवरायाच्या नामाच्या महिम्यालाच आहे. म-हाठ्यानी, शीख गुरख्यांच्या पलायनी पावलांवर पाऊल ठेवून जर त्या आणीबाणीच्या प्रसंगी माघार घेतली असती, तर आज सबंध

 युरपचा नकाशाच बदलला असता



दुस-या महायुद्धातहि तोच प्रकार. जर्मनीचा सेनापति रोमेल म्हणजे सवाई दिढी नेपोलियन. त्याने दोस्तांच्या सेनेला रेटीत थेट अलेक्झांड्रियावर जर्मन-त्रिकुटांचे निशाण रोवले आणि शत्रुला दे माय धरणी ठाय केले. रोमेलला पदच्युत करण्याच्या कामी ब्रिटीश, ऑस्ट्रेलियन स्कॉच हायलॅण्डर्स, अमेरिकन इत्यादि सा-या दोस्तांच्या पलटणींनी मार खावून माघार घेतल्यावर, अखेरचा म-हाठे पलटणीचा हल्ला चढला आणि

 शिवरायाच्या नामघोषात

 त्यांनी रोमेलला नुसता पदच्युतच नव्हे, तर कायमचा रसातळाला नेला. सारांश, पहिले काय किंवा दुसरे काय, दोनीहि युरपियन महायुद्धे ब्रिटीश फ्रेंच अमेरिकन सैन्यानी नव्हेत, रूझवेल्टच्या १४ कलमी तहनाम्यानें नव्हे, तर म-हाठ्यानी छत्रपती शिवरायांच्या नामघोषणेच्या तेजस्वी स्फूर्तीने लोकोत्तर पराक्रम करून जिंकलेली आहेत.

 भारतावर जबरदस्त परकीय ब्रिटिशांची सत्ता असे तोंवर शिवनामाचा हा महिमा जरी आपल्याला आठवता, गातां, वर्णिता आला नाही, तरी आता भारत स्वतंत्र, स्वयंनिर्णयी आणि प्रजासत्ताक झाल्यावर, आज तो मुक्तकंठाने विद्यमान नि भावी महाराष्ट्राच्या पिढ्यांसाठी सांगितला पाहिजे. प्रबंधकारांनी त्यावर मुद्देसूद पुराव्यांचे प्रबंध लिहिले पाहिजेत, नाटककार कविजनानी त्यावर आपली रसाळ रसवंति नाचवली पाहिजे. परकीय सत्तेखाली नि सत्तेसाठी जे आम्ही पूर्वी पराक्रम केले, तेच आता भावी काळात म-हाट्याना, शिवरायाचेच नांव घेऊन,

 भारताच्या सौभाग्यासाठी

 करावयाचे आहेत. भारताच्या स्वातंत्र्याची नि लोकशाहीची किल्ली छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राला दिलेल्या कणखर क्षात्रतेजात सामावलेली आहे. महाराष्ट्र हा भारताचा क्षात्रतेजाचा पाठकणा आहे. भारताचे मस्तक जरी दिल्लीला असले तरी

 महाराष्ट्र त्याचे धगधगते हृदय

 आहे. या हृदयातले शिवाजीचे शिवतेज कायम वाटते फुरफुरते रहावे, भारताच्या स्वराज्यावर आणि स्वधर्मावर होणारी आक्रमणे पार धुडकावून लावण्यासाठी महाराष्ट्राच्या म-हाठ्यांचा शिवदत्त तलवार भाला अखंड परजता रहावा, म्हणून या पुढे रामायणादि पोथ्या गुंडाळून ठेवून,

 शिवचरित्राचा पायाशुद्ध अभ्यास

 उभ्या भारतिया ंनी करावा, केलाच पाहिजे, या एकाच प्रामाणिक विवंचनेने या लेखमालेच्या उद्योगाला मी स्वयंप्रेरणेने जुंपून घेतले आहे.

 साडेतीनशे वर्षाचा कालावधि आला नि गेला, तरीहि ज्याचे नुसते नांव म-हाठ्यांच्या हातून आजहि काश्मीरच्या बर्फाळ नि डोंगराळ रणांगणावर शिकंदरी पराक्रम घडवीत आहे, त्या स्वयंभू छत्रपतीच्या तपशीलवार क्षात्रकर्माचा महिमा गाताना मुक्यांनाहि वाचा फुटावी. कविजनांच्या काव्यस्फूर्तीचा वसंत उफाळून बहरावा, खणखणीत शेकलेल्या डफावर दणदणाटी थाप मारून शाहिरांनी पवाड्यांच्या ललकारीत आपल्या उमाळ्याचा पाट सताड मोकळा सोडावा. कवित्व-गायनासाठी पाटांनाहि पोपटी कण्ठ फुटावे आणि खेड्यापाड्यांतून पहाटेची दळणे दळताना

 शिवनेरीच्या आंगणांत खेळे

 जिजाईचा तान्हा
 नांव शिवबाचे घेतां फुटे

 मावळाला पान्हा
 अशी प्रेमळ आयाबायानी गायलेली गोड भावगीते ऐकून चण्डोलाचाहि गर्वभार उतरावा.

 छत्रपती शिवाजी म्हणजे सगळ्या जगानें आमचा हेवा करण्यासारखा अक्षय चैतन्याचा वहाता झरा आहे. रामनामाने समुद्रावर शिळा तरल्याच्या कथा ख-याे माना, खोट्या माना, पण माणुसकीला नि स्वत्वाला आरपार मुकलेल्या, दगड धोंड्याच्या गुलामी जिण्याने जगणा-या मावळच्या अडाणी शेतक-यांच्या कानांत चैतन्याची फुंकर मारून, कोठेच काही नव्हते अशा

 शून्यातून स्वराज्याचे ब्रम्हाण्ड

 निर्माण करण्याची शिवरायाने सिद्ध करून दाखवलेली किमया, म्हणजे जागतिक क्रांत्यांच्या इतिहासातला भूतो (एकदाच घडलेला) पण पुढे न भविष्यति (कदापीहि न घडणारा) असा अनन्यसामान्य चमत्त्कार म्हणून न्यायी नि निस्पृह विचारवंतांनी मुक्त कण्ठांनी वाखाणला आहे आणि कालान्तापर्यंन्त वाखाणतील.

 स्वयंभू छत्रपति.

 लेखांक ३ रा.

 भारतीय महायुद्धांत गाजलेल्या भीष्माचार्याचे तत्वज्ञान, विदुराची नीतिमत्ता, दुर्योधन भीमादि गदाधा-यांचा पोलादी कणखरपणा, द्रोणाचार्यादि धनुर्धरांचे कोदण्डचापल्य, कर्णाचा लोकोत्तर दिलदार उदारपणा, व्यासादि ऋषि मुनींची धर्मप्रतिष्ठा आणि वाकड्या दरात वाकडी मेढ ठोकण्याची श्रीकृष्णाची राजकारणी दगलबाजी उर्फ डिप्लोमसी

 शिवरायात एकवटली होती.

 अशा अनन्ससामान्य पुरुषोत्तमाचा वारसा नि प्रभाव आम्हा म-हाठ्यांच्या पाठीशी सावलीसारखा उभा असतांहि, गेल्या नि चालू जमान्यात आमची अवस्था इतकी हलाकीची, लोलंगतीची, पराधीनतेची आणि निलाजरेपणाची कां ? हा कां चा प्रश्न माझ्या विवेकाला सारखा टोचीत बोचीत असतो. मोंगल अंमदानीत सहज एकादा म-हाठा बारगीर किंवा शिलेदार दिल्लीच्या राजरस्त्यावरून जाताना कोणाला दिसला का

 म-हाठे आले की काय ?

 या धास्तीने दिल्लीसकट बादशाही राजवाड्याचा थरकाप उडायचा. ब्रिटिशांच्या आमदानीतही म-हाठा एक अचक्या दचक्याचा पर्वल समजला जात असे. तेच म-हाटे आज मेंग्या वृत्तीने कां जगताहेत ? सामान्य पुढारी व्यक्तिविषयी राहू द्याच, पण खुद्द शिवाजी महाराजांविषयी कोणी काही अनादराचे बोल काढले, तरीहि आम्हाला त्याचे काही वाटेनासे झाले आहे.

 अरे म्हणतांच कां रे चा तडाखा

 देण्याची शिवरायाने आमच्या नसांत रुजवलेली स्वाभिमानाची चैतन्यशक्ति आजच कशाने इतकी महिरून बधिर थंडगार पडली ? दरसाल शिवरायाचे उत्सव आम्ही साजरे करतो. खूप लंबीचौडी व्याख्याने झोडतो. कथाकीर्तनांच्या परवडी रचतो. तेवढा दिवस गेला का झाले. पहिले पाढे पढपंचावन. या अवस्थेचे कारण शोधता शोधता मला एकच निर्णय घ्यावा लागला. तो हा की

 शिवाजीला आम्ही माणसांतून उठवले

 त्याला देवावतार ठरवला. असतील नसतील त्या भरंसाठ चमत्कारांच्या उकीरड्याखाली त्याच्या वाजवी महात्म्याला गाडून दृष्टीआड केले. शिवाजीचे पराक्रम म्हणजे ईश्वरी लीला. त्याची स्वराज्य स्थापना म्हणजे काय ?  तर गाईचे रूप घेऊन क्षीरसागरात हंबरडा फोडीत गेलेल्या भूमातेला (म्हणजे फक्त छोटेखानी दक्खन प्रांताला) श्रीविष्णूने दिलेले वरदान. शहाजी राजे भोसले अयोध्येच्या दशरथाचे अवतार बनल्यावर, जिजामातेला

 कौसल्येची नाटकी भूमिका

 वटवणे भागच पडले. जिजामातेच्या कुसव्यात गर्भसंभव होतांच, त्या गर्भाचे पुल्लिंग, त्याचे व्यवहारी नांव, त्याचे अवतार-महात्म्य, फार काय पण त्याच्या भावी चरित्रातल्या तपशीलाच्या लहान मोठ्या गोष्टींचा, शहाजीच्या स्वप्नात आणि आकाशवाणीने सुद्धा, पुकारा करायला रामदास स्वामी वा-यासारखे उभ्या दक्षिणेससंचार करू लागतात. असल्या विकृत अवतारवादी नि सनातनी चष्म्यातून शिवाजीच्या चरित्राकडे पहाण्याची खोड आमच्या हाडीमासी खिळल्यामुळे, शिवचरित्रापासून पूर्वी आम्ही काही शिकलो नाहीच, पण यापुढेहि काही शिकता येणार नाही आणि बोधहि घेता येणार नाही.

 पुराणवादी सांप्रदायिकांचा गाथागोंधळ

 म-हाठ्यांच्या इतिहासाला आणि विशेषतः शिवचरित्राला भोवलेला हा एक महारोग आहे. अवतारवादाची कल्पना वा भावना वरवर पहाणाराना कितीहि साजिरी गोजिरी वाटली, तरी ती व्यक्तीच्या समाजाच्या आणि राष्ट्राच्या कर्तव्यशक्तीला खच्ची करणारी, वर्तमान कालोचित नवनव्या महत्वाकांक्षांचे कोंब उगवतांच चुरगळणारी एक विषारी कीड आहे. थोर पुरुषांच्या रूपाने ईश्वरच अवतार घेईल तेव्हा मानवतेच्या हाल अपेष्टांचे आणि जुलूम जबरदस्तीचे निवारण होणार, तुम्हा आम्हा मलमूत्रजन्य  ते सुद्धा देवा धाव च्याच हाका आरोळ्या मारणारे. अहो दूर कशाला ?  एवढे मोठे पाश्चिमात्य विद्य संस्कृत वीर विनायकराव सावरकर. ‘’माझा कान धरण्याचा अधिकार फक्त एकट्या शिवाजी महाराजांनाच आहे. ’’ अशी दर्पोक्ति जेव्हां ते अवसानात येऊन करतात, तेव्हा स्वतःला ते शिवाजीचे अवतारच समजतात, नव्हे कां ? असली मोठमोठी कर्तबगार नि वाचारवंत माणसेच जर अवतारवादाच्या फंदात गुरफटलेली, तर आमच्या शाहीर नाटककार कादंबरीकार सिनेमाकारांविषयी बोलायलाच नको. त्यानी शिवचरित्राचे जितके धिंडवडे केले आहेत, तितके शिवाजीच्या कट्टर वै-यांनीहि केलेले इतिहासात आढळत नाहीत. शिवकालीन युरपियन वखारदारांनी शिवाजीला आपापल्या पत्रव्यवहारांत लुटारू, दगाबाज, बण्डखोर, भुरटा स्वारीवाला, आग्यावेताळ अशी अनेक नांवे ठेवली असली, तरी त्यांनीहि त्याच्या पौरुषाचा, पराक्रमाचा, धा़डसाचा आणि लष्करी चातुर्याचा जेथल्या तेथे वाजवी सत्कारहि केलेला आहे. शिवचरित्रातील महत्वाच्या ठळक प्रसंगाविषयी

 वास्तववादी सत्येतिहास

 आज संशोधकाना त्या शिवद्वेष्ट्या परक्या गो-या वखारदारांच्या नि फिरंग्यांच्याच पत्रव्यवहारात शोधावा लागत आहे.    



जागतिक संघर्षाने आणि आंग्लायी राजवटीच्या चिकित्सक सांनिध्याने आमचा (निदान आंग्लज्ञानस्पर्शितांचा तरी) सर्वकारणी मनोविकास कितीहि झालेला असला किंवा दिसला, तरी अवतारवादाचा चिकटा होता तसाच आजहि कायम घर धरून बसला आहे. तो तसाच कायम रहावा, आणि त्याच्या कायमपणात

 साक्षरांची नाक्षरांवरची कुरघोडीहि

 तितकीच कायम रहावी, अशा खटपटी करणारा शिक्षितांचा (मी त्यांना सुशिक्षित म्हणू इच्छित नाही) एक संप्रदायहि समाजात वावरत आहे. त्यानी सत्यशोधनाच्या रुबाबानं लिहिलेली राष्ट्रीय वीर वीरांगनांची चरित्रे हमखास अवतारवादाच्या अथवा जातीय श्रेष्ठत्वाच्या भ्रामक कावेबाज शिडकावाने आरपार चिता़डलेलीच असल्यामुळे, त्यांचे वास्तववादी रूप सामान्याना समजेनासे होत असते.

याचा परिणाम काय ? तर

उदण्ड खस्तीची कामे

 मर्द कसा मारून जातो, याचा दीडदोनशे वर्षात महाराष्ट्राला फारसा प्रत्यय घेताच आलेला नाही. जरा कुठे कुणी विशेष बुद्धिमत्ता, विशेष कर्तबगारी, विशेष पराक्रम दाखवला पुरे, का घातलाच त्यांनी त्याला देवावताराच्या देव्हा-यात आणि चालवला सपाटा त्याच्या भजन पूजनाचा. मग काय ?  त्याच्या साध्यासुध्या मानवी जीवनाला भरंसाट आणि अमानुष चमत्कारांचे दाट रोगण फासायचे. त्याच्या शक्तियुक्तीच्या चिंतनीय प्रबोधनीय अथवा अनुकरणीय प्रभावाला ईश्वरी लीलांच्या कोंदणात जाम दडपायचे. त्याच्या यशाबरोबरच अपयशांची चिकित्सा व्हायची नाही. त्याच्या कर्तबगारीचे श्रेयहि त्याच्या पदरात भरपूर पडायचे नाही. उदार कर्णाच्या अवसानाने आईबापाच्या, एखाद्या पंतोजीच्या, दोन चार समकालीन साधू संतांच्या किंवा आजूबाजूच्या अलबत्या गलबत्यांच्या झोळण्यांत कोंबून ते पार मोकळे होतात.

 इतिहासात पुराणथाटी वांगी

 ऐतिहासिक वस्तुस्थितीच्या काट्याच्या अणीवर कल्पनेचे भले मोठे गांव बसवण्याचा धंदा पुराणकारांनी आणि बखरकारांनी आजवर रगड केला हा एक हट्टवादी संप्रदायच आहे आणि तो आजही जिवंत चालू आहे. बाहेरून सत्यशोधनाचा ते मोठाच दिमाख मिरवतात मात्र काटेकोर सत्याचे माप पुराव्यासकट पदरात घेताना

 सैतानी थैमान करतात.

 शिवाजीला शंकराचा अवतार ठरवायचे, एवढे निश्चित झाल्यावर, त्याचे जीवनाचे एकंदर चित्र हे सनातनी सांप्रदायीक कसे रंगवतात ते पहा.

 पृथ्वी (म्हणजे कोकण मावळचा महाराष्ट्रच बरे का) यवनाक्रांत झाली. (ती नेहमीच्या ठरावाप्रमाणे अथवा सरावाप्रमाणे) गाईचे रूप घेऊन हंबरत ओरडत क्षीरसागरात वसति करणा-या श्रीविष्णुकडे नेहते गेली (विष्णूला त्या वेळी फुरसद नसल्यामुळे) त्याने शंकराकडे जा असे सांगितले. श्रीशंकरानी शहाजी भोसल्याच्या जिजाऊच्या (तुकारामाच्या जिजाऊच्या नव्हे) पोटी अवतार घेण्याचे आश्वासन दिले. ताडकन् तशी (त्या काळी रेडिओचा शोध लागलेला नसतांहि) आकाशवाणी झाली. उभ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ती ऐकली. प्रथम ती रामदासांनी ऐकली. मारुतीचे अवतारच ते ! ते शहाजी भोसल्याच्या स्वप्नात गेले.

 तुझ्या पोटी शंकरावतार

 होणार, तो भूभार हलका करणार, ही बातमी सांगितली. हातात नारळाचा प्रसादहि दिला. शहाजी जागा होऊन पाहातो तों स्वामी गुप्त. पण नारळ प्रत्यक्ष हातात. केवढा चमत्कार ! नवरा बायकोनी खोबरे खाल्ले. जिजाऊ गरोदर राहिली. तिला डोहाळे पडू लागले. (अवताराचे डोहाळे ते. तेव्हा रामायणातल्या श्रीराम माता कौसल्येच्या ख-या-खोट्या-डोहाळ्यांची नक्कल पठवणी प्राप्तच.) ती एकदम बेफाम झाली. आरडा ओरड करू लागली. (छत्रपति ही पदवी स्वता शिवाजीने वयाच्या १६व्या वर्षी स्वतः निश्चित करून स्वीकारली नि जाहीर केली, तरी)

 माझ्या उदरी छत्रपति येणार

 आणा आणा माझी भवानी, कुठे आहे तो अफझुलखान, कुठे आहे तो दुष्ट पापी औरंग्या, बोलवा माझे सवंगडी तानाजी मानाजी येसाजी बाजी, असा सारखा कल्होळ मातला. सा-या दक्खन देशात या डोहाळ्यांची नि अवताराची कथा फैलावली. जो तो अवताराची वाट पहात बसला. अखेर शंकराच्या वरदानाबरहुकूम तंतोतंत शिवनेरीलाच शिवाजी जन्माला आला. बारशाच्या घुग-या खायला रामदासहि आले. शहाजीने मोठा उच्छाव केला.

 ही काय वस्तुस्थिति, इतिहास, का आहे तरी काय ?  मिरजेचे कै. खरेशास्त्री बोवा. मोठे व्युत्पन्न चिकित्सक आणि इतिहासभक्त त्यांनी महाराष्ट्र नाटक मंडळीसाठी लिहून दिलेले

 शिवसंभव नाटक पहा.

 त्यात असलाच सारा गाथागोंधळ अक्षरशः त्यांनी केलेला आढळेल. याचे कारण हेच की केवढेहि जाडे संशोधक झाले तरी तेहि अवताराच्या जादूने भारलेले नि महिरलेलेच असल्यामुळे, त्यांनाहि आपल्या स्वकपोलकल्पित नाटकात पौराणीक वांग्याच्या भरिताचा मुरका मारल्याशिवाय रहावले नाही. सालोसाल शिवजयंति साजरी करणा-या पोटभरू धंदेवाईक कीर्तनकारांच्या कथा या नि असल्याच भरंसाट भावचित्रानी रंगवलेल्या असतात. आणि चांगले शिकले सवरलेले, वास्तववादाचा टेंभा मिरवणारे शहाणेहि मुकाट तोंडी माना डोलवीत तसली कीर्तने ऐकत बसतात. त्या कीर्तन प्रवचनांत काव्य असले तरी

 सत्य वस्तुस्थितीचा चोळामोळा

 भरपूर असतो. पण कवि शाहीर पुराणकार कीर्तनकार भाटाना अटकाव करणार कोण ?  स्तुतिपाठ करायचेच ठरल्यावर हव्या त्या माणसाचा देव बनवणे शाहीर भाट तोंडपुज्यांचा जिभलीचा मळ. मागे लोकमान्य टिळक वारले तेव्हा कै. अच्युतराव कोल्हटकरांसारख्या वास्तवताभिमानी पत्रपंडितानेहि, पगडी अंगरखा उपरणे धोतर (पुणेरी) जोड्यांसकट क्षीरसागरात शेषासनावर टिळक आरामशीर पहुडल्याचे चित्र काढून

 टिळकांना शेषशायी भगवान बनवले

 नव्हते का ?  अवतारवादाचा इतका वाह्यात विचका हिंदुस्तानाबाहेरच्या एकाहि देशात झालेला किंवा होत नसेल.

 ------------------------

 स्वयंभू छत्रपति

 लेखांक ४ था.

 इतिहास म्हणजे काय ? ‘इतिहास म्हणजे अस्तित्वात नसलेल्या माणसाने, कधीहि न घडलेल्या फिसाटांचे लिहून ठेवलेले बाड ’ अशी एका तत्ववेत्त्याने टिंगल केलेली आहे. हेन्री फोर्ड म्हणतात, ''इतिहास म्हणजे नुसती थापबाजी. '' नेपोलियनचा अभिप्राय मजेचा आहे. ''पुष्कळांनी (जाणते नेणतेपणाने) संमति दिलेल्या गाथागोंधळाच्या अफवा एकत्र केल्या का बनला इतिहास. '' आणि त्या ''अफवांचा गाळून काढलेला अर्क म्हणजे इतिहास, '' असे कार्लाइल म्हणत असे. इतिहासाच्या मुख्य

 जिव्हाळ्याचा विषय राजकारण.

 राजकारण हा बुद्धिबळाचा डाव. हार जीक हुचमल्ली समुद्राच्या भरती ओहोटी सारखी त्यात चालूच. राजकारणपटू बुद्धिबळाच्या पटावर बसलेला असो अथवा ------------ घेऊन खडा असो, हमखास यशाची त्याला खात्री असत नाही. एवढा मोठा पृथ्वीराज चव्हाण. महमद घारीला ज्याने सहा वेळा समरांगणात चीत केले, त्याच्याच हातून अखेर त्याला मरणाला मिठी मारावी लागली. स्कॉटलंडचा विल्यमन वॉलेस शिवाजीची प्रतिमा. इंग्लंडच्या जोखडातून तोहि आपल्या

 मायदेश स्कॉटलंडच्या मुक्तीसाठी

 थेट अगदी शिवाजीसारखा झगडला. पण त्याचा फासा उलटा पडला ! एकहि कवि भाट शाहीर आज त्या बिचा-याचे संकीर्तन करीत नाही कशाला करतील ? यशवंत झालेल्या राजकारणाचेच स्तुतिपाठाचे पवाडे गाण्याचा त्यांचा धंदा.

 एकादे राजकारण यशवंत झाले म्हणजे ते सत्यमयच असते, असा सिद्धांत काढणेहि धोक्याचे आहे. पांडवांचे राजकारण यशस्वी झाले आणि कौरवांचे फसले. कारणे काहीहि असोत, पांडव श्रेष्ठ ठरले. त्यांचा प्रताप गाताना व्यासाने पांडव माहात्म्याची अतिशयोक्त स्तुति करून कौरवाना

 दुष्टांतले दुष्ट नि अधमांतले अधम

 ठरवले. तसे केल्याशिवाय त्याच्या काव्य रचनेचे चोज पुरले नसते आणिखोडसाळ घालघुसडीचे प्रकार

 मुबलक झालेले आहेत. परस्परविरुद्ध पुरावे पुढे आले म्हणजे त्यातले निर्भेळ सत्य शोधून काढण्याचे किचकट कर्म इतिहास-संशोधकांना करायचे असते. कडवा निस्पृह सत्यशोधक सशाच्या सिंगाइतकाच महाग. बहुतेक संशोधक या ना त्या पंथाच्या किंवा संप्रदायाच्या पचनी पडलेले पोटार्थी किंवा गोटार्थी असतात. शिवाजीचा जन्मच मुळी पार्टी पालिटेक्सच्या कचाकचीत झालेला. सासरा जाधवराव विरुद्ध जावई शहाजीचा तंटा विकोपाला गेला असतानाच शिवाजीचा जन्म झाला. पुढे हयातभर घरच्या दारच्या नातेवाइकांच्या जातगोतवाल्यांच्या कितीतरी अनेकमुखी विरोधी संप्रदायांशी त्याला निकराचा लढा देतदेत ध्येयाचा मार्ग चोखाळावा लागला. तो जिवंत असतानाच पत्नि सोयराबाई विरुद्ध पुत्र संभाजी पार्टीची धुसफूस चालू होती. त्यांच्या मृत्यूनंतर तर त्या विरोधाने स्वराज्यात कहर उसळून दिला. भाट बखरकार होतेच आसपास, एकाने संभाजीची बाजू उचलून धरावी, दुस-याने राजाराम बालयुवराजाला ‘सुबुद्ध जाणता ’ ठरवून

 बलात्कारें ब्राम्हणी भोगिली

 च्या आरोपाने संभाजीला यथास्थित बदनाम करावा. शाहू विरुद्ध ताराबाई, गोपिकाबाई विरुद्ध आनंदीबाई, बारमाई विरुद्ध राघोबा दादा, नाना फडणीस विरुद्ध रावबाजी, सखाराम हरी गुप्ते, सखाराम बापू बोकील, असे कितीतरी पार्टी-पॉलिटिक्सचे वादप्रवाह म-हाट्यांच्या इतिहासात आढळतात. त्या एकेका संप्रदायाचे कट्टर अभिमानी आजही आमच्या समाजात इतिहास संशोधकांच्या मुखवट्याने मिरवत आहेत. ती एक घराणेदार परंपराच चालूं झालेली आहे म्हणाना. जुन्या राजवटी कालोदरांत गडप झाल्या तरी त्यांच्या पक्षीय वादांची भुतें आजहि नागडीउघडी सर्वत्र नाचताहेत. या त्यांच्या हट्टवादी सैराट थैथयाटाला ‘इतिहास-संशोधन’ असे चखोट नांव प्राप्त झालेले आहे.

 काव्य म्हणजे इतिहास नव्हे,

       लेखन-मुद्रण कला प्रचारात येईतोवर पराक्रमी (म्हणजे राजकारणाची शर्यत जिंकून विजयी झालेल्या) नृपतीचा इतिहास तोंडातोंडी कविताबद्ध रचनेत फैलावण्याचा प्रघात प्राचीन आहे. रामायण महाभारत या महाकाव्याना आपण इतिहास समजतो, तरीहि तीं काव्ये आहेत, त्यात अणूएवढे ऐतिहासिक सत्य, बाकीचा स्तुतिपाठक कविजनांचा कल्पनाविलास, हे सत्य नजरेआड करता कामा नये. काव्यरचना असली म्हणजे ती लवकर तोंडपाठ होते, म्हणून पूर्वी सारे इतिहास कविताबद्ध जतन करण्याची वहिवाट असे. इतिहासाने काव्यरचनेचा पद्यप्रदेश सोडून

 बखर-लेखनाच्या गद्याळ मैदानावर

 पाऊल ठेवले, तरी काव्य-रचनेने आंगवळणी पाडलेले उपमा अलंकार उत्प्रेक्षादि कल्पनाचातुर्याचे सर्व प्रकार गद्य बखरीनीहि भरपूर स्वीकारले. बखरकारहि अवतारवादापासून मुक्त नव्हतेच. लोकोत्तर पुरुषोत्तमांचे चरित्रगायन प्रथम कवि-हृदयालाच स्फूर्तीचे चैतन्य देणार. मग ते हृदय गद्यात बोलो वा पद्यात गाऊ लागो. शिवचरित्राचे बहुतेक बखरकार जरी त्याचे

 समकालीन नसले तरी निकटकालीन

 होते. जुन्यातल्या जुन्या म-हाठी बखरी एकंदर पाच उपलब्ध आहेत. सभासदी (सन १६९७) चित्रगुप्त (स.१७५९), ९१-कलमी (स.१७८०), राजवाडे संशोधित बखर खं.४ (सन १७८२) आणि प्रभानवल्ली (सन १७९८). बाकीच्या सगळ्या सन १८०० नंतरच्या. मल्हार रामराव चिटणिसांची बखर १८१० तली. त्यानंतरहि शिवकालीन शिवभारत काव्य (१६७४), राज्याभिषेक शकावली (१६७४), जेधे शकावली (१६९७), तंजावर शिलालेख (१८०३), फोर्ब्स कलेक्शन्स (स.१६७४), थेव्हेनोचे प्रवासवृत्त (स.१६६७), ऑर्मचा इतिहास (स.१७८३) आणि स्पिंजलचा इतिहास (स.१७८२), एवढी जुनी नवी सामुग्री हस्तगत झालेली आहे. शिवकालीन रोजनिशा नि पत्रव्यवहार चिटणीस घराण्याच्या संग्रही मुबलक होता, तेथेच तो वास्तविक असणार. पण छत्रपति प्रतापसिंहाच्या पदच्युतीच्या धामधुमीत सातारची जी दुर्दैवी राज्यक्रांति झाली, त्यावेळी बाळाजीपंत नातूने चिटणिसांचा सातारचा वाडा (कै. रावबहादुर काळे रहात होते तोच पूर्वीचा चिटणिसांचा वाडा.) लुटला आणि तेथील

 आठरा उंट भरतील एवढे कागदपत्र जाळून त्यांची होळी केली.

 त्यात तो सर्व ऐनजिनशी संग्रह कायमचा नष्ट झाला. सभासद चित्रगुप्त चिटणिसादि बखरकारांनी कर्णोपकर्णी सांगोवांगीने ऐकलेल्या गोष्टी दंतकथादिकांचा संग्रह, स्वतःच्या काव्याचूर कल्पनांचा खमंग मसाला घालून, आपापल्या बखरीत नमूद करून ठेवला, हे त्यांचे उपकार मोठे आहेत. अनेक प्रसंगांची उलटापालट, कालगणनेच्या चुका, तिथी मिती वादांचे घोटाळे त्यांत कितीही असले, तरी ठोकळेवजा माहिती का होईना, पण ती त्यानी अक्षरांकित करून आम्हाला दिली, हे आमच्यावर त्यांचे मोठे ऋण आहे. प्रत्यक्ष शिवकालीन असे परमानंद कवीचे शिवभारत आणि भूषण कवीने रचलेले शिवराज-भूषण आणि शिवा-बावनी हे काव्यग्रंथ उपलब्ध आहेत.

       बोलून चालून काव्यग्रंथात कवींना इतिहासात काव्य दिसले तरी काव्यातला इतिहास शोधून काढणे कठीण कर्म. वस्तुस्थितीचे प्रमाण किती आणि काव्यलाघवाची अतिशयोक्ति किती, याची न्यायनिष्ठूर चिकित्सा करावी लागते. भूषण कवीचीच गोष्ट घ्या. तो तर शिवाजीला प्रत्यक्ष भेटला होता. शिवाजीचे नुसते दर्शन होताच त्याची काव्यस्फूर्ति बहरली आणि त्याने ‘शिवाबावनी’ नावाचे कल्पनारम्य काव्य हिंदीत रचले. ''महाराष्ट्राचा आत्मा अशा शिवरायाचे यथातथ्य गुणवर्णन करून या कवीने महाराष्ट्रास ऋणी केले आहे. '' असा श्री काटे नामक इतिहास-संशोधकाचा अभिप्राय आहे. अलंकार-शास्त्रात शिवा-बावनी हा काव्यग्रंथ कितीहि थोर असला आणि विद्वानाग्रणीना तो शिरसावंद्य असला, तरी त्या शिव-समकालीन शाहिराच्या

 काव्यात इतिहास आहे काय ?

 अणूरेणूएवढे सत्य आणि त्यावर शाहिरी अलंकाराचा गडगंज फुलवरा. थोडासा नमुना पहाः-

 ''हत्तीघोडे सजवून सैन्याची तयारी करतांच, भावी आपत्तीच्या भयाने दिल्लीवासी दिलगीर झाले. मोंगल स्त्रियांचे हाल तर विचारूच नका. त्यांना आपल्या आंगातील चोळ्यांचे नि सद-यांचे तसेच पायांतील विजारींचे नि जोड्यांचे भान राहिले नाही. त्या आपल्या सुखशय्या सोडून उन्हातान्हातून भटकू लागल्या. पतीच्या बाहूपाशांतून कधी अलग न होणा-या त्या रमणी वृक्षांच्या छाया शोधू लागल्या... बेगमा आणि राण्या केश न बांधता म्लान वदनाने विजारी नि उत्तरीय वस्त्रांच्या नि-या सांवरून आग-याच्या महालाच्या सौधावरून धडाधड उड्या मारून पळताहेत.... जंगलातील बोरे वेचून गुजराण करताहेत. कित्येक (मोंगल) उमराव (शिवाजी दिल्लीवर येणार म्हणून) भेदरले. यमुना नदीच्या किना-याने दडून बसले आहेत. खुद्द बादशहा मक्केस जाण्याच्या मिषाने आपल्या बेगमास नावेतून नि दासीना होड्यांतून समुद्रपार करीत आहे. ''

 प्रतिभा, अलंकाराची रेलचेल, कल्पनेचा उन्माददायक विकास नि विलास आणि उपास्यदेवाचा भरगच्च स्तुतिपाठ कितीहि मोहक असला, तरी वस्तुस्थितीच्या विपर्यासाकडे कोणालाहि दुर्लक्ष्य करता येण्यासारखे नाही. काव्य म्हणून शिवाबावनीची गोडी कितीहि असली, तरी त्यात इतिहास नाही. म्हणूनच, आजकालचे संप्रदायीक सनातनी इतिहास संशोधक आणि नाटके कादंब-या नि बोलपटवाले, या नि असल्याच विपर्यासी कविकल्पनांवर

 ऐतिहासिक सत्याचे आंगडे टोपरे

 चढवण्याचा उपद्व्याप करतात, तेव्हा त्यांच्या बुद्धीमांद्याची कीव करावीशी वाटते.

 -----------------

prabodhankar.org/node/356/page/0/31

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा