रविवार, २९ जानेवारी, २०१७

हवा कशाला गणेशोत्सव

http://prabodhankar.org/node/356/page/0/45

प्रबोधनकार ठाकरे

हवा कशाला गणेशोत्सव ?

    ज्या हेतूने अथवा धोरणाने एकादी चळवळ जन्माला येते, तो हेतू अथवा ते धोरण साध्य झाले किंवा देशकाल वर्तमानाच्या सोसाट्यात निर्जीव नि निरुपयोगी ठरले, म्हणजे ती चळवळ तशीच कायम ठेवून पुढे चालवणे अथवा तिचे नवीनीकरण किंवा पुनर्घटन करणे, हा केवळ आग्रही अट्टाहासच होय. ६० वर्षापूर्वी लो. टिळकानी सार्वजनिक गणेशोत्सवाची टूम काढली. हिन्दुंचे एकजीव संघटन व्हावे, त्यांनी मुसलमानांच्या मोहरमसारख्या परधर्मी फिसाटांत भाग घेऊ नये आणि नाच गाणे उत्सव चव्हाट्यावर जमावाने करायचेच तर ते गणेशोत्सवाच्या निमित्तानेच करावे, एक दोन नव्हे तर तब्बल १० दिवस रात्री करावे आणि मनाची हौस पुरवावी, असा तो हेतू होता. गेल्या ६० वर्षात ते संघटन किती झाले, हे ज्याने त्याने आपल्या मनाला विचारावे. मोहरमवरचा बहिष्कार अखेर हिन्दु मुसलमानांची राजकारणी चुरस आणि अखेर पाकिस्तान

 भस्मासुराचा जन्म

 यात उमटला. धर्मबुद्धि झाली म्हणावी तर तिचाही काही थांगपत्ता नाही. उलट उत्सव आणि मेळ्यांतून टिळकपक्षीय प्रतिस्पर्ध्यांच्या हुर्रवडीचे, बदनामीचे आणि समाज-राजकारणी दडपणींचे प्रकार मात्र मुबलक होत गेले. त्याचाच परिणाम बामण-बामणेतर चळवळीच्या वणव्यात भडकला. खुद्द लो. टिळकांच्या घराण्यातहि श्रीगणेश कितीसा फळला ? एका पुत्राने आत्महत्या केली, दुस-याचा

 आरपार हॅम्लेट झाला.

 खुद्द गायकवाड वाड्यातल्या गणपतीलाहि काही वर्ष जाळीदार कपाटात कुलुपबंद कैदखान्याची महापूजा भोगावी लागली. एका साली तर टिळकपुत्र रामभाऊ यांना उत्सवाच्या १० दिवसात येरवडा येथे स्थानब्ध व्हावे लागले. महाराष्ट्राचे तरी गणपतीने असे काय ठळक मंगल केले ? एवढा मोठा बुद्धिदाता देव. सुखकर्ता आणि दुक्खहर्ता. कितीशी दुक्ख त्यानं निपटली नि सुखाचे मळे पिकवले ? एकट्या पुणे शहारात पहा.

 जितक्या पेठा तितके तट

 सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माहेरघरीच हा उकीरडा, तर इतर ठिकाणी कसकसले घाणीचे डोंगर उठलेले असतील, त्याची कल्पनाच केलेली बरी, मेळे कशाला ? तर म्हणे धर्मभावनांच्या फैलावाला. माझ्या आठवणीप्रमाणे, अगदी पहिल्याच वर्षापासून, या मेळ्यानी म-हाठी इतिहासातले हिन्दु-मुसलमान विषयक मुकाबले निवडून, त्यांवर



मुसलमानांची कठोर निंदा



करण्याचा सर्रास धूमधडाका चालवला होता. खुद्द गायकवाड वाड्यात लो. टिळकांच्या समोर संवाद, नाटुकली आणि प्रहसनांच्या द्वारें असले प्रकार बेगुमान होत. पण टिळकांनी एकदाहि प्रत्यक्षाप्रत्यक्ष निषेध केल्याचे दिसले नाही, आस्ते आस्ते ती टिंगल निंदेची महामारी सुधारक स्त्री पुरुष, रानडे, गोखले, परांजपे इत्यादि नामंकित नेत्यांवरहि वळली. टिळकपक्षीय राजकारणाच्या एकूणेक विरोधकांचा निरगेल शब्दांत

 शिमगी समचार घेण्याचे सत्र

 म्हणजे हे गणेशोत्सवी मेळे बनले. या विधानाबद्दल ज्या शंकिताना शंका येत असेल, त्यांनी पुण्याच्या सन्मित्र समाज मेळ्याची पद्यावलीची सगळी पुस्तके मिळवून अभ्यासावी, अशी सूचना आहे. सुधारक आणि तत्कालिन मवाळ पक्ष यांच्या चव्हाट्यावरील निंदेचा धंदा बिनधोक पचनी पडल्यावर, या बामणी मेळ्यांनी आपली परशुरामी वक्रदृष्टी

 बामणेतरांवर वळवली.

 या सुमाराला टिळकपक्षीय बामणांची वर्चस्वबाजी अगदी शिगेला पोहचली होती. समाजकारण असो, धर्मकारण असो, राजकारण असो, गणपति-पूजनाला भिक्षुक बामण जसा हवाच हवा, तसा या सर्वच क्षेत्रांत नारो-सदाशिव-शनिवा-या बामणांशिवाय महाराष्ट्राचे जिणे कुत्राहि खाई ना. बामणी वर्चस्व मदोन्मत्त बनले. त्यांना हटकता दटकता कोणी उरलाच नाही, अशा शेखीत ते गाजरे खात असतानाच, जेधे जवळकर यांच्या शुक्रवारपेठी
बामणेतरी छत्रपति मेळ्याने अशी सणसणीत चपराक लगावली म्हणता, का सालोसाल तो छत्रपती मेळा नारो-सदाशिव-शनिवा-यांच्या आचक्या दचक्याचा विषय झाला. जोंवर स्वतः बामणी मेळे इतरांची टर टिंगल उडवीत होते, तोंवर त्यांची ती करणी वेदोक्त, पवित्र नि शुद्ध असे. पण त्याच हत्यारांनी नि साधनांनी जेव्हा का छत्रपती मेळ्याने हिरिरीचे हल्ले चढवायला सुरवात केली तेव्हा मात्र टिळकी बामणांना सरकार आठवले, त्याचा कायदा आठवला, नीति आठवली, आणि ते सारे एकवटून कलेक्टर गव्हर्नरपर्यंत डेप्युटेशनी धावाधाव करायला कासोटे सरसावून सज्ज झाले. मेळ्यांच्या पद्यावलीवर सरकारी कातर चालू झाली. प्रत्येक मेळ्याबरोबर

 पोलीसांची पाठराखणी

 चालू लागली. एका साली (सन १९२६ –२७) तर गायकवाड वाड्यात कहर उडाला. रामभाऊ आणि श्रीधर टिळकबंधूंनी अस्पृश्यांच्या श्रीकृष्ण मेळ्याला गायकवाड वाड्यात पानसुपारीचे निमंत्रण दिले. आदल्या वर्षी जेधे-जवळकरांच्या छत्रपति मेळ्याने थेट वाड्यात घुसून बामणी वर्चस्वाचे वाभाडे काढल्याचा कडूजहर अनुभव वाड्याच्या ट्र्स्टी बाबा तात्या आण्णांना असल्यामुळे, या निमंत्रणाने त्यांची दाणादाण उडाली. कोर्ट कचे-यांच्या कारवाया चालू झाल्या. श्रीधर टिळकांवर मनाई-हुकूमाचे वारंट घेऊन बेलीफ वाड्याच्या दरवाजावर ठाण मांडून बसला. श्रीधरपंत सकाळीच बाहेर पडले होते. एकटा रामभाऊ सर्व प्रकाराची टेहळणी करीत वाड्यात फिरत होता. संध्याकाळी पोलीसपार्टी दरवाज्यावर येऊन थडकली. रात्री ९ च्या सुमाराला तो अस्पृश्यांचा श्रीकृष्ण मेळा श्री. राजभोज यांच्या नेतृत्वाखाली आणि श्रीधरपंतांच्या म्होरकेपणाखाली वाड्याजवळ आला. रामभाऊ त्यांची वाट पहात रस्त्यावर येरझारा घालीत होताच. पोलिसांनी दरवाजाला आपल्या कड्याची भिंत घातली. इन्स्पेक्टरने मज्जाव चा हुकूम दरडावून गरजला. रामभाऊने दोन तीन हिसड्यात पोलिसांची फळी फोडून धडाड मेळा आत नेला. बेलीफबुवा श्रीधरच्या सहीसाठी त्याच्या मागेमागे हिंदू लागले. त्यालाहि रामभाऊने दरडावून बाहेर बसायला लावले. मेळ्याचा कार्यक्रम, पानसुपारी, गुलाल, प्रसाद सर्व यथास्थित पार पडले. वाड्यातली सारी खटपटी लटपटी बामणें चिमणीसारखी तोंडे करून पहात दूर बसली होती. मेळा गेल्यावर बेलीफाने श्रीधरपंताला वारंट दाखवले, त्याने ते टरारा फाडून टाकले, ‘आता कशाला बंदी करणार तुझे हे चिटोरे ? जा चालता हो ’ म्हणून बेलिफाला हुसकावून श्रीधरपंत घरात गेले. बाबा तात्या आण्णा हात चोळीत बसले.

    ही हकीकत देण्याचे कारण इतकेच की गणपति-मेळ्यांचा किती विचका झाला होता. मूळचे सारे हेतू बाजूला राहून, ते मेळे म्हणजे

 एकमेकाचे हेवे दावे चव्हाट्यावर

 मांडून त्यांवर मनमुराद तोंडसुख घेण्याची यंत्रे बनली होती आणि आजहि तोच प्रकार चालू आहे. हिन्दुसंघटनांच्या मुखवट्याखाली या मेळ्यांना गावोगावच्या टिळकपंथी बामणांनी आपल्या स्वजातीचे माहात्म्य नि वर्चस्व वाढवण्याचे साधन केले, यापेक्षा आणखी कसलीहि फलश्रुति इतरेजनांच्या पदरांत पडलेली नाही. या मेळ्यांनी महाराष्ट्रात बेकीचा आणि हेव्यादाव्यांचा मनस्वी वणवा पेटवण्याचेच दुष्कर्म आजवर केले आहे.

    खरे म्हटले तर अफाट बामणेतरांची गणपति ही देवता कधीच नव्हती. छत्रपतींच्या राजवटीत गणपतीला कसलेच महत्व नव्हते. आज सुद्धां शेतकरी कामकरी बहुजन समाजाची गणपति देवता कोठेच नाही. खंडोबा, ज्योतिबा, अंबाबाई हीच बामणेतरांची दैवते प्राचीन काळापासून पूजली भजली जात होती नि आज आहेत. हे गणपतीचे लचाण्ड चित्पावन पेशव्यांबरोबर

 कोकणातून घाटावर आले.

 त्या काळी काही थोड्याशा बामण आणि पांढरपेशा जमातीच्या घरोघर भाद्रपद शु. चतुर्थीला गणेशपूजन व्हायचे. बामणेतरांकडे तर मुळी होत नसे. पेशवे सत्ताधारी झाल्यावर मात्र त्यांनी गणपतीचे स्तोम वाढवले. कारण ते त्यांचे कुळदैवत. अर्थात मग शनिवार वाड्यात गणेश महाल, गणेश दरवाजा, गणेश पेठ आणि गणेशोत्सव चालू झाले. छत्रपती आणि बामणेतरांच्या जुन्या नवरात्र महोत्सवावर गणेशोत्सवाने कुरघोडी केली. पेशवायी गेल्यानंतर या गणेशमहात्म्याला अर्थातच ओहोटी लागली.

 त्याचे माहात्म्य दीड दिवसावर आले.

 गणपति आणायचा, पुजायचा आणि दीड दिवसानी गुपचूप नदी तलावात कवळासायचा. बस. एवढा प्रघात उरला होता. दूरधोरणी टिळकानी सार्वजनीक उत्सवाच्या कल्पनेला मूर्तस्वरूप देण्यासाठी नेमका गणपतीच उचलला, यात त्यांचा स्वजात्याभिमान आणि कुलाभिमान नव्हताच नव्हता, भट बामणानीच केले तर ते शोभेल. पूर्वापार यच्चयावत् म-हाठी जमातीत रूढ असलेल्या नवरात्राची आठवण त्यांना आली नाही. नवरात्र क्षत्रियांचे आणि गणेशपूजन बामणांचे. अष्टभुजाधारी असुरमर्दिनी जगदंबा क्षात्रतेजाची प्रेरक तीच क्षत्रियांचे भक्तिस्थान. क्षत्रियांना गणेशदेव कधिच मानवला नाही. पण टिळकांनी त्याला सार्वजनिकत्वाचा शेन्दूर फासून महाराष्ट्राच्या पदरात बांधला.

 बळजबरीचा तो मामला

 कितीसा लोकमान्य होणार ?  गणेशोत्सवात रंगणारे बामणेतर, केवळ उत्सवप्रियतेच्या मानवी भावनेमुळेच त्यात भाग घेऊ लागले. यापेक्षा त्यात विशेष काही कधीच नव्हते आणि आजहि नाही. वर्षाकाठी करावयाची काही मजा, ठीक आहे. बसवा एक मूर्ती. घाला मंडप. जमवा वर्गण्या. काढा मेळे. होऊन जाऊ द्या दहा दिवसांची गम्मत जम्मत. देवतेचा मान, काही भक्ति, भाव पापभीरुत्व पावित्र्याची चाड, कोठे काही नाही. खुद्द बामणांजवळच नाही, तर मोलें भजाया घातलेल्या बामणेतरांजवळ कुठली ?

    केवळ करमणूक म्हणून किंवा अनेक पंडितांची पांडित्यपूर्ण कथा, कीर्तने, व्याख्यानें, प्रवचने होतात म्हणून गणेशोत्सवाचा मुलाजा राखायचा तर तसली तहान भूक भागवण्याची शेकडो क्षेत्रे आज लोकाना उपलब्ध आहेत. तेवढ्यासाठी गणेशोत्सवाची काही जरूर नाही आणि ही व्याख्याने प्रवचने तरी काय विषयावर होतात ?  गणेशदेवाचा त्यांच्याशी कितीसा संबंध असतो ? करमणुकीसाठी आता सिनेमा रोज आहेत. रेडियो सारखा २० तास ठणठणत असतोच. बाजारपेठांतून तर त्याचे

 कानठाळीफोड प्रयोग अखंड चालू.

 व्याख्यानांसाठी गावोगाव व्याख्यानमाला चालूच असतात. हवा कशाला मग गणेशोत्सव ? आजवर काय त्याने मोठीशी बुद्धीची, भक्तीची नि माणुसकीची वाढ झाली, तर आता त्याच्या नवीनीकरणानें आणखी कोणाचे पांग फिटणार आहेत ?  वर्षाकाठी लोकांचे खिसे पिळून काढलेल्या पैशांच्या खिरापतीने दहा दिवस कसला तरी जल्लोस करून, काही मतलबी सज्जनांच्या बहूमुखी स्वार्थाची भूक भागवण्यापलिकडे आजवर तरी या गणेशोत्सवाने जनतेच्या कल्याणाची एकहि सिद्धी साधलेली नाही. म्हणून हा उत्सव कटाक्षाने बंदच करण्यात आला पाहिजे. निदान स्वाभिमानी बामणेतरांनी तरी यापुढे त्या फंदात भाग घेऊ नये. त्यांना एकादा महोत्सव हवा असेल तर त्यांनी

 नवरात्र महोत्सव साजरा करावा.

म. फुले व डॉ. आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचे खरें मर्म जाणा
 तैलचित्र अनावर प्रसंगी प्रबोधनकार ठाकरे यांचे भाषण
 नाशिक ता.१४ –
 ''लो. टिळकांप्रमाणेच म. ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असंतोषाचे जनक होते. ते दोघेहि युगपुरुष होते. पण त्यांच्या मागून त्यांच्या तत्वज्ञानाचा वारसा ज्यांच्याकडे आला त्यांनी मात्र त्यांच्या तत्वज्ञानास विकृत स्वरूप दिले. '' असे विचार प्रबोधनकार श्री. ठाकरे यांनी जिल्हा लोकल बोर्डाच्या कार्यालयांत म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रांच्या अनावरप्रसंगी केलेल्या भाषणांत प्रगट केले.
 येथील लोकल बोर्ड कार्यालयात श्री. तांबटबंधू यांनी काढलेल्या म. ज्योतिबा फुले आणि कै. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण सुविख्यात विचारवंत श्री. के. सी. ठाकरे यांच्या हस्ते झालें. जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष श्री. भा. ला. पाटील यांनी प्रास्ताविक भाषण केले.
 ठाकरे यांचे भाषण
 श्री. प्रबोधनकार ठाकरे आपल्या भाषणांत म्हणाले की, लो. टिळक हे जसे राजकीय असंतोषाचे जनक तसेच म. फुले व डॉ. आंबेडकर हे सामाजिक असंतोषाचे जनक होते. ज्योतिबा फुले यांनी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी विविध प्रकारच्या चळवळी सुरूं केल्या. पुढारलेल्या जाती आणि मागासलेल्या जाती यांच्यामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. भिक्षुकशाहीच्या विरुद्ध बंडाचे निशाण उभे केले. स्त्री आणि शूद्र यांचा उद्धार करण्यासाठी अविश्रांत श्रम केले. १८४७ साली पहिली मुलींची शाळा सुरूं केली. १८७९ साली सत्यशोधक चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. बुरसटलेल्या प्रतिगामी लोकांनी विरोध करून जर्जर केले. पण ते आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाहीत. विरोधाला तोंड देत ते सारखे पुढें पुढें जात राहिले.
 आंबेडकरांचे नेतृत्व
 शेकडो वर्षे घृणास्पद जीवन जगत असलेल्या अस्पृश्य समाजांत डॉ. आंबेडकरांनी अभिमानाची ठिणगी निर्माण केली. पुढारलेल्या समाजातील लोकांप्रमाणे आम्ही माणसे आहोंत. आमचे काही हक्क आहेत. याची जाणीव त्यांनी त्यांच्यात निर्माण केली. म. फुले आणि डॉ. आंबेडकर या युगपुरुषांनी महाराष्ट्रातील बहुजन समाजाला जागृत व स्वाभिमानी केले. आणि म्हणूनच त्यांची श्रेष्ठता अनन्यसाधारण आहे.
 पण पुढे काय
 श्री. ठाकरे पुढे म्हणाले कीं, हें दोघेजण जिवंत होते त्यावेळी त्यांचा विरोध झालाच. पण त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्याच अनुयायांनी त्यांच्या तत्वज्ञानाची परवड केली. सत्यशोधक चळवळीत जातीयवादाचा राक्षस निर्माण झाला. त्यांनी ज्या जातीयवादाविरुद्ध बंड केले त्याच जातीयवादाचा त्यांच्या अनुयायांनी पुरस्कार केला. म. फुले यांच्यानंतर एकहि खरा सत्यशोधक महाराष्ट्रांत निर्माण झाला नाही असा माझा दावा आहे. बुद्धवासी बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांच्या अनुयायांत त्यांचे तत्वज्ञान पेलूं शकेल असा एकहि नेता नाहीं. त्यांच्या बाह्यात्कारी वेषाचा देखावे करणारे पायलीचे पन्नास पुढारी आहेत. पण त्यांच्या तत्वज्ञानाचे मर्म जाणणारा एकहि नेता नाही ही दुक्खाची गोष्ट आहे. म. फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या ख-या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होणे अगत्याचे आहे. नुसती तैलचित्र लावून भागणार नाही तर त्यांच्या तत्वज्ञानाचे मर्म जाणून घेणे जरूरीचे आहे. असे ते शेवटी म्हणाले. श्री. भालेराव यांनी आभार मानल्यावर हा समारंभ संपला.
prabodhankar.org/node/356/page/0/45

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा