रविवार, २९ जानेवारी, २०१७

गांधीजींच्या संदर्भात संघाच्या काही विशिष्ट जाहीर भूमिका आहेत. त्यांतील एक म्हणजे गांधीहत्येशी संघाचा संबंध नाही. नथुराम संघस्वयंसेवक नव्हता.

गांधीजींच्या संदर्भात संघाच्या काही विशिष्ट जाहीर भूमिका आहेत. त्यांतील एक म्हणजे गांधीहत्येशी संघाचा संबंध नाही. नथुराम संघस्वयंसेवक नव्हता. दुसरी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांची संघाप्रति सहानुभूती होती. त्यांनी संघाला ‘क्लीन चीट’ दिली होती. आणि तिसरी म्हणजे गांधी हे संघास प्रात:स्मरणीय आहेत. या तिन्ही भूमिकांतील हुशारी आणि असत्ये दृग्गोचर करतानाच संघ आणि मोदी हे गांधींचे कशा प्रकारे अपहरण करू पाहात आहेत हे दाखविणे हा या पुस्तकाचा हेतू असल्याचे तिस्ता यांची प्रस्तावना सांगते. गांधीजींच्या ‘सेक्युलरत्वा’चा शोध घेता घेता, संघास त्यांचे नेमके का वावडे होते हे त्यांनी यातून दाखवून दिले आहे. गांधींबाबत नेहमीच एक अडचण होते, ती म्हणजे ते सत्याचा सापेक्ष आणि निरपेक्ष अशा दोन पद्धतीने विचार करीत असत. सापेक्ष सत्य हे बदलू शकते, हा त्यातील महत्त्वाचा भाग. माझे आजचे आणि कालचे मत यांत भेद असेल, तर माझे आजचे मत प्रमाण मानावे, असे ते सांगत तेव्हा ते सापेक्ष सत्याबद्दलच बोलत असत. परंतु भल्याभल्यांची यामुळे दांडी उडाली आहे. परिणामी गांधींचे चातुर्वण्र्यविषयक विचार घेऊन त्यांच्यावर टीका करणारे आजही सापडतात. या पाश्र्वभूमीवर तिस्ता यांनी गांधींच्या जातीय आणि धार्मिक मतांबाबत निर्णय देताना ते अखेरीस सेक्युलरत्वापर्यंत आल्याचे नमूद केले आहे. हा महत्त्वाचा मुद्दा असून, त्यावर अधिक चर्चा होणे खरोखरच आवश्यक आहे. प्रस्तावनेत त्यांनी चर्चिलेले विविध मुद्दे पुढे पुस्तकात वेगवेगळ्या लेखांच्या आणि पुराव्यांच्या स्वरूपात पुढे येतात. त्यात अर्थातच सरदार पटेल यांचा संघाविषयीचा पत्रव्यवहार पाहण्यासारखा आहे. सरदार हे जणू गांधींच्या मरणाची वाटच पाहात होते, किंबहुना सरदार हे प्रच्छन्न हिंदुत्ववादी होते अशा प्रकारे त्यांची प्रतिमा रंगविण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांत सुरू आहेत. त्यांवर या पत्रव्यवहाराने पाणी पडतेच, परंतु सरदारांना संघविचार अजिबात मान्य नव्हता हेही समजते. अर्कायव्हल ट्रथमधील या नोंदी पाहिल्यावर मोदी हे सरदारांचा पुतळा का उभारत आहेत, या प्रश्नाचे नेमके उत्तर मिळून जाते. यातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर तातडीने नष्ट करण्यात आलेल्या फायलींबाबतचा माहिती अधिकार कायद्याखाली झालेला पत्रव्यवहार. या फायलींत अशी कोणती रहस्ये होती हे सरकारने दडवून ठेवले आहे. त्याच्या नोंदीच सरकारकडे नाहीत किंवा त्या दिल्या जात नाहीत. त्याबाबत वेंकटेश नायक यांनी केलेला अर्ज, त्यास आलेले उत्तर तसेच या फायलींचे सत्य जाणून घेण्यासाठी देशातील अनेक मान्यवरांनी केलेली ऑनलाइन याचिका हे सर्व या भागात येते. नेताजींबाबतच्या फायली खुल्या करणारे हे सरकार या फायलींबाबत मात्र स्पष्ट काही सांगत नाही हे सारे संशयास्पद असल्याचे हे पुस्तक नोंदवून जाते. या भागातील धक्कादायक प्रकरण आहे ते त्रिदीप सुहृद यांचे. त्याचे शीर्षक – रीएडिटिंग गांधीज् कलेक्टेड वर्क्‍स. हा ‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल वीकली’ (२० नोव्हें. २००४) मध्ये प्रसिद्ध झालेला लेख. केंद्र सरकारच्या माहिती-प्रसारण खात्याच्या प्रकाशन विभागाने प्रसिद्ध केलेले आणि के. सुदर्शन यांच्यासारख्या विद्वानाच्या नेतृत्वाखालील संपादक मंडळाने संपादित केलेले गांधींच्या समग्र वाङ्मयाचे खंड हा एक मोलाचा ठेवा. परंतु १९९८ मध्ये या खंडांचे फेरसंपादन करण्यात आले. त्यांत अनेक बदल करण्यात आले. काही संदर्भ गाळण्यात आले. एवढेच नव्हे तर काही कागदपत्रांचे, पत्रांचे सोयीस्कर भाषांतर करून ते या खंडांत घुसडण्यात आले. हा उद्योग कशासाठी करण्यात आला हे समजण्यासाठी त्या काळात केंद्रात वाजपेयींचे सरकार होते हे माहीत असण्याची गरज नाही. गांधी व त्यांचे द. आफ्रिकेतील मित्र हर्मन कलेनबाख यांच्यातील ‘पत्रव्यवहाराची मानसशास्त्रीय तपासणी’ करून गांधी हे समलैंगिक संबंध ठेवणारे होते अशी मांडणी करणारे लेख प्रसिद्ध झाले आहेत. याचा एक पुरावा काय, तर गांधींच्या काही पत्रांच्या अखेरीस ‘सीनली युवर्स’ असे लिहिलेले होते. आता सीन्सिअर्सली हा शब्द पूर्वी सीनली असाही संक्षेपाने लिहीत हे बहुधा माहीत नसल्याने असा घोळ घालण्यात आला. हे पाहता भाषांतरातील घोळाने पुढे काय होऊ  शकते याचा अंदाजही लावणे कठीण आहे. गांधी संपविण्यासाठी काय काय सुरू आहे याचा हा एक नमुना मांडून हा विभाग संपतो.

http://www.loksatta.com/athour-mapia-news/beyond-doubt-a-dossier-on-gandhis-assassination-1393244/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा