रविवार, २९ जानेवारी, २०१७

येळकोट राहीना,मूळस्वभाव जाई ना प्रतिस्पर्ध्यांविषयी घाणेरड्या कुचाळक्या फैलावून त्याला बदनाम करण्याची पेशवाई मुत्सद्द्यांची परंपरा

येळकोट राहीना,मूळस्वभाव जाई ना

प्रतिस्पर्ध्यांविषयी घाणेरड्या कुचाळक्या फैलावून  त्याला बदनाम करण्याची पेशवाई मुत्सद्द्यांची परंपरा बारभाईपासून आजवर अखंड चाललेली आहे.या कामात ते अंग्रेजांचे संगोत्री म्हटले तरी चालेल.आज स्थापन झालेल्या हिंदी संघराज्याच्या कारभारात पेशवे संप्रदायिकांना "पक्का काट"मिळालेला आहे.आणि देशाच्या राजकारणातही त्यांना कोणी कोठे विचारात नाही.दिल्लीच्या हिंदू महासभावाल्याना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाल्याना चिथावून नेहरू सरकार उलथून पडण्याच्या अपयशी कटाने या बहिष्काराचा वचपा काढण्याचा उपद्व्याप थोड्याच दिवसांपूर्वी जनजाहीर झालेला आहेच.जवाहरलाल नेहरू,वल्लभ भाई आणि त्यांच्या राजकारणी हालचालींची निरर्गल शब्दात निंदा त्यांच्या पुणेरी पत्रांत रोज चालू असते.महात्मा गांधींची सर्वच्या सर्व मते सर्वानाच पटतात असे नाही.पान ते एक राजकारणी पुरुषोत्तम आहेत,जगद्वंद्य साधू आहेत.यांची साक्ष पंचखंड दुनिया देत असतानाही ह्या पिंडाचा हरेक आसामी आणि त्यांची आचकट,विचकट शिव्या देऊन आपल्या पिढीजात खूनसटपणाचे प्रदर्शन कसे करीत असतात ,हे पहिले म्हणजे रंगो बापूजीला त्यांनी "देशद्रोही"ठरवले प्रतापसिंहाला "नादान "म्हटले ,शाहू छत्रपतींना "स्वराज्यद्रोही"शिवी हासडली.बळवंतराव चिटणिसाला "लाचखाऊ भाडखाऊ "म्हटले आणि तमाम कायस्थ प्रभू जमातीला "स्वराज्यबुडवे" जाहीर करण्याचा खटाटोप केला,तर समंजस जनता यावरून काय बोध घ्यायचा तो घेतच असते.

लोकशाही जागृती कालपरवाची

आमच्या देशात अंग्रेज नको ,हा सत्तावानी विचार एकसारखा वाढत्या प्रमाणावर बळावत असला,तरी 1885 साली जन्माला आलेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसलाही लोकसत्ताक निर्भेळ स्वराज्याची जाणीव नव्हती.कायदेशीर मार्गाने ब्रिटिश साम्राज्यांतर्गत वसाहतीच्या स्वराज्यापुरत्याच तिच्या खटपटी असत.लॉर्ड कर्झन नें बंगालची फाळणी करताच वंगभंगाचा जो स्फोट झाला,त्याच वेळी राष्ट्रीय भावनेचा हिंदुस्थानात उगम झाला.डॉ.बेझंटबाईंनी होमरूलची चळवळ चालू केली आणि हिंदू मुसलमान ऐक्याचे तांबडे हिरवे निशाण दिले.अलीकडच्या काळातील हिंदुस्थानचे हेच पहिले राष्ट्रीय निशाण देशाला दिले.या निशाणावरही पुण्यातल्या टिळक पक्षाने आक्षेप घेतला आणि त्यात एका कोपऱ्यात अंग्रेजांचा युनियन जॅक बावटा रंगवून,आपल्या पक्षाचे वैशिष्ट्य जाहीर केले.होमरूल चळवळीपासून राष्ट्रीय भावनेला आणि स्वराज्याच्या प्रश्नाला जोर चढला.तरीही काँग्रेस म्हणजे शहरी शहाण्यांच्या पोषाखी चळवळीचे केंद्र म्हणूनच राहिली.हा काळ पावेतो महाराष्ट्रातल्या क्रांतिकारकांच्या खटपटी केवळ पांढरपेशा मूठभर अनुयायांच्या संघटनेवरच उभारलेल्या होत्या.खेड्यापाड्यातल्या समाजाच्या पाठिंब्याची कोणालाही दाद नव्हती,काही परवाच नव्हती .वासूदेव बळवंटांचा दीक्षाविधी घेणारे अनुयायी काय,अथवा सावरकरांच्या अभिनव भारताचे दीक्षित काय,एकजात सारे कोण होते .खरा हिंदुस्थान शहरात नसून तो खेड्यात आहे.तो शेतकरी कामकऱ्यांचा कोट्यवधी बहुजन समाज उठवल्याशिवाय ,या शहरी शहाण्यांच्या पोषाखी चळवळी फुकट आहेत .हे बिनचूक हेरून काँग्रेसला अस्सल लोकशाही शक्ती बनविण्याची कामगिरी महात्मा गांधींनी बजावलेली आहे.गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस हि लोकशाही स्वराज्यप्राप्तीची जबरजस्त शक्ती कशी बनली,हा इतिहास तुमच्या आमच्या डोळ्यांपुढे घडलेला असल्यामुळे तो येथे सांगण्याची आवश्यकता नाही.जातपात .धर्म ,स्पृश्यास्पृश्य यच्चावत साऱ्या भेदांना महात्मा गांधींच्या काँग्रेसने सफाचट तिलांजली देऊन.खऱ्या खऱ्या लोकशाही सामर्थ्यावर हिंदीसंघराज्याचे  स्वप्न आज सिद्ध करून दाखविल्यामुळे,पेशवाई राज्याच्या पुनर्घटनेने हिंदुस्थानाला आबाद करण्यास सजलेल्या जातीयवादी संघाना चालू घडीच्या राजकारणात द्वारपाळाचीहि जागा नाही.

संदर्भ : प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी ,सिंहावलोकन,लेखक :प्रबोधनकार ठाकरे.
पान नं : 433,434

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा