रविवार, २९ जानेवारी, २०१७

प्रबोधनकार ठाकरे व महात्मा गांधी

प्रबोधनकार ठाकरे व गांधी
सामान्य माणसे अशा प्रकारे गांधींच्या मागे उभी असताना मग त्यांना विरोध तरी कोण करीत होते आणि कशा प्रकारे, हा प्रश्न उपस्थित होतो. गांधींना विरोध
करणा-यांमध्ये जहाल हिंदुत्ववादी होते, त्याचप्रमाणे अस्पृश्यतेला पाठिंबा देणारे कर्मठ सनातनी हिंदूही होते. जहाल हिंदुत्ववाद्यांमधील काहींना हिंदूंच्या ऐक्याला आड येणारी बाब म्हणून अस्पृश्यता मान्य नसली, तरी काही जण मुसलमानांप्रमाण स्पृश्यांनाही दूर ठेवायला हवे, असे मानणारे होते. या मंडळींमध्ये खुद्द गांधी ज्या वर्णाचे होते, त्या वैश्य वर्णाचे व्यापारीही होते. हे व्यापारी गांधीविरोधी पक्षाला आर्थिक मदतही करीत, गांधींच्या वैष्णव संप्रदायातील काही कर्मठही गांधींचे विरोधक होते.
गांधींचे हे विरोधक गांधींचे प्राण घेण्याची मजल गाठेपर्यंत पुढे गेले होते. शेवटी हे कृत्य पार पाडण्याचे कार्य नथुरामने केले असले, तरी ते करण्याची इच्छा असणा-यांची संख्या उपेक्षणीय खचितच नव्हती. गांधींवरील पुण्यामधील बॉम्बहल्ल्याबद्दल पुरेशी चर्चा करून झालेली आहेच. येथे महाराष्ट्रातील आणखी एका प्रसंगाची माहिती द्यायची आहे.
ब्राह्मणेतर चळवळीमधील एक जहाल नेते व पत्रकार केशवराव ठाकरे हे नाना अभ्यंकरांप्रमाणेच एक अष्टपैलू आणि हरहुन्नरी व्यक्तित्व होते. ‘प्रबोधन’ पत्रामधून ब्राह्मणांविरुद्ध रान उठवणा-या ठाकरे यांना गाधींबद्दल जिव्हाळा होता व तो गांधी ब्राह्मणेतर असल्यामुळे. एरवी त्यांच्या मांडणात एक प्रकारचा हिंदुत्ववाद अनुस्यूत होताच.
१९३८ मध्ये ठाकरे ‘वॉर्डन इन्शुअरन्स’ या विमा कंपनीचे एजन्सी सुपरिटेंडेंट या नात्याने व-हाड-खानदेशच्या दौ-यावर आले होते. ते अकोले येथे आले, त्या दिवशी सायंकाळी गांधी तेथे हरिजनकार्याच्या दौ-यासाठी येणार होते. तेथील एका मराठा मुद्रकाच्या छापखान्यात काही मारवाडी तरुणांनी गांधींचा निषेध करण्यासाठी आणून ठेवलेली काळी निशाणे व निशाणे लावयण्यासाठी जमा केलेल्या काठ्यांची मोळी ठाकरे यांच्या नजरेस पडली. त्या काठ्यांची जाडी पाहून त्यांना वेगळीच शंका आली. निशाणाच्या काळ्या कापडापेक्षा जाडजूड काठ्यांचाच उपयोग अधिक होण्याची शक्यता त्यांच्य मनात तरळून गेली. त्यांनी त्या मराठा मुद्रकाला निशाणांचा बंदोबस्त करायला सांगितले व तो त्याने त्याप्रमाणे केलासुद्धा.
ठाकरे यांनी ‘माझी जीवनगाथा’ या आत्मवृत्तात दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी अकोल्यात गांधींच्या येण्याच्या मार्गावर टोकदार खिळे पसरवून त्यांच्या मोटारगाडीची चाके पंक्चर करण्याचा, गांधींच्या गाडीवर झाडाची फांदी पाडण्याचाही प्रयत्न झाला. ‘‘पाहिलेत, गांधींनी हरिजन उद्धाराचा प्रश्न हाती घेतलाय, म्हणून या ऑर्थोडॉक्स लोकांचा केवढा संताप उसळला आह तो!’’ अशी एका इन्स्पेक्टरची प्रतिक्रियाही ठाकरे यांनी नोंदवली आहे.
दुस-या दिवशी सायंकाळी शहरात गांधींच्या सभेला लाखो लोक जमले होते. पण इकडे गांधींच्या निवासासमोरील पटांगणात ४०-५० टोळभैरव छात्या उघड्या टाकून सताड उताणे पडलेले! ‘जाना हो तो छातीपरसे जाव,’ या त्यांच्या गर्जना चालू होत्या. बाहेर रस्त्यावर पोलीस अधिकारी नि पोलीस तो तमाशा पाहत दिङमूढ उभे. ‘गांधीजींना बाहेर पडायला वाटच नाही. कसेही करून म्हाता-याला बाहेर काढलेच पाहिजे. तिकडे तर पहाटेपासून मैदानावर लोकांची गर्दी. काय तरकीब काढावी,’ याचा ठाकरे आणि पोलीस अधिकारी यांच्याच खल सुरू झाला. ठाकरे त्यांच्या साहेबी थाटाच्या ड्रेसमुळे पोलिसांपैकीच दिसत होते. त्याचा हा परिणाम. चिंताक्रांत पोलिसांपुढे ‘हे पाहा, माझ्या युगतीने सांगेन तसे कराल काय? पाप-पुण्याचा प्रश्न आता नाही. मी प्रथम बेधडक यांच्या छातीवरून चालत जातो. तुम्ही पाठोपाठ आले पाहिजे. आहे तयारी?’ अशी योजना ठाकरे यांनी ठेवली, तेव्हा पोलीस त्यासाठी तयार झाले. त्यानुसार आधी ठाकरे आणि मग पोलीस बाजूला होण्याच्या विनंतीला दाद न देणा-या ‘लडदूं’च्या छातीवरून ताडताड बूट आपटीत गांधींच्या निवासापर्यंत पोहोचले. तेव्हा झालेला ठाकरे-गांधी संवाद–
गांधी – (हसत) आँ, ठाकरेजी, आज आप इधर कैसे?
ठाकरे – आपको प्रणाम करने आये. सभास्थानको जाना है ना आपको? लाखो लोगोंकी भीड हुई है मैदानमें, चलिये।
गांधी – कैसे जाना सत्याग्रहीं की
ठाकरे – देखा, सत्याग्रह इज अ बायएज्ड सोर्ड (सत्याग्रह ही दुधारी तलवार आहे.) (गांधी नुसते हसतात.)
ठाकरे – आपको सभास्थानपर जाना ही पडेगा महात्माजी।
गांधी – कैसे जाऊँ, कहो ना।
ठाकरे – सत्याग्रहीयों के छातीपरसे हम आये, वैसे।
गांधी – नहीं, नहीं. मेरे से वैसा नहीं बनेगा. यह तो बडा पाप है।
गांधी ठाकरेमार्गाने जाणे शक्य नाही, हे लक्षात आल्यावर ठाकरे यांनी पोलिसांरोबर त्या इमारतीची पाहणी केली. बंगल्याच्या मागील बाजूस एक गल्ली होती. ती रहदारीची नव्हती आणि तेथून सभास्थानापर्यंत जाणे शक्य होते. त्या गल्लीच्या बाजूला इमारतीची गॅलरी होती आणि गॅलरीला लागून खाली कुसाची बुटकी भिंत होती. ठाकरे यांनी दोघांना गल्लीत उभे केले, दोघांना कुसावर. गांधींना ‘चलिये महात्माजी, चलिये. सब तयारी हुयी. अब बातही करना नही।’ असे म्हणत उठवून गॅलरीत आणले. पोलिसांच्या साहाय्याने गांधींना गॅलरीतून कुसावरच्या दोघांनी घेतले. तेथून खालच्या दोघांनी अलगद खाली उतरवले. पोलीस अधिका-यांनी धडाधड उड्या मारून त्यांना सोबत केली आणि सारे जण चालत चालत झपाट्याने मैदानाकडे रवाना झाले. दोन-तीन मिनिटांतच ‘महात्मा गांधी की जय’ जयघोषाच्या आरोळ्या मैदानावर होऊ लागल्याचे कानी पडताच अंगणातले सत्याग्रही लडदू भराभर उठून बाहेर पडू लागले. त्यांना दरवाजावर संगिनी रोखून पोलिसांनी अडवून धरले आणि मग गांधींची सभा सुरळीत व सुखरूप पार पडली.
हा सर्व प्रकार शहरवासीयांना कळल्यावर संतापाची लाट उसळली. गांधीविरोधकांची छीः थू होऊ लागली. लोक त्यांच्या घरासमोर जमून त्यांना शिवीगाळी करीत धमक्या देऊ लागले. सार्वजनिक संतापाचे ते विराट स्वरूप पाहून काही व्यापा-यांनी, काही स्थानिक ब्राह्मणेतर पुढारी आणि पोलीस यांच्या मध्यस्थीने कॉटन मार्केटच्या आवारात ठाकरे यांचे व्याख्यान ठरवले. ठाकरे यांनीही घडलेल्या घटनांचा पाढा स्पष्ट बोलून विरोधकांच्या हीन वृत्तीचा खरपूस समाचार घेतला. दोन-तीन मारवाडी व्यापा-यांनीही पश्चात्ताप व्यक्त केला आणि महात्मा गांधींची जाहीर माफी मागितली. त्यामुळे जनतेचा क्षोभ शांत झाला.
या काळात व-हाडमधील ब्राह्मणेतर मंडळी काँग्रेसमध्ये आली होती. चार-पाच दिवसांनंतर मोर्शी येथे झालेल्या सभेत गांधींना देण्यात आलेले मानपत्र वाचून दाखवले, ते डॉ. पंजाबराव देशमुखांनी. गांधींचा तेथील मुक्काम होता, प्रसिद्ध ब्राह्मणेतर वकील नानासाहेब अमृतकर यांच्या घरी. त्यांनी व पंजाबरावांनी ठाकरे यांनाही तेथे बोलावले होते. तेथील सभेत ठाकरे यांनी गांधींच्या बारीक आवाजातील हिंदी भाषणाचा मराठी सारांश श्रोत्यांना मोठ्याने ऐकवला. त्यामुळे त्यांचा घसा बसून त्याचे खोबरे झाले. सभेनंतर त्यांचा तो आवाज ऐकून गांधींची विनोदबुद्धी जागृत झाली. ते हसून म्हणाले, ‘‘कैसा किया. ठीक हुआ नं? पूनेमें मेरेको ठाकरेजीने भाऊराव पाटील के बारेमें इतना छेडा था, इतना छेडा था, बस, कह नहीं सकता। आज मैंने उस बातका पूरा बदला ले लिया।’’
प्रबोधनकार ठाकरे गांधीवादी कधीच नव्हते, काँग्रेसनिष्ठही नव्हते. ते ब्राह्मणेतर चळवळीचे कट्टर पुरस्कर्ते असले, तरी त्यांचे वर्णन ब्राह्मणेतर हिंदुत्ववादी असे करता येईल.


http://prabodhankar.org/node/220/page/0/6

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा