रविवार, २९ जानेवारी, २०१७

निषेध

मी आणि माझे सहकारी मिळून लालमहालात दरवर्षी ३-१२जानेवारी सावित्री-जिजाऊ महोत्सव घ्यायचो.
पालकमंत्री गिरीष बापट यांच्या आॕफिसच्या अगदी मागेच लालमहाल ही ऐतिहासिक वास्तू आहे.
       अतिशय कठीण होतं तिथे कार्यक्रम घेणं. कधी फ्लेक्स गायब तर कधी आमच्या कार्यक्रमाच्या वेळेत दुसऱ्याच कार्यक्रमांनी ताबा घेतलेला.कधी निनावी फोन.तरी रीतसर मनपा परवानगी घेऊन कार्यक्रम करायचो आम्ही. तरी तिथे कधी काय घडेल याचा नेम नाही.
    १०जानेवारी २०१५ रोजी शाम मानवांचे 'अंधश्रद्धा आणि स्त्रीया' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.पेपरात स्थानिकला माहिती आली. मात्र अचानकच मानव सरांनी येणं रद्द करून प्रतिनिधी पाठवले.
   कार्यक्रम सुरू होऊन दहाच मिनिटे झाली.२०-२५ मुलांनी लालमहालाचा ताबा घेतला. वक्त्याला माईक बंद करायला लावला.भगवी उपरणी,भगव्या टोप्या, हातात काठ्या.खुर्च्या उचलून फेकणं.मुली स्त्रीया उठून पळू लागल्या. दै.सकाळचा पत्रकार पळून गेला. काहींचे मोबाईल ताब्यात घेतले.
      फरासखान्यात कंप्लेंट, साक्षी झाल्या. पुढे काही होणार नाही हे माहिती असूनही आम्ही सीसी टीव्ही फुटेज मागितलं. अपेक्षित नकार आला.
       प्रेस काॕन्फरंस घेतली.एवढं घडूनही एकाही वर्तमानपत्रात एक ओळ आली नाही.
     त्यांनी फुलेंना शिव्या दिल्या. म.फुले आणि सावित्रीमाईंची तसबीर फोडल्यावर ते माझ्या कपाळात गेले.मी आजही त्या दुःखातून बाहेर आले नाहीये.
       आणि म्हणे, पुणे हे सांस्कृतिक शहर!
जिथे शिकलेली आमचीच लोकं व्यवस्थेत लाचार हतबल असतात.
        या पुण्यानेच सावित्रीमाईच्या अंगावर दगड-शेण टाकलेले.
         आज भारतातील पहिली मुलींची शाळा कुठेय हेच अनेक स्त्रीयांना माहिती नाही.
          एकीकडे दगडूशेठ गणपतीचा सोनेरी कळस चकाकतोय आणि त्यासमोरच आमच्यासारख्यांना ज्ञानाचा प्रकाश दाखविणारी सावित्रीमाईची शाळा अंधारात पडझड झालेल्या अवस्थेत आहे...

बाकीच्या महापुरुषांच्या जयंत्यांप्रमाणे सावित्रीमाईच्या जन्माचा इव्हेंट बनून जाऊ नये.
    - मोहिनी कारंडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा