रविवार, २९ जानेवारी, २०१७

रामदासी संप्रदाय व प्रबोधनकार

रामदास संप्रदाय व प्रबोधनकार ठाकरे
स्वराज्यस्थापनेचे संपूर्ण श्रेय शिवाजीला कोणीच देत नाही.
त्या श्रेयाच्या वाडग्यावर अनेक जण आपापला हक्क सांगायला स्वर्गातून कोकलत आहेत. त्या उप-यांचा हक्क शाबीत करण्यासाठी अनेक पंडित त्यांचे वकीलपत्र घेऊन, ख-या खोट्या बनावट पुराव्यांची बाडे चिकित्सकांसमोर तावातावाने फलकावीत भिरकावीत आहेत. बोटाएवढ्या चिटो-यातून हत्तीच्या पोटाएवढा मुद्दा काढीत आहेत. त्यावर रणे माजताहेत आणि महाराष्ट्राच्या पिण्डाला झोंबलेल्या दुहीची आग हरहमेशा चोहीकडे भडकत आहे. श्रेय-वाटणीचे हे वाद, वरवर दिसायला, पंडिती चिकित्सकी थाटाचे नि सत्यशोधनाच्या अवसानाचे दिसले, तरी त्यातला सांप्रदायीक हट्टवाद आणि जातिविशेष माहात्म्याचे स्तोम फारसे लपण्या छपण्या सारखे नाही. काय दुर्दैव आमचे नि शिवप्रभूचे ! वादाचा प्रारंभ त्याच्या जन्मतिथीपासूनच. पोतदारी कंपूच्या आग्रहाप्रमाणे होळीच्या पोळीनंतर ३ दिवसानी फाल्गुनी ठणाणा करीत शिवाजी जन्मला असो, किंवा बहुसंख्य पंडितांच्या आणि बखरीच्या निर्णयानुसार तो वैशाखी द्वितियेला थवा अक्षयतृतीयेला जन्मला असो,

शिवाजी नावाचा कोणी थोर पुरुषोत्तम
कधितरी जन्मला होताच होता,
या मुद्याविषयी फारसा कोठे वाद नाही, हे तरी दुक्कात सुख होय. जन्मतिथीचा वाद सनातनी विरुद्ध वास्तववादी असा चाललेला आहे. संशोधनकार्याच्या पाव शतकाच्या उभ्या आयुष्यात पुणेकर बामण पंडिताना एकहि अपूर्व शोधाचे श्रेय मिळवता आलेले नव्हते. इतक्यात त्यांच्या हातीं, ‘भाऊबंदकीच्या भानगडीच्या पुराव्यांसाठी ’ मुद्दाम लिहिलेली जेधे शकावली हाती पडली. तीत ही नवी फाल्गुनी तिथी दिसतांच, त्यांचा आनंद पर्वतीच्या कळसावर नाचू बागडू लागला. अर्थात्
शेण्डी तुटो, पारंबी तुटो,
अशा पुण्यपतनभूच्या स्वाभिमान्यांनी अभिनिवेशाने उर्फ हट्टवादाने त्या नव्या तोतया तिथीचा – निदान आपल्या गोवागोवच्या छावण्यापुरता तरी – फैलावा केला आणि लोकमताला भुलळ पाडली, तर त्यात मानवी स्वभावाच्या विरुद्ध असे काहीच नाही. सांप्रदायीक हट्टवाद सत्याचीहि मुस्कटदाबी किती कुशलतेने करतो, याचे हे एकच ठळक उदाहरण लक्ष्यात ठेवण्यासारखे आहे.
स्वराज्यस्थापनेचे श्रेयसुद्धा शिवाजीला नाही.
हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपति, ही बिरुदावली स्वता शिवाजी महाराजांनी जरी राज्याभिषेक प्रसंगी आसेतुहिमांचल डंका वाजवून जाहीर केली, तरी त्या स्वराज्य स्थापनेचे संपूर्ण श्रेय शिवाजी घेऊ म्हणेल, तर ते अवतारवादी सनातन्यांना बिलकूल मान्य नाही. ते म्हणतात ''अहो, शिवाजीचा जन्म होण्यापूर्वीच किती तरी वर्षे महाराष्ट्रातल्या एकूणेक साधूसंतानी स्वराज्य-स्थापनेसाठी
लोकमताची जमिन नांगरून
उकरून पोखरून जय्यत तयार ठेवली होती. '' आस्सं ? बरं, त्या तयार जमिनीत स्वराज्याचे बी बियाणे शिवाजीने पेरले, एवढे तरी कबूल करता काय ? ''छट् तेहि नाही. रामदासाने ते बियाणे शिवाजीला पुरवले आणि त्याचा हात धरून फक्त पेरणी करविली. इतकेच काय, पण पुढच्या सा-या मशागतीहि रामदासांनीच शिवाजीकडून आपल्या
खास देखरेखीखाली
करवून घेतल्या.

रामदासानी सांगावे आणि शिवाजीने वागावे, असा सारा मामला होता. रामदास नसते तर शिवाजीच्या हातून काय होते ? एकहि पराक्रम, एकहि साहस, एकहि मुकाबला पार पडता ना. दिल्ली आग्र्याच्या सापळ्यातून त्याला रामदासांनीच सोडवले. समर्थांचे लंगोटधारी हज्जारो शिष्य आग्रा ते राजगड वाटेवर शिवाजीच्या सहायासाठी ठाण मांडून उभे उभे होते, म्हणूनच तो दक्षिणेत सुखरूप येऊ शकला. (राजवाडे तर्क) ही तर्काची कमान येथेच थांबलेली नाही. लोकसंग्रहाचे श्रेयसुद्धा शिवाजीच्या वाट्याला ते देत नाहीत. ''महाराष्टात गावोगावी खेडोपाडी
जयजय रघुवीर गर्जनेचा अफाट प्रसार
करून, रामदासांनीच शिवाजीचा लोकसंग्रह अपरंपार फुलवला. नाहीतर शहाजी भोसल्याच्या निरक्षर पोराची काय छाती होती स्वराज्यासारखा प्रचंड व्यूह उभारण्याची. स्वराज्याची किमया बामणेच आपल्या पवित्र मेन्दूच्या भट्टीत सिद्ध करू शकतात. येरा गबाळाचे ते काम नोहे. ''
स्वराज्य स्थापनेच्या श्रेयाचा नि कर्तबगारीचा मोठा लठ्ठ लोण्याचा गोळा समर्थ रामदासांच्या भिक्षांदेही कटो-यांत पडल्यावर, इतरहि आलूते बलुते त्या श्रेयाच्या वाडग्याचे कांठ चाटायला आजूबाजूला उभे होतेच. दादोजी कोंडदेवाने शिवाजीला राजकारणाचा शिरीगनेशा शिकवला, कारभाराची संथा दिली. तलवारीचे हातपट्टे शिकवले. माता जिजाबाईनें रामायण महाभारताची पुराणे ऐकवून, त्याला किंचित धार्मिकपणा पढवला असेल. नाही असे नाही. पण धर्मश्रद्धेचा पक्का मुलामा रामदासांनीच चढवला. शिवाय, तानाजी नेताजी बाजी दाजी हे मावळे त्याच्या हाताशी होतेच त्यांच्या श्रमसाहसावर
शिवाजीच्या पराक्रमांचे --ल्हारे
थाटले गेले.

कादंबरी वजा या सगळ्या थापा हिशोबात घेतल्या, म्हणजे एकच प्रश्न उरतो. तो हाच शिवाजीच्या वाट्याला उरले तरी काय ? आणि त्याचे उत्तरहि एकच. काही नाही. स्वराज्य कल्पनेचे, स्थापनेचे, संगोपनाचे, वर्णनाचे आणि अखेरच्या राज्याभिषेकाचे सुद्धा श्रेय एकट्या रामदासांच्या झोळीत अडकल्यावर,
शिवाजी नुसता कुंकवाचा धनि
उरतो. उपलब्ध इतिहासाचे स्पष्टवाची पुरावे धाब्यावर बसवून, हा एकच सिद्धांत लहान थोर, साक्षर नाक्षर यच्चयावत् म-हाठ्यांचा मनांवर आणि पिण्डांवर बिंबवण्याचा शिस्तबाज कसोशीने अखंड खटपट करणारा एक कारस्थानी संप्रदाय महाराष्ट्रात आहे. छापखाना आणि देवळा मठांतील, त्याचप्रमाणे सार्वजनीक व्यासपीठे त्यांच्याच हातात आहेत (या कामी बामणेतर मठ्ठ अजूनहि पुरे मागासलेलेच आहेत.) सत्यशोधकांनी त्या सांप्रदायिकांच्या
भ्रमांचे भोपळे फोडून
वस्तुस्थितीची चटणी चरचरीत त्यांच्या डोळ्यांत घातली, तरीहि त्यांचा तो खोडसाळ मतप्रसाराचा आटारेटा चालूच आहे. घोरपडीची मान कापून निराळी केली तरी बराच वेळ ती आपल्या जिभलीने माशा मटकावीत असते. नुसत्या लेख, पुस्तके, पोथ्या, पुराणे, प्रवचने यांनी काम भागत नाही म्हणून त्यांनी अलिकडे रामदासाचे देऊळ, सज्जनगडावरील मठाचा जीर्णोद्धार, (करू नये असे कोणाचेच म्हणणे नाही, पण त्याच्या मागला हेतू पहावा लागतो.) आषाढी कार्तिकीची (गेल्या ३५० वर्षात प्रघात नसलेली) रामदासांची पंढरपुरी दिण्डी आणि परवा तर त्यांच्या (ख-या खोट्या) पादुकांची बद्रीनाथ भेटीसाठी चारधाम यात्रेची पालखी काढून, जागोजाग गावोगावी खेडोपाडी नि शहरोशहरी हा
समर्थ शिवाजी-चरित्रातला भेद
गाजवून वाजवून भारतख्यांत करण्याचा खटाटोप केलेला आहे. वरवर पहाणाराना हे मठ, देऊळ, दिंडी, पालखीचे सोहाळे साधेभोळे, निरुपद्रवी नि सोज्वळ देवभक्तीचे वाटले, तरी त्यांत समर्थ रामदास-सांप्रदायिकांचे युक्तिजुक्तीचे फार मोठे गुंथाडे छपलेले आहे, हे प्राकृत संसा-यांच्या फारसे ध्यानात येण्यासारखे नाही.

परवा मुंबई नजिकच्या विलेपारले येथील लोकमान्य संघाच्या इमारतीला भेट देण्याचा योग आला. तेथल्या ब्राम्हण मंडळींनी ही शतावधानी चळवळीची संस्था खरोखरच प्रशंसनीय शिस्तीने चालवली आहे. तेथे मूख्य सभास्थानी दत्तात्रेयासारखी एक तेली रंगाची प्रेक्षणीय तसबीर टांगलेली आहे. संघाचे लोक ती गेली २८ वर्षे आपले दैवत म्हणून भजीत पूजीत आहेत. वाखाणण्यासारखी गोष्ट. त्या दत्ताच्या तीन तोंडाची रचना अशी आहे. समोर मध्यभागी रामदासांचा चेहरा, उजव्या बाजूला लोकमान्य टिळकांचा आणि डाव्या बाजूला शिवाजीचा. असा हा महाराष्ट्राचा दत्तात्रय त्यानी रंगवला आहे. तसे पाहिले तर त्यात – वरवर पहाणाराना – काहीच आक्षेपार्ह वाटणार नाही. त्या तीनहि पुरुषोत्तमांनी महाराष्ट्राचा आपापल्या परीने थोडा फार
इतिहास बनवला आहे,
हे नाकारण्यात काय अर्थ ? पण तेथेहि आतापर्यन्त मी चर्चा केलेला रामदासांच्या अग्रश्रेयाचा मुद्दा ठळकपणे दाखवण्यात आलेला नाही काय ? शिवाजी किंवा टिळक कितीहि थोर असले तरी रामदासांच्या खालीच. त्यातहि पुन्हा टिळकांना उजवी मानाची बाजू आणि शिवाजीला डावी. आग्र्याच्या दरबारातली औरंगझेबी वागणूकच अखेर शिवाजीच्या नशिबी ! विश्वासातले मानकरी उजव्या हाताला, बाकीची येरें डाव्या बाजूला !
निवडक बातमीदार: Page 38 of 50 | Prabodhankar
prabodhankar.org

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा