सोमवार, ३० जानेवारी, २०१७

अल्लाउद्दीन खिलजी ला महाराष्ट्रात कोणी बोलावले होते


अल्लाउद्दीन  खिलजी  ला महाराष्ट्रात  कोणी  बोलावले होते
http://googleweblight.com/?lite_url=http://maharashtratimes.indiatimes.com/edit/samwad/-/articleshow/21167520.cms&ei=6gJMK3ze&lc=en-IN&geid=9&s=1&m=284&ts=1449672334&sig=ALL1Aj5QC7AETRiSzAur4Q_LWqinZIKzBw

अतिशय महत्त्वाची माहिती ह्या सर्व पुस्तकांतून पुढे येते , ती म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी वा त्याच्या सरदारांस येथल्या असंतुष्ट व्यापारी व सरदारांनी दिलेले आमंत्रण. विठ्ठलदासाची कथा , भागडचुरीचे कारस्थान व गुजराती कादंबरीतील माधवाने अल्लाउद्दीनला घातलेले साकडे हे सगळे वरील विधानास पुष्टी देणारे असून

भविष्यपुराणात ह्या पराभवाचे भविष्य दाखविणारे श्लोक घुसडून हा पराभव अटळ आहे , तो क्षत्रियांनी स्वीकारावा , मुळात लढूच नये असा विषारी प्रचार समाजात केला गेला , त्याचा उल्लेख इतिहासकारांनी का केला नाही हे कळू शकत नाही.
अशोक सावे
'महिकावतीची बखर' संपादित करून इतिहासाचार्य राजवाडे यांनी मुंबई म्हणजेच उत्तर कोकणच्या इतिहासावर नव्याने प्रकाश टाकला. मात्र त्यांनी लावलेल्या अन्वयांपेक्षा वेगळे संदर्भ डहाणूचेच असलेल्या अशोक सावे यांनी शोधून काढले. या नव्या संदर्भांसह 'महिकावतीची बखर' लवकरच एशियाटिक सोसायटी व पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रसिध्द होत आहे. या नव्या संदर्भांची लेखकाने करून दिलेली माहिती...

मुंबई कोणे एकेकाळी (इ.स. ११३८ व इ.स. १२९६) कोणी वसवली, कोणी इथे वसाहत करून भातशेती व फळबागा उभारल्या, इथल्या वैराण प्रदेशात लाखो दामांचे बागायती उत्पन्न कोणी निर्माण केले, मुंबई-ठाणे परिसरात किती युद्धे झाली व त्यात इथल्या क्षत्रियांनी किती पराक्रम केला, दक्षिणेच्या मोठ्या राजाला - रामदेव यादवाला - तीन वेळा कोणी हरवले, व शेवटी त्याची ससेहोलपट कशी झाली, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे वाचकांस येथे मिळणार आहेत.

ह्या बखरीतल्या काही गोष्टी अधोरेखित कराव्याशा वाटतात त्या अशा :

- ‍वि. का. राजवाड्यांनी दाखविल्याप्रमाणे बिंब राजा एक नसून दोन आहेत. एक प्रताप बिंब (चंपानेर) व दुसरा बिंब यादव (रामदेवरावाचा मुलगा).
- भाईंदरच्या खाडीच्या उत्तरेकडच्या प्रदेशाचे कोणतेही उल्लेख (उदा. केळवे-माहीम ते दमण इत्यादी) ह्या बखरीत नंतर नाहीत, तसेच सूर्यवंशी सरदारांचे उल्लेख प्रताप बिंबाच्या कारकिर्दीत नाहीत. कारण मूळ सोळंकी (साधारण इ.स. १०२५) राजाने हा भाग व्यापला होता व प्रताप बिंबाने बारा सूर्यवंशी सरदारांना तेथेच वसवले. त्यामुळेच प्रताप बिंब केळवे-माहिमास अगदी थोडा थांबून मुंबईस आला.
- ‍मुंबईसंबंधात असे सतत लिहिले जाते की, मुंबई ब्रिटिशांनी वसवली. त्या आधी हे बेट निर्जन होते. ब्रिटिशांनी मुंबईला आजचे स्वरूप दिले ह्याविषयी वाद नाही. तथापि ही बखर वाचल्यावर वाचकांच्या लक्षात येईल की, मुंबई ११३८ पासून १३४० पर्यंत अहिनलवाडच्या बिंबाने, घणदिव्याच्या नागरशाने आणि देवगिरीच्या बिंब यादवाने आणलेल्या (व पूर्वी येथलेच असलेल्या) कुळांनी झाडे लावली, फळबागा, फुलबागा फुलवल्या, महाल बांधले, घरे बांधली, बंदरे जितीजागती केली, मुंबईच्या रक्षणासाठी डझनभर लढाया करून कुर्बानी दिली व एवढेच नव्हे तर ह्या नव्याने आलेल्या कुळांपैकी आठ जणांस वाडिया नावाच्या बोटी बांधणाऱ्या निष्णात तज्ज्ञांकडून गलबते-बोटी बांधण्याचे शिक्षण दिले. तेव्हा इतिहास नव्याने समजून घ्यावा, ज्याचे श्रेय त्यास द्यावे, ही गोष्ट वाचकांच्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या व विद्यापीठांच्या लक्षात आणून देण्याचे कार्य ह्या पुस्तकातून व्हावे अशी खूप इच्छा मनी धरून आहोत.
अतिशय महत्त्वाची माहिती ह्या सर्व पुस्तकांतून पुढे येते, ती म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी वा त्याच्या सरदारांस येथल्या असंतुष्ट व्यापारी व सरदारांनी दिलेले आमंत्रण. विठ्ठलदासाची कथा, भागडचुरीचे कारस्थान व गुजराती कादंबरीतील माधवाने अल्लाउद्दीनला घातलेले साकडे हे सगळे वरील विधानास पुष्टी देणारे असून, स्थानिक राजांच्या जाचास कंटाळून वा मान-अपमानाच्या नाट्यांतून हे भयंकर सत्य घडलेले आहे. रामदेवरावाचा पराभवसुद्धा अशाच स्थानिक कुरबुरीतून झाला असणार. स्थानिक क्षत्रिय क्षात्रवृत्ती विसरल्याने तुर्काण झालेले नाही. ह्यावर ताण म्हणूनच की काय, भविष्यपुराणात ह्या पराभवाचे भविष्य दाखविणारे श्लोक घुसडून हा पराभव अटळ आहे, तो क्षत्रियांनी स्वीकारावा, मुळात लढूच नये असा विषारी प्रचार समाजात केला गेला, त्याचा उल्लेख इतिहासकारांनी का केला नाही हे कळू शकत नाही.

प्रथमतः राजवाडेंकृत 'महिकावतीची बखर' कित्येक वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आली होती. त्या आधी अनेकांच्या तोंडून त्याविषयी ऐकले होते. इतरांना ज्ञात नसलेले हे पुस्तक, उत्तर कोकणाच्या ह्या भागात मात्र चर्चेचा विषय असे. कारण ह्या पुस्तकात बिंबाबरोबर जी कुळे आली त्यांच्याशी ह्या भागाचा व इथल्या कित्येक कुळांचा थेट संबंध पोहोचत होता. ह्या बखरीत उल्लेखलेली चौधरी, म्हात्रे, पुरो, चुरी, सावे, ठाकूर, राऊत, पाटेल, चोघले ही कुळे येथे अजून राहतात. त्याच मानापमानाच्या संकल्पना मनात बाळगून वावरताना दिसतात. इथल्या समाजांची नावेसुद्धा तीच आहेत; उदा. सोमवंशी क्षत्रिय, शेषवंशी क्षत्रिय, सूर्यवंशी क्षत्रिय, पांचाळ, दरणे, वैती इत्यादी. त्यामुळे प्रथमतः मला हे पुस्तक केवळ एका छोट्याशा भागाशी निगडित असल्याचे जाणवले व वरील समाज कधी, कोठे, कसे होते व येथे कसे आले, का आले, त्यांची गोत्रे, कुलदेवता कोणत्या व त्यांनी किती लढाया मारल्या ह्यापलीकडे मला ह्या पुस्तकाचे महत्त्व जाणवले नाही. तथापि इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी हे पुस्तक संपादित करून त्याला एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली ह्याची जाणीव मात्र होती.
त्यानंतर इथल्या समाजासंदर्भातून काही लिखाण करताना ही बखर तुकड्या-तुकड्यात परत परत वाचली व अपरांताच्या मध्ययुगीन इतिहासाचे अनेक कंगोरे समोर येऊ लागले. मागच्या तीन वर्षांत याची जाणीव तीव्र झाली व जे विशेष आहे, तसेच जे तर्कास न पटणारे लिहिले गेले आहे, ते पुन्हा लिहून वाचकांपुढे मांडावे असे सतत वाटू लागले व त्याचीच परिणती म्हणजे हे पुस्तक. ती वाचकांपुढे ठेवताना मला खूप आनंद होत आहे.

केशवाचार्यांपासून ते वि. का. राजवाड्यांपर्यंत सर्वांनी गृहीत धरले आहे की ह्या बखरीत कार्यरत झालेले क्षत्रिय हे क्षात्रतेजहीन होते व केवळ भोजनभाऊ होते, त्यामुळेच असले दिवस महाराष्ट्राच्या ह्या भागाच्या कपाळी आले. वास्तविक वरील विस्तृत विवेचन वाचले व ह्याच क्षत्रियांनी सातत्याने जिंकलेल्या लढाया पाहिल्या तर असे कोणीही म्हणू शकत नाही. तसे असते तर ह्या क्षत्रियांनी भर दरबारात निका मलिक व भागडचुरीला आव्हान देऊन त्यांना सरळ केले नसते. निका मलिकला त्याचमुळे हे राज्य नायत्यांना द्यावे लागले. पुढे पोर्तुगीजांच्या पराभवासाठी हेच क्षत्रिय कामाला आले, ह्याची कृतज्ञतापूर्वक जाणीव ठेवली तर ह्या तेजस्वी, शूर व धर्मपरायण क्षत्रियांना दूषणे देण्याचे धाडस कोणास होऊ नये. असल्या विपर्यस्त विधानांचा शोध घेणे व सत्य पुढे आणणे हाही ह्या पुस्तकाचा एक हेतू आहे हे येथे मांडणे आम्ही आवश्यक समजतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा